कर्नाटकाचा केरळवर 60 धावांनी विजय
वृत्तसंस्था / बेंगळूर
येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या सामन्यात यजमान कर्नाटकाने केरळचा 60 धावांनी पराभव करून 4 गुण वसुल केले.
या सामन्यात केरळने नाणेफेक जिंकून कर्नाटकला प्रथम फलंदाजी दिली. कर्नाटकाचा डाव 49.5 षटकांत 294 धावांवर आटोपला. त्यानंतर केरळचा डाव 46.4 षटकांत 234 धावांत संपुष्टात आल्याने कर्नाटकाने हा सामना जिंकला. या सामन्यात कर्नाटकातर्फे सलामीचा के.एल.राहूल तर केरळतर्फे सलामीचा फलंदाज विष्णु विनोद यांनी शानदार शतके झळकविली.
कर्नाटकाच्या डावात सलामीच्या के.एल. राहूलने 122 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकारांसह 131, कर्णधार मनिष पांडेने 51 चेंडूत 2 षटकांर आणि 6 चौकारांसह 50, एस. गोपालने 2 चौकारांसह 31, सुचित 2 चौकारांसह 13, मिथुनने 1 चौकारांसह 12, रोनित मोरेने 1 षटकारांसह 12 धावा जमविल्या. राहुल आणि मनिष पांडे यांनी तिसऱया गडय़ासाठी 84 धावांची भागिदारी केली. कर्नाटकाच्या डावात 8 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. केरळतर्फे थंपी आणि असिफ यांनी प्रत्येकी 3 तर वेमेर आणि मनोहरन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना केरळच्या डावामध्ये सलामीचा फलंदाज विष्णु विनोदने 123 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांह 104 धावा जमविताना सॅमसनसमवेत दुसऱया गडय़ासाठी 107 धावांची भागिदारी केली. सॅमसनने 66 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 67, कर्णधार उथप्पाने 10 चेंडूत 3 चौकारांसह 12, सचिन बेबीने 36 चेंडूत 2 चौकारांसह 26 धावा जमविल्या. केरळच्या डावात 6 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. कर्नाटकातर्फे रोनित मोरेने 42 धावांत 3, ए. मिथुनने 32 धावांत 2, कृष्णा, गोपाल आणि देशपांडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
कर्नाटक-49.5 षटकांत सर्वबाद 294 (के.एल.राहूल 131, मनिष पांडे 50, गोपाल 31, सुचित 13, मिथुन 12, रोनित मोरे 12, थंपी, असिफ प्रत्येकी 3 बळी, वेमेर आणि मनोहरन प्रत्येकी 2 बळी), केरळ 46.4 षटकांत सर्वबाद 234 (विष्णु विनोद 104, सॅमसन 67, सचिन बेबी 26, उथप्पा 13, रोनित मोरे 3-42, मिथुन 2-32, कृष्णा, गोपाल, देशपांडे प्रत्येकी 1 बळी).