कोहलीला विश्रांती, दुबेला संधी

Mymahanagar

Mymahanagar

Author 2019-10-25 08:09:00

img

बांगलादेशविरुद्धच्या आगामी टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार विराट कोहली मागील काही काळात सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने एम.एस.के प्रसाद अध्यक्षीय निवड समितीने त्याला तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेसाठी मुंबईकर अष्टपैलू शिवम दुबेची पहिल्यांदा भारतीय संघात निवड झाली आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा या संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र, टी-२० मालिकेनंतर होणार्‍या कसोटी मालिकेसाठी कोहलीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळणार्‍या २६ वर्षीय शिवम दुबेने यंदाच्या विजय हजारे करंडकात अप्रतिम कामगिरी केली. तसेच २०१७ साली स्थानिक एकदिवसीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या दुबेने रणजी करंडकातही सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. त्यातच प्रमुख अष्टपैलू हार्दिक पांड्याला दुखापतीमुळे काही काळासाठी मैदानाबाहेर रहावे लागणार आहे. त्यामुळे दुबेला टी-२० संघात संधी देण्यात आली आहे. दुबेने आतापर्यंत १६ प्रथम श्रेणी सामन्यांत १०१२ धावा केल्या असून ४० विकेट्स, ३५ एकदिवसीय सामन्यांत ६१४ धावा केल्या असून ३४ विकेट्स, १९ टी-२० सामन्यांत २४२ धावा केल्या असून १४ विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच टी-२० संघात यष्टीरक्षक संजू सॅमसनचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्याची निवड राखीव यष्टीरक्षक म्हणून झाली आहे. युवा रिषभ पंतने प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून आपले स्थान राखले आहे. मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरचेही टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ सामन्यांची टी-२०, तर २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

टी-२० संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर.

कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, ईशांत शर्मा, शुभमन गिल, रिषभ पंत.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD