गांगुली भारतीय क्रिकेटला उच्च स्तरावर नेईल!

Loksatta

Loksatta

Author 2019-10-18 04:07:39

img

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला विसाव्या शतकात जिगरबाज नेतृत्वाच्या बळावर सर्वोच्च शिखरावर नेणारा सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष म्हणूनही नक्कीच चांगली कामगिरी करेल, असा आशावाद माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केला.

मुंबईत गुरुवारी रस्ता सुरक्षा जागतिक ट्वेन्टी-२० मालिकेच्या (रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज) अनावरण कार्यक्रमासाठी सचिनव्यतिरिक्त सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, ब्रेट ली, तिलकरत्ने दिलशान आणि जाँटी ऱ्होड्स आदी माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. पाच देशांमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेचे पहिले पर्व पुढील वर्षी ४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेद्वारे होणाऱ्या नफ्यातील काहीसा भाग ‘शांत भारत, सुरक्षित भारत’ या संस्थेला देण्यात येणार आहे.

‘‘गांगुलीने संपूर्ण कारकीर्दीत नेहमीच खेळाशी प्रामाणिक राहून संघासाठी सर्वतोपरी योगदान दिले. त्यामुळे ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपदही तो नक्कीच यशस्वीपणे सांभाळेल. गांगुली आणि मी गेली अनेक वर्षे मित्र असल्याने, त्याच्याविषयी मी हे नक्कीच खात्रीने सांगू शकतो,’’ असे जागतिक मालिकेत भारताचे कर्णधारपद सांभाळणारा सचिन म्हणाला. सचिनव्यतिरिक्त भारताच्या संघात सेहवाग, झहीर खान आणि रुद्रप्रताप सिंग यांसारख्या काही माजी खेळाडूंचाही समावेश असणार आहे.

‘‘रस्ते अपघात भारताला भेडसावणारा विषय असून आपल्या देशात अनेकांचे अपघाताद्वारे प्राण जातात. त्यामुळे या लीगद्वारे चाहत्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी निश्चित योगदान देता येईल,’’ असेही तेंडुलकरने सांगितले.

दिलशानचाही गांगुलीला पाठिंबा 

सौरव गांगुलीने जवळपास १६-१७ वर्षे भारतीय क्रिकेटची अविरत सेवा केली असून त्यालाच ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद सोपवण्यात यावे, अशी इच्छा श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशानने व्यक्त केली. ‘‘गांगुलीने भारतीय क्रिकेटसाठी बहुमूल्य योगदान दिले असून ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष म्हणून तो आमुलाग्र बदल घडवून आणेल,’’ असे दिलशान म्हणाला. परंतु ‘आयसीसी’ने विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धापूर्वीच सुपर-ओव्हरच्या नियमांविषयी विचार करायला हवा होता, असेही दिलशानने सांगितले.

भारताची वेगवान गोलंदाजांची फळी विंडीजच्या सुवर्णकाळासारखी – लारा

भारतीय संघाची सध्याची वेगवान गोलंदाजांची फळी मला १९८०-९०च्या काळातील विंडीजच्या गोलंदाजांसारखी भासते, अशी स्तुतिसुमने विंडीजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराने उधळली. ‘‘विंडीजच्या गोलंदाजांनी १९८०-९०च्या दशकात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवले. त्याचप्रमाणे सध्याच्या भारतीय संघातील गोलंदाजही कोणत्याही खेळपट्टीवर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात छाप पाडण्यात सक्षम आहेत. जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांना या यशाचे सर्वाधिक योगदान जाते,’’ असे लारा म्हणाला. याव्यतिरिक्त विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात सर्वोत्कृष्ट कोण, असे विचारले असता लाराने कोहलीला पंसती दिली. ‘‘स्मिथ हा नक्कीच एक अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. परंतु सर्व प्रकारांत सातत्याने धावा करण्याची कला कोहलीला अवगत आहे. त्याशिवाय कर्णधार म्हणून त्याच्यावर दडपणही अधिक असते, परंतु तो दबावाखालीही सुरेख खेळ करतो,’’ असे लाराने सांगितले.

सचिनविरुद्ध पुन्हा सलामीला उतरण्यासाठी उत्सुक – सेहवाग

सचिन आणि मी अनेक वर्षे भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका बजावली असून कारकीर्दीतून निवृत्ती पत्करल्यानंतरही पुन्हा एकदा सचिनसह सलामीला उतरण्यासाठी मी उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया सचिनचा सलामीचा सहकारी वीरेंद्र सेहवागने व्यक्त केली. ‘‘कोणत्याही प्रतिस्पर्धीकडे लक्ष देण्याऐवजी मी सचिनसह सलामीला उतरण्याची संधी मिळणार, यासाठी उत्सुक आहे. त्याशिवाय ब्रेट लीविरुद्ध मी कधीही धडाकेबाज फलंदाजी केलेली नाही. त्यामुळे भारतीय खेळपट्टय़ांवर त्याच्या चेंडूंना सामीपार धाडण्यासाठी मला पुन्हा सरावावर भर द्यावा लागणार आहे,’’ असे सेहवाग म्हणाला.

जागतिक मालिकेचे संभाव्य स्वरुप

* स्पर्धेत एकूण पाच संघांचा समावेश

* भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात द्वंद्व

* मुंबई आणि पुणे येथे पहिल्या हंगामाचे आयोजन

* दरवर्षी हिवाळ्यात स्पर्धा रंगणार

* प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळल्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये विजेतेपदासाठी सामना

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN