ऑस्ट्रेलियाचा लंकेवर दणदणीत विजय

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-28 05:40:00

img

पहिला टी-20 सामना : वॉर्नरचे नाबाद शतक, फिंच-मॅक्सवेलची अर्धशतके, झाम्पाचे 3 बळी

वृत्तसंस्था/ ऍडलेड

इंग्लंडमध्ये झालेल्या ऍशेस मालिकेत पूर्णपणे निष्प्रभ ठरलेल्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला टी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात सूर गवसला असून त्याने झळकवलेल्या तडाखेबंद शतकाच्या बळावर कांगारूंनी श्रीलंकेवर तब्बल 134 धावांनी दणदणीत विजय मिळवित आघाडी घेतली. 56 चेंडूत नाबाद 100 धावा फटकावणारा वॉर्नर सामनावीराचा मानकरी ठरला.

वॉर्नरने नाबाद शतकी खेळी करून 33 वा वाढदिवस साजरा करताना 10 षटकार आणि 4 षटकारांची आतषबाजी केली. याशिवाय कर्णधार फिंच व ग्लेन मॅक्सवेल यांनीही अर्धशतके झळकवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 2 बाद 232 धावा तडकावल्या. वॉर्नरने फिंचसमवेत सलामीला आणि मॅक्सवेलसमवेत दुसऱया गडय़ासाठी शतकी भागीदारी केल्या. त्यानंतर लंकेला 20 षटकांत 9 बाद 99 धावांवर रोखत ऑस्ट्रेलियाने मोठा विजय साकार केला. लेगस्पिनर ऍडम झाम्पाने भेदक फिरकीवर लंकेचे 14 धावांत 3 बळी मिळविले. तीन सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे

ऍशेस मालिकेनंतर मायदेशातील स्थानिक क्रिकेटमध्येही वॉर्नरला अपेक्षित सूर गवसला नव्हता. अति झटपट प्रकारात मात्र त्याने जबरदस्त फटकेबाजी करीत चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. ऍशेसमधील दहा डावांत त्याला केवळ 95 धावा जमविता आल्या होत्या. पण रविवारच्या सामन्यात नजर स्थिरावल्यावर लंकन गोलंदाजांवर त्याने बेधडक चौफेर हल्ला केला आणि डावाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने आपले शतक पूर्ण केले. फिंच व मॅक्सवेल यांनीही त्याला पूरक साथ देत अर्धशतके नोंदवली. या तिघांनीही लंकन गोलंदाजांच्या चिंधडय़ा उडविल्या. कसुन रजिथाच्या 4 षटकांत त्यांनी तब्बल 75 धावा लुटल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील ही सर्वात महागडी गोलंदाजी ठरली आहे. वॉर्नर-फिंच जोडीने 10.5 षटकांत 122 धावांची सलामीची भागीदारी केली. त्यानंतर वॉर्नर-मॅक्सवेल यांनी दुसऱया गडय़ासाठी 107 धावांची भागीदारी करून संघाला सव्वादोनशे पारचा टप्पा गाठून दिला. फिंचने 36 चेंडूत 8 चौकार, 3 षटकार मारले तर शेवटच्या षटकात बाद झालेल्या मॅक्सवेलने केवळ 28 चेंडूत 7 चौकार, 3 षटकारांसह 62 धावा झोडपल्या. 11 व्या षटकात फिंचने संदकनच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटवर कुसल मेंडिसकडे झेल देत बाद झाला. मॅक्सवेलनेही तुफान फटकेबाजी केली. पण शेवटच्या षटकात यष्टिरक्षक शनाकाकडे झेल देत तो बाद झाला. संदकन व शनाका या दोनच गोलंदाजांना एकेक बळी मिळविता आला.

स्टार्क, कमिन्सपुढे लंकेचा धुव्वा

लंकेला मात्र हे आव्हान पेलवले नाही. स्टार्क, कमिन्स यांचा वेगवान मारा आणि झाम्पाच्या फिरकीसमोर ते झगडतानाच दिसत होते. पहिल्याच षटकांत कुसल मेंडिसला स्टार्कने बाद केल्यानंतर त्यांच्या डावाला गळती सुरू झाली आणि त्यातून ते अखेरपर्यंत सावरू शकले नाहीत. पॅट कमिन्सने दनुष्का गुणतिलका (11) व भानुका राजपक्षे (2) यांना चौथ्या षटकात लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. पण फर्नांडोने त्याची हॅट्ट्रिक हुकवली. दसुन शनाका हा त्यांचा सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज ठरला. त्याने 18 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 17 धावा जमविल्या. यष्टिरक्षक कुसल परेराने 16 धावा केल्यावर स्टार्कने त्याला त्रिफळाचीत केले. कर्णधार मलिंगा अखेरपर्यंत नाबाद राहत 13 धावा केल्या, मात्र संघाला शंभरीही गाठता आली नाही. कमिन्स व स्टार्क यांनी प्रत्येकी 2 तर ऍस्टन ऍगरने एक बळी मिळविला.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नोंदवलेली धावसंख्या ही 2007 नंतर नोंदवलेली मायभूमीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यावेळी सिडनीत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 221 धावा फटकावल्या होत्या. यापुढील सामने ब्रिस्बेन (30 ऑक्टाबर) व मेलबर्न (1 नोव्हेंबर) येथे होणार आहेत. त्यानंतर पाक संघ ऑस्ट्रेलियात दाखल होणार असून त्यांचे सामने सिडनी (3 नोव्हेंबर), कॅनबेरा (5 नोव्हेंबर), व पर्थ (8 नोव्हेंबर), येथे होणार आहेत. पुढील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियातच होणार असून त्याची सर्वच संघ त्याची तयारी करीत आहेत.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 2 बाद 232 : फिंच 64 (36 चेंडूत 8 चौकार, 3 षटकार), वॉर्नर नाबाद 100 (56 चेंडूत 10 चौकार, 4 षटकार), मॅक्सवेल 62 (28 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार), टर्नर नाबाद 1, अवांतर 6. गोलंदाजी : संदकन 1-41, शनाका 1-10, मलिंगा 0-37, रजिता 0-75, नुवान प्रदीप 0-28, डीसिल्वा 0-42.

लंका 20 षटकांत 9 बाद 99 : गुणतिलका 13 चेंडूत 2 चौकारांसह 11, कुसल परेरा 16 चेंडूत 1 चौकारासह 16, फर्नांडो 21 चेंडूत 1 चौकारासह 13, शनाका 18 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारास 17, मलिंगा 19 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 13, प्रदीप नाबाद 8, अवांतर 8. गोलंदाजी : स्टार्क 2-18, कमिन्स 2-27, झाम्पा 3-14, ऍगर 1-13, रिचर्डसन 0-21.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN