अगरवालचे दुसरे शतक, रबाडाचे 3 बळी

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-11 03:40:00

img

प्रतिनिधी /पुणे :

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकणाऱया मयांक अगरवालने दुसऱया कसोटी सामन्याचा पहिला दिवसही गाजवला. रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करणाऱया मयांकने गुरुवारी पुन्हा खणखणीत शतक ठोकले. मयांकचे शतक व चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी 3 बाद 273 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान, अंधुक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबविण्यात आला तेव्हा विराट  63 आणि रहाणे 18 धावांवर खेळत होते.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. धावांची बरसात करून पहिली कसोटी गाजवणाऱया मयांक आणि रोहितची जोडी आज मैदानात उतरली. मात्र, सलामीची ही जोडी आज लवकर फुटली. रोहित शर्माने 35 चेंडूत अवघ्या 14 धावा केल्या. कागिसो रबाडाने त्याला एका अप्रतिम चेंडूवर यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारासोबत मयांकने खेळपट्टीवर नांगर टाकला आणि शतक पूर्ण केले. शून्यावर असताना जीवदान मिळालेल्या पुजारानेही त्याला उत्तम साथ देत अर्धशतक साजरे केले. त्याने 112 चेंडूत 58 धावा केल्या. पुजारादेखील रबाडाच्याच एका चेंडूवर फसला आणि झेलबाद झाला. त्याने 9 चौकार आणि एक उत्तुंग षटकार मारला. त्यानंतर रबाडानेच सलग दुसऱया कसोटीत शतक नोंदवणाऱया मयांकला फॅफ डु प्लेसिसकरवी झेलबाद केले. मयांकने 195 चेंडूत 108 धावा केल्या. त्याने आपली खेळी 16 चौकार आणि दोन षटकारांनी सजवली. मयांक आणि चेतेश्वर पुजारा यांनी 138 धावांची भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची परीक्षा पाहिली. यानंतर दिवसअखेर विराट आणि अजिंक्य रहाणे यांनी 75 धावांची अभेद्य भागीदारी रचली.

दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने गोलंदाजीत कमाल केली. रबाडाने रोहित शर्माला टाकलेला चेंडू रोहितच्या बॅटला हलकासा स्पर्श करून यष्टिरक्षकाकडे गेला होता.  त्यानंतर त्याने पुजारा आणि मयांक अगरवालचा अडथळा दूर केला. त्याने अवघ्या 48 धावांमध्ये 3 विकेट घेतल्या.

अगरवालने केली सेहवागशी बरोबरी

भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर मयांक आगरवालने पुण्यातील कसोटी सामन्यातही चमकदार कामगिरी केली. त्याने कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. सलग दोन कसोटी सामन्यांत दोन शतके ठोकून त्याने माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी साधली. सेहवागनेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2009-10 मध्ये सलग दोन कसोटी सामन्यात दोन शतके तडकावली होती.

संक्षिप्त धावफलक :

भारत – 273/3 (मयांक अगरवाल झे डू प्लेसिस गो रबाडा 108, रोहित शर्मा झे डिकॉक गो रबाडा  14, चेतेश्वर पुजारा झे डू प्लेसिस गो रबाडा 58, विराट कोहली खेळत आहे 63, अजिंक्मय रहाणे खेळत आहे 18. गोलंदाजी : कगिसो रबाडा 3/48, फिलँडर 0/37).

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN