खेळपट्टीवर अधिक, आऊटफिल्डवर कमी गवत ठेवा

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-31 05:14:00

img

गुलाबी चेंडूवरील कसोटी सामन्यासाठी बीसीसीआय माजी मुख्य पिच क्युरेटर दलजीत सिंग यांची सूचना

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पुढील महिन्यात कोलकात्यात खेळवल्या जाणाऱया दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी 22 यार्डांच्या स्ट्रीपवर अधिक व आऊटफिल्डवर कमी गवत ठेवावे, अशी सूचना बीसीसीआयचे माजी मुख्य क्युरेटर दलजीत सिंग यांनी केली. कसोटी दिवस-रात्र स्वरुपात होणार असल्याने टाळता न येण्यासारखा दव फॅक्टर असेल. त्याचा बीमोड करण्याच्या दृष्टीने ही उपाययोजना उपयुक्त ठरेल, असा दलजीत यांचा होरा आहे. उभय संघातील ही कसोटी दि. 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत होईल.

बंगाल क्रिकेट संघटनेने यापूर्वी गुलाबी चेंडूने दिवस-रात्र क्रिकेट बरेच खेळवले आहे आणि याचा अनुभव ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र, दव फॅक्टर अजिबात टाळता येण्यासारखे नसल्याने त्याविषयी आताच रणनीती निश्चित करावी, अशी दलजीत यांची सूचना आहे. दलजीत मागील महिन्यातच बीसीसीआयचे मुख्य क्युरेटर या नात्याने निवृत्त झाले. तब्बल 22 वर्षे त्यांनी भारतीय क्रिकेटची सेवा केली.

‘आऊटफिल्डवर कमी गवत असावे आणि पिचवर नेहमीपेक्षा किंचीत उंच गवत असावे. आऊटफिल्डवर जितके जास्त गवत असेल, तितके ते अधिक दव निर्माण करेल. त्यामुळे, कोलकातातील मैदान समितीने आतापासूनच याबाबत कृती सुरु करावी’, असे 77 वर्षीय दलजीतनी पुढे नमूद केले. दलजीत स्वतः प्रथमश्रेणी क्रिकेटपटू राहिले असून सध्या ते पंजाब क्रिकेट संघटनेच्या पिचची जबाबदारी हाताळत आहेत.

एरवी दिवसा खेळवल्या जाणाऱया कसोटी सामन्यात दिवसाचा खेळ सकाळी 9.30 वाजता सुरु होतो. पण, भारतात प्रथमच दिवस-रात्र होणाऱया कोलकात्यातील कसोटी सामन्यात दुपारी 1.30 वाजता सुरुवात होणार आहे. गुलाबी चेंडू दीर्घ काळ टिकून रहावा, यासाठी पिचवर अधिक गवत असावे, असे दलजीत यांना वाटते. 2016 मध्ये दुलीप चषक स्पर्धेदरम्यान दलजीत व त्यांच्या सहायकांनी या दृष्टीनेच मैदान सुसज्ज केले होते.

‘गुलाबी चेंडू अधिक लवकर घाण होतो. 2017 मध्ये ऍडलेडला प्रथमच गुलाबी चेंडू वापरात आणला गेला, त्यावेळी पिचवर 11 मिलिमीटर गवत  ठेवले गेले होते. दुलीप चषकात पिचवर 7.7 मिलिमीटर गवत होते. सर्वसाधारणपणे 2.5 ते 4 मिलिमीटर उंच गवत असते आणि जितके गवत उंच तितका चेंडू अधिक सीम होतो’, असे दलजीत येथे म्हणाले.

आणखी एका अनुभवी क्युरेटरने सामन्याच्या दोन-तीन दिवस आधी आऊटफिल्डवर पाण्याचा फवारा करु नये, अशी सूचना गोपनीयतेच्या अटीवर मांडली. सुपरसॉपर्सच्या सोबतीने दव होऊ नये, यासाठी काही केमिकल्सचा फवारा करावा लागू शकतो. दोन दिवस आधी ठिबक बंद करावे. कारण, यामुळे दमटपणा  वाढू शकतो, असे या क्युरेटरने नमूद केले.

ईडनची आऊटफिल्ड भारतात जितकी मैदाने आहेत, त्यात सर्वोत्तमपैकी एक आहे आणि येथील मातीच्या अव्वल दर्जामुळे क्षेत्ररक्षकांनी डाईव्ह मारली तरी त्यांना इजा होणार नाही, असे संकेत आहेत. बंगाल क्रिकेट संघटनेचे क्युरेटर सूजन मुखर्जी यांनी मात्र या दिवस-रात्र कसोटीत दव फॅक्टर असणार नाही, असा दावा येथे केला. दव पडण्यास रात्री 8 ते 8.30 दरम्यान सुरु होते आणि ते मध्यरात्रीपर्यंत असते. पण, इथे सामनेच 8.30 पर्यंत असल्याने इथे दव फॅक्टर असणार नाही, असे मुखर्जी यांचे मत आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD