कसोटी सामन्यावर पावसाचे सावट

Dainik Prabhat

Dainik Prabhat

Author 2019-10-10 08:30:00

img

मालिका विजयासाठी भारतीय संघ सज्ज; दक्षिण आफ्रिकेसाठी प्रतिष्ठेची लढत

पुणे: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यास आजपासून गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरुवात होत आहे. पुणे शहरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचाच खेळ सुरू आहे, त्यामुळे या सामन्यावर देखील पावसाचे सावट आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे मैदानाचे आऊटफिल्ड खेळ होण्याच्या स्थितीत आहे किंवा नाही हे पंचांच्या पाहणीनंतर स्पष्ट होणार असून पावसाने ओढ दिली तर भारतीय संघाचे या सामन्यासह मालिका जिंकण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल.

विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळविला होता. आता पुणे येथील कसोटीत विजय मिळवित मालिका विजय साकार करण्यासाठी संघ सज्ज झाला आहे. या सामन्यात विजय प्राप्त करून प्रतिष्ठा जपण्यासाठी पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
विशाखापट्टणम येथील पहिल्या कसोटीत भारताने 203 धावांनी विजय मिळविला होता. रोहित शर्माने दोन्ही डावात शतकी खेळी केली, तर मयांक आग्रवालने द्विशतक फटकावले होते.

या सामन्यांत पहिल्या डावात रवीचंद्रन अश्‍विनने तर दुसऱ्या डावात महंमद शमी आणि रवींद्र जडेजाने अचूक गोलंदाजी करत पाहुण्यांवर वर्चस्व राखले होते. या सामन्यासाठी तयार केलेली खेळपट्टी पाहता वेगवान गोलंदाजांबरोबरच फिरकी गोलंदाजांना देखील मदत मिळणार आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे खेळपट्टी पूर्ण कोरडी नसणार मग त्याचा लाभ सुरुवातीला महंमद शमी व ईशांत शर्मा यांना निश्‍चितच होईल. या सामन्यांत विशाखापट्टणमप्रमाणेच पावसाळी वातावरणामुळे पाचव्या दिवशी देखील गोलंदाजांना मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.

फलंदाजीबाबत बोलायचे झाले तर सलामीवीर रोहित व अग्रवाल हे तर भरात आहेतच पण चेतेश्‍वर पुजारा, कर्णधार कोहली, अजिंक्‍य रहाणे, हनुमा विहारी आणि वृद्धिमान साहा अशी तगडी फलंदाजी भारताकडे आहे. त्यामानाने पाहुण्या संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसी, डीन एल्गर, एडन मार्कराम व कॉंटन डिकॉक यांच्यावरच जबाबदारी राहील. संघातील अन्य फलंदाज अननुभवी असल्याने त्यांच्याकडून होणारी कामगिरी बोनस ठरणार आहे.

या मैदानावर दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात फिरकी गोलंदाज नाथन लिऑनने भारतीय फलंदाजीची वाताहत केली होती व संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे हे मैदान भारतीय संघासाठी फार काही चांगले सिद्ध झालेले नाही, परंतु प्रत्येक सामन्याची स्थिती भिन्न असते त्यामुळे उद्यापासून सुरू होत असलेल्या सामन्यात नाणेफेक कोणता संघ जिंकतो यावरदेखील निकाल अवलंबून राहील. या सामन्यात फलंदाजांना पहिले दोन दिवस संयमी खेळ करावा लागणार आहे.

ढगाळ हवामान आणि पाहुण्यांची वेगवान गोलंदाजी सुरुवातीची काही षटके खेळून काढल्यानंतर मात्र भारतीय फलंदाजांचे राज्य प्रस्थापित होण्याची शक्‍यता जास्त आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत महंमद शमी हा सध्या भारतीय गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र
बनला आहे.

संघ समतोल कायम – कोहली
खेळपट्टी पाहता संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्याची आवश्‍यकता वाटत नाही. पहिले दोन दिवस वगळता उर्वरित दिवसांत फिरकी गोलंदाजच वर्चस्व राखतील, असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत सांगतिले. तसेच संघात दोनपेक्षा जास्त वेगवान गोलंदाज किंवा एक अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळविण्याची गरज नाही. उलट पहिल्या सामन्यातीलच संघ कायम ठेवत संघ समतोल राहील,असेही कोहलीने स्पष्ट केले.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN