क्रिकेट स्थित्यंतराच्या साक्षीदाराची भेट

Loksatta

Loksatta

Author 2019-10-04 06:51:55

img

मुंबई : क्रिकेट समालोचनाच्या माध्यमातून देशभरातील क्रीडाप्रेमींच्या हृदयांत स्थान मिळवलेले विख्यात समालोचक आणि संवादक हर्ष भोगले हे यंदाच्या ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहेत. सचिन तेंडुलकरच्या उदयापासून टी-२० क्रिकेटपर्यंत भारतीय क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण स्थित्यंतरांचे जवळचे साक्षीदार असलेल्या हर्ष भोगले यांना माजी क्रिकेटपटू आणि विश्लेषकांनी ‘सर्वात लोकप्रिय’, ‘सर्वात नि:पक्षपाती’ अशा विविध बिरुदांनी गौरवलेले आहे.

केमिकल इंजिनीअरिंगमधील पदवी आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद) येथून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही हर्ष भोगले यांनी नोकरीची सुस्थिर वाट न पकडता, वेगळा विचार केला. विद्यापीठ स्तरावर त्यांनी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती.  परंतु भाषेवरील प्रभुत्व, शब्दांवरील पकड, हजरजबाबीपणा आणि परिस्थितीचे अचूक निरीक्षण रसाळ भाषेत मांडण्याची क्षमता या शिदोरीवर त्यांनी त्या वेळी काहीशा दोलायमान अशा क्रिकेट समालोचन क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर आजतागायत ४००हून अधिक एकदिवसीय सामने, १००हून अधिक कसोटी सामने, असंख्य टी-२० सामन्यांचे देशात आणि परदेशात जाऊन त्यांनी समालोचन केले आहे. अत्यंत ओघवत्या, नर्मविनोदी परंतु नेहमी विनयशील अशा शैलीमुळे घराघरांमध्ये हर्ष भोगले यांचे चाहते आहेत. टीव्हीवर क्रिकेटचा सामना आणि हर्ष भोगले यांचे समालोचन हे जणू समीकरणच बनून गेले. नुसत्या सामन्याच्या स्थितीवर्णनापलीकडे माहितीचा अखंड आणि ओघवता साठा, त्याला अभ्यासाची जोड यांमुळे त्यांचे समालोचन जगभरात लोकप्रिय झाले आहे.  समालोचनाबरोबरच ‘इंडियन एक्स्प्रेस’सह अनेक आघाडीची वृत्तपत्रे, नियतकालिके, संकेतस्थळ यांच्यासाठी त्यांनी विपुल लिखाणही केले आहे. ते ‘मोटिव्हेशनल  वक्ते’ म्हणूनही ओळखले जातात.

दैनंदिन वृत्तव्यवहाराच्या पलीकडे जाऊन विचारांच्या नवनव्या दिशांचा शोध घेण्यासाठीचा वाचकस्नेही संवादसेतू असा हा ‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रम. ख्यातकीर्त साहित्यिक एस. एल. भैरप्पा, ज्येष्ठ गायक-संगीतज्ञ-लेखक पं. सत्यशील देशपांडे, अभिजात संगीतात स्वत:चा ठसा उमटविणारे पं. मुकुल शिवपुत्र, लेखक-शायर जावेद अख्तर, अभिनेते नसिरुद्दिन शहा, मनस्वी कवी गुलजार, रंगरेषाकार सुभाष अवचट, गानविदुषी प्रभा अत्रे, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, ख्याल संगीतात गेल्या तीन दशकांत अनेक प्रयोग करणारे उस्ताद राशिद खान आदी मान्यवरांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.

शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी पुण्यात होत असलेल्या या कार्यक्रमाचे ‘तन्वी हर्बल्स’ हे पॉवर्ड बाय पार्टनर आहेत.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD