जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान भारतात

Deshdoot

Deshdoot

Author 2019-10-28 03:42:00

img

अहमदाबाद । जानेवारी 2020 पर्यंत अहमदाबादच्या सरदार पटेल मैदानाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. भारतात हे जगातले सगळ्यात मोठे क्रिकेट मैदान उभारले जात आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या मैदानात भारत विरुद्ध जागतिक-11 असा टी-20 सामना खेळवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. मोटेरा नावाने प्रसिद्ध असलेल्या या मैदानात भारताचा शेवटचा एकदिवसीय सामना 2014 साली श्रीलंकेविरुद्ध झाला होता. यानंतर या मैदानाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली.

अहमदाबादच्या या क्रिकेट मैदानात तब्बल 1.1 लाख प्रेक्षक बसू शकणार आहेत. एवढी प्रेक्षक क्षमता असलेले हे जगातले हे सगळ्यात मोठे क्रिकेट स्टेडियम असेल. सध्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर सर्वाधिक 90 हजार प्रेक्षक बसू शकतात, तर कोलकात्याचे ईडन गार्डन 66 हजार प्रेक्षक क्षमतेसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. 1853 साली मेलबर्न क्रिकेट मैदान बांधण्यात आले होते.

जानेवारी 2018 मध्ये या स्टेडियमचे भूमिपूजन झाले होते. गुजरात क्रिकेट असोसिएशनने लार्सन अ‍ॅण्ड टुर्बो (एल अ‍ॅण्ड टी) या कंपनीला हे स्टेडियम बांधण्याचे कंत्राट दिले. हे स्टेडियम बांधण्यासाठी शापूरजी पालनजी आणि नागार्जून कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांनीही अर्ज केले होते. जगप्रसिद्ध आर्किटेक्चर फर्म एम.एस. पॉप्युलसने या स्टेडियमचे डिझाईन केले आहे. याच फर्मने मेलबर्न क्रिकेट मैदानाचेही डिझाईन केले होते.

हे स्टेडियम उभारण्यासाठी अंदाजे 700 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हे नवे क्रिकेट स्टेडियम 63 एकर परिसरात पसरले आहे. या स्टेडियममध्ये 50 रूम असलेले क्लब हाऊस, 76 कॉर्पोरेट बॉक्स, 4 ड्रेसिंग रूम, क्रिकेटपटूंसाठी 3 प्रॅक्टिस ग्राऊंड, इनडोर क्रिकेट अ‍ॅकेडमी, ऑलिम्पिक साईज स्वीमिंग पूल, 3 हजार चारचाकी आणि 10 हजार दुचाकींसाठी पार्किंगची व्यवस्था असेल.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD