अनिर्णीत सराव सामन्यात रोहित शून्यावर बाद

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-29 04:55:00

img

युवा फलंदाज प्रियंक पांचाळ, यष्टीरक्षक-फलंदाज कोना अरुण मात्र चमकले, तीन दिवसीय लढतीची सांगता

विझियानगरम / वृत्तसंस्था

रोहित शर्माला सलामीला उतरवण्यापूर्वीची रंगीत तालीम केवळ दोन चेंडूपुरतीच टिकली. रोहित येथे स्कोअररला काहीही त्रास न देता शून्यावर बाद झाला. याचबरोबर बोर्ड अध्यक्षीय एकादश व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन दिवसीय सरावाची लढत अनिर्णीत राहिली.

भारतीय कसोटी संघाचा दरवाजा ठोठावत असलेले प्रियंक पांचाळ (77 चेंडूत 60) व यष्टीरक्षक-फलंदाज कोना भरत (57 चेंडूत जलद 71) यांनी दमदार फलंदाजी साकारल्यानंतर बोर्ड अध्यक्षीय इलेव्हनने 64 षटकात 8 बाद 265 धावा फटकावल्या. मुंबईकर फलंदाज सिद्धेश लाडने (52) देखील शानदार अर्धशतक साजरे केले. या लढतीत तत्पूर्वी दक्षिण आफ्रिका संघाने आपला पहिला डाव 6 बाद 279 धावांवर घोषित केला होता. तेम्बा बवूमा 170 चेंडूत 14 चौकार, 1 षटकारासह 87 धावांवर नाबाद राहिला तर व्हरनॉन फिलँडरने 49 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले.

त्यानंतर तिसऱया दिवशी सर्वांचे लक्ष सलामीवीर रोहित शर्माकडे होते. रोहित इथे मयांक अगरवालच्या (92 चेंडूत 39) साथीने फलंदाजीला उतरला. पण, मध्यमगती गोलंदाज फिलँडरच्या बाहेर जाणाऱया चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात बदली यष्टीरक्षक हेरिच क्लासेनकडे सोपा झेल देत रोहितने सपशेल निराशा केली. पहिल्या कसोटीपूर्वी त्याने येथे पुरेसा वेळ फलंदाजी करणे अपेक्षित होते. पण, रोहितला अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. उभय संघातील दुसरी कसोटी दि. 2 ऑक्टोबरपासून विशाखापट्टणम येथे खेळवली जाणार आहे.

रोहितसमोर दुहेरी आव्हान

या कसोटी मालिकेसाठी तैनात कॅगिसो रबाडा हा दक्षिण आफ्रिकेचा मुख्य जलद गोलंदाज आहे तर फिलँडर दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्यात माहीर आहे. हे दोघेही रोहितसाठी अडथळे निर्माण करु शकतात. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहितने दमदार यश संपादन केले आहे. पण, डावाच्या सुरुवातीला फूटवर्कमध्ये रोहित बऱयाचदा झगडतो आणि त्याचा लाभ घेण्याचा रबाडा-फिलँडर यांचा प्रयत्न असू शकतो.

या सराव सामन्यात भारतीय संघातर्फे खेळलेले पहिले चारही फलंदाज स्पेशालिस्ट सलामीवीर होते. त्यात रोहित अपयशी ठरला तर अगरवाल, पांचाळ यांनी उत्तम यश संपादन केले. याशिवाय, अभिमन्यू ईश्वरनला 25 चेंडूत 13 धावा करता आल्या. ईश्वरनला रबाडाने एडन मॅरक्रमकरवी झेलबाद केले. नंतर गुजरातच्या पांचाळने अगरवालसमवेत तिसऱया गडय़ासाठी 52 धावांची भागीदारी साकारली. अगरवालने डावखुरा फिरकीपटू केशव महाराजच्या (13.1 षटकात 35 धावात 3 बळी) गोलंदाजीवर विशेष आक्रमण चढवले.

प्रियंक पांचाळची फटकेबाजी

डावातील 11 व्या षटकात चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या पांचाळने 10 चौकार, 1 षटकार फटकावला. शिवाय, 19 धावा जमवणाऱया करुण नायरसमवेत 49 धावांची भागीदारी साकारली. फिलँडरने (9 षटकात 2-27) आपल्या दुसऱया स्पेलमध्ये पांचाळला कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसकरवी झेलबाद केले. नायरने महाराजच्या गोलंदाजीवर क्लासेनकडे झेल दिला आणि यामुळे बोर्ड अध्यक्षीय संघाची 5 बाद 136 अशी दैना उडाली. पण, एकदा रबाडा व फिलँडरची गोलंदाजी थांबवल्यानंतर कोना भरत व सिद्धेश लाड यांनी फक्त 20 षटकात सहाव्या गडय़ासाठी 100 धावांची भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणले.

कोना भरतचे लक्षवेधी अर्धशतक

आंध्र प्रदेशचा यष्टीरक्षक-फलंदाज कोना भरतने 7 चौकार व 5 षटकार फटकावले. त्याने विशेषतः डेन पिएडेतचा (14 षटकात 1-80) अधिक समाचार घेतला. सिद्धेश लाडने त्या तुलनेत पुस्तकी फटक्यांवर अधिक भर दिला. त्याने 7 चौकार व एक षटकार फटकावला. नंतर महाराजने भरतला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. जलज सक्सेना 2 तर धमेंद्र जडेजा शून्यावर बाद झाले आणि इथे बोर्ड अध्यक्षीय एकादशने आपला डाव घोषित केला.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका पहिला डाव : 6/279 घोषित. (एडन मॅरक्रम 100 धावांवर निवृत्त, तेम्बा बवूमा नाबाद 87, व्हरनॉन फिलँडर 48, धमेंद्र जडेजा 3-66).

बोर्ड अध्यक्षीय एकादश : 8-265 घोषित (रोहित शर्मा 0, केएस भरत 57 चेंडूत 71, प्रियंक पांचाळ 77 चेंडूत 60, सिद्धेश लाड 89 चेंडूत नाबाद 52, व्हरनॉन फिलँडर 2-27, केशव महाराज 3-35).

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD