आव्हान ’डे-नाईट’ कसोटीचे!

Mymahanagar

Mymahanagar

Author 2019-11-03 08:18:00

img

कसोटी हा क्रिकेटचा सर्वात जुना आणि पारंपरिक प्रकार. जो खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करतो तोच सर्वोत्तम असेच आजही समजले जाते. पूर्वी क्रिकेट चाहते कसोटी सामन्यांची आतुरतेने वाट पाहत असत. मात्र, एकदिवसीय क्रिकेट आणि मागील एक-दीड दशकात टी-२० क्रिकेटच्या वाढत्या प्रसारामुळे कसोटी क्रिकेट हळूहळू मागे पडायला सुरुवात झाली. चाहतेही कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत एकदिवसीय आणि खासकरून टी-२० क्रिकेटला पसंती देताना दिसत आहेत.

त्यामुळे बरीच वर्षे चर्चा आणि वादविवाद केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) डे-नाईट (प्रकाशझोतात) कसोटी सामने खेळण्यास सुरुवात केली. यामागे एकच हेतू होता, चाहत्यांना कसोटी सामने पाहण्यासाठी स्टेडियमकडे वळवणे. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली क्रिकेट बोर्डाने डे-नाईट कसोटी सामने खेळण्यास नकार दिला. मात्र, कसोटी क्रिकेटला जिवंत ठेवण्यासाठी आयसीसीला काहीतरी करणे गरजेचे होते.

२०१५ साली आयसीसीने पहिल्यावहिल्या डे-नाईट कसोटी सामन्याचे आयोजन केले. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील हा ऐतिहासिक सामना २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत अ‍ॅडलेड येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. तसेच या सामन्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आयसीसीने यानंतर पाकिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड आणि अगदी झिम्बाब्वेलाही डे-नाईट कसोटी सामना खेळण्यासाठी तयार केले. बीसीसीआयने स्थानिक क्रिकेटमध्ये काही डे-नाईट प्रथम श्रेणी सामने खेळवण्याचा प्रयोग केला. २०१६ मधील दुलीप करंडक स्पर्धेत पहिल्यांदा डे-नाईट सामने खेळवले गेले. चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, कुलदीप यादव यांसारखे भारताच्या आताच्या कसोटी संघातील प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळले. त्यांना गुलाबी चेंडूने खेळताना फारशा अडचणी आल्या नाहीत. मात्र, असे असतानाही बीसीसीआयने डे-नाईट कसोटी सामना खेळण्यास नकारच दिला.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा डे-नाईट कसोटीचा चाहता! काही दिवसांपूर्वीच त्याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याच्या अध्यक्षतेत बीसीसीआयच्या विचारसरणीत बदल झाला आहे. त्यानेच पुढाकार घेत कर्णधार विराट कोहलीला अखेर डे-नाईट कसोटी सामना खेळण्यास तयार केले. त्यामुळे २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत बांगलादेशविरुद्ध कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये भारत आपला पहिलावहिला डे-कसोटी सामना खेळणार आहे. मात्र, हा सामना खेळण्यास ‘तयार’ असणे वेगळे आणि या सामन्याची ‘तयारी’ करणे वेगळे.

या सामन्याचे आयोजन करताना बीसीसीआयपुढे काही आव्हाने आहेत. नियमित कसोटी सामन्यात लाल रंगाच्या चेंडूचा वापर केला जातो. मात्र, तो चेंडू प्रकाशझोतात दिसण्यास अडचण होते. त्यामुळे डे-नाईट कसोटी सामन्यांसाठी गुलाबी रंगाच्या चेंडूचा वापर करण्यास येतो. बर्‍याच देशांमध्ये हे गुलाबी चेंडू पुरवण्याचे काम कुकाबुरा ही कंपनी करते. परंतु, भारतात होणार्‍या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांत ‘एसजी’ या कंपनीचे चेंडू वापरले जातात. कोलकाता येथे होणार्‍या सामन्यासाठी बीसीसीआयने एसजीकडून तब्बल ७२ गुलाबी चेंडू मागवले आहेत. भारतीय संघाने मागील काही वर्षांत कसोटीत वापरण्यात येणार्‍या एसजीच्या लाल चेंडूंबाबत तक्रारी केल्या आहेत. या चेंडूचा टणकपणा ठराविक षटकांनंतर कमी होतो ही भारताची प्रमुख तक्रार होती. त्यामुळे एसजी कंपनीला गुलाबी चेंडू बनवताना हा चेंडू बरीच षटके टिकेल, तसेच प्रकाशझोतातही नीट दिसेल यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला ईडन गार्डन्सवर गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव आहे. २०१६ मध्ये मोहन बागान आणि भवानीपूर क्लब या संघांतील सामन्यात साहा खेळला होता. “या सामन्यात खेळण्याचा अनुभव खूपच चांगला होता, पण संध्याकाळच्या वेळी फलंदाजी करणे जरा अवघड होते”, असे साहा म्हणाला. संध्याकाळच्या वेळी प्रकाशझोतात गोलंदाजांना अधिक मदत मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे फलंदाजांना चेंडू कशी हालचाल करत आहे याचा अंदाज येण्यास अडचण होऊ शकेल. तसेच कोलकाता येथे होणार्‍या सामन्यात ‘दव’ महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. “रात्रीच्या वेळी जर दव पडले आणि चेंडू ओला झाला, तर गोलंदाज चांगलेच अडचणीत सापडतील. दव नसेल तरच हा सामना यशस्वी होऊ शकेल”, असे मत भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले होते. त्यामुळे याबाबत बीसीसीआयला खास काळजी घ्यावी लागेल. सामन्याला लवकर सुरुवात करणे हा त्यावरील एक उपाय असू शकेल.

एकूणच डे-नाईट कसोटी सामना ही संकल्पना उत्तम आहे. आतापर्यंतच्या ११ डे-नाईट सामन्यांमधून ते दिसूनही आले आहे. मात्र, बीसीसीआयला डे-नाईट कसोटी सामने आयोजित करण्याचा आणि भारतीय खेळाडूंना ते खेळायचा जराही अनुभव नाही. परंतु, बांगलादेशनेही आजवर एकही डे-नाईट कसोटी सामना खेळलेला नाही आणि हीच गोष्ट कसोटीतील सर्वोत्तम संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारताच्या पथ्यावर पडू शकेल.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD