जेव्हा विराटने स्वतःला बजावले…वडिलांवर प्रेम कर!

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-06 05:45:00

img

तरुणाईच्या आयकॉनचा 31 वाढदिवस थाटात

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेटच्या तारांगणातील आसमंत तारा म्हणजे विराट कोहली…..क्रिकेटवेडय़ा भारतातील तरुणाईच्या गळय़ातील ताईत म्हणजे विराट कोहली….फलंदाजीतील हुकूमाचा एक्का म्हणजे विराट कोहली आणि अवघे सत्ताकेंद्र जेथे सध्या एकटवलेले आहे, तो संघाचा अविभाज्य घटक म्हणजे विराट कोहली……याच विराटने मंगळवारी आपला 31 वा वाढदिवस साजरा केला आणि तो साजरा करण्यापूर्वी मागे वळून पाहताना त्याला आवर्जून आठवण आली ते त्याचे लहानपणापासूनचे हिरो….त्याचेच वडील, दस्तुरखुद्द प्रेम कोहली…..मंगळवारी मागे वळून पाहताना कोहली वडिलांच्या आठवणीने चांगलाच हळवा झाला….आणि त्याने स्वतःला बजावून सांगितले….वडिलांवर प्रेम कर!

विराटचे वडील प्रेम कोहली हे कट्टर शिस्तीचे आणि विराटच्या नसानसात शिस्त  भिनेल, हे त्यांनी काटेकोरपणे पडताळण्याचा शिरस्ताच पाडला. त्यांचाच वचक होता म्हणून कदाचित, विराटने परिश्रमात कधीही गय केली नाही आणि प्रेम कोहली यांचे निधन झाले….त्यानंतरही विराटवरील संस्कार त्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आणि विराट स्वतःला त्यांच्याच कठोर शिस्तीत घडवत गेला.

विराटवर त्याच्या वडिलांची प्रचंड माया. पण, परिस्थिती हलाखीची असल्याने ते विराटला त्याला हवे असलेले शूज विकत घेऊन देऊ शकत नव्हते. त्यांनी काहीही संकोच न ठेवता, विराटला स्पष्टपणे बजावले, मी तुला हवे असलेले शूज आणून देणार नाही!

विराटला क्षणभर जरुर वाईट वाटले. पण, तो अशाच घटनांमधून एकेक धडे शिकत गेला. प्रेम कोहली यांचे 54 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले, त्यावेळी विराट अवघ्या 18 वर्षांचा होता. वडिलांवर अंतिम संस्कार केल्यानंतर विराटने लगोलग मैदानात उतरत रणजी क्रिकेटमध्ये दिल्ली राज्य संघातर्फे 90 धावांची खेळी साकारली आणि तो सामना वाचवून दिला होता. सध्या जागतिक क्रिकेट मानांकन यादीत तो कसोटी व वनडे या दोन्ही क्रिकेट प्रकारात अव्वलस्थानी विराजमान आहे आणि आपल्याला देखील अपयशाचा सामना करावा लागू शकतो, याची त्याला पुरेपूर जाणीव आहे.

दिल्लीत मिळणारे पराठे हा विराटचा वीक पॉईंट. हे पराठे खायचे म्हणजे त्याच्यासाठी चैन असायची. आज पराठेच काय, सारी सुखे त्याच्या पायाशी लोळण घेऊन आहेत. पण, त्याने मंगळवारी आपला 31 वा वाढदिवस साजरा करताना स्वतःलाच पत्र लिहिले, ज्यात तो 15 वर्षांचा होता आणि या पत्रात तो म्हणतो…..‘मला माहीत आहे, आज तू वडिलांनी तुला जे बूट हवे होते, ते आणून दिले नव्हते, याचा विचार करत आहेस. पण, हा त्यांच्या शिस्तीचा भाग होता. वडील कठोर शिस्तीचे होते आणि तेच तुझ्यासाठी सर्वोत्तम होते. या सर्वोच्च शिखरावर, 31 व्या वाढदिनी, या क्षणी मी तुला इतकेच सांगू इच्छितो की, वडिलांवरील माया कमी होऊ देऊ नकोस….त्यांना आज सांग…उद्या सांग व सांगत रहा की, मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो’!

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD