टीम इंडियाचा ‘विराट’ मालिका विजय

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-14 06:25:00

img

द.आफ्रिकेवर 1 डाव 137 धावांनी मात

सुकृत मोकाशी / पुणे

दुसऱया कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर चौथ्या दिवशीच एक डाव आणि 137 धावांनी मात करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताने दुसऱया डावात फलंदाजी न करता पाहुण्या दक्षिण अप्रेकेला फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱया डावातही भारतीय गोलंदाजांनी द.आफ्रिकन फलंदाजांची भंबेरी उडवली. घरच्या मैदानावर सलग 11 वा कसोटी मालिका विजय साकारत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने रविवारी पुण्यात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. कर्णधार विराट कोहली सामनावीराचा मानकरी ठरला.

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या गहुंजे येथील मैदानात हा कसोटी सामना पार पडला. भारताने पहिला 601 धावांवर घोषित केल्यानंतर तिसऱया दिवशी द.आफ्रिकेचा पहिला डाव भारतीय गोलंदाजांनी 275 धावांवर संपवला. चौथ्या दिवशी विराट कोहलीने आफ्रिकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर द. आफ्रिकेची दुसऱया डावातही खराब सुरुवात झाली. इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी सकाळी अर्ध्या तासातच मार्करम आणि डी-ब्रुईन यांचे बळी घेऊन सामन्यावर पकड मिळवून दिली. त्यांनी तुफान गोलंदाजी केली. सलामीवीर मार्करम इशांत शर्माच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर डी-ब्रुईन आणि डीन एल्गर यांच्या बॅटचे कड घेऊन काही चौकार गेले. पण, त्यांच्या खेळीत आत्मविश्वास जाणवत नव्हता. संघाची धावसंख्या 21 असताना डी ब्रुईन उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने डावीकडे झेपावत त्याचा सुरेख झेल टिपला. यानंतर डीन एल्गर आणि कर्णधार फॅफ डु-प्लेसिस यांनी संघाला 71 धावांपर्यंत पोहोचवून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर डु-प्लेसिस बाद झाला. साहाने त्याचा पुढे झेपावत आणखी एक सुंदर झेल घेतला. द. आफ्रिका 74 धावांवर पोहोचल्यावर डीन एल्गरही खराब फटका मारून बाद झाला. त्याने आठ चौकांरासह 48 धावा केल्या. तेव्हाच पंचांनी उपाहारासाठी खेळ थांबवला. उपाहाराला द.आफ्रिका संघ 4 बाद 74 असा अडचणीत सापडला होता. 

उपाहारानंतर दुसऱयाच षटकात जडेजाने क्विंटन डी-कॉकचा त्रिफळा उडवला. यानंतर बवुमा आणि मुथुस्वामी यांनी सहाव्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी करत झुंज देण्याचा प्रयत्न करीत भारताचा विजयही लांबवला. पण, बवुमाने आपला संयम गमावला आणि जडेजाने त्याला बाद केले. त्याच्या आधीच्याच चेंडूवर भारताने रिव्हय़ू घेतला होता. पण, तो वाया गेला. त्याचा फायदा बवुमाला उठवता आला नाही. पुढच्याच चेंडूवर तो स्लिपमध्ये रहाणेकडे झेल देऊन बाद झाला. त्याने 4 चौकार आणि 1 षटकारासह 38 धावांची खेळी केली. लगेचच शेन्युरन मुथुस्वामीला एका सुरेख चेंडूवर शमीने बाद केले. रोहित शर्माने त्याचा स्लिपमध्ये सुंदर झेल घेतला. यानंतर  फिलँडरने जडेजाला सलग 2 दोन षटकार मारून दबाव हटवण्याचा प्रयत्न केला. फिलँडर आणि केशव महाराज यांनी चहापानापर्यंत आणखी पडझड न होऊ देता धावसंख्या 7 बाद 172 पर्यंत पोहोचवली.

पहिल्या डावाप्रमाणेच फिलँडर आणि महाराज यांनी भारतीय गोलंदाजांची परीक्षा पाहिली. त्यांनी 56 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताचा विजयही लांबला. चहापानानंतरच्या सत्रात उमेश यादवने फिलँडरला यष्टीरक्षक साहाकरवी झेलबाद करत द.आफ्रिकेची ही जमलेली जोडी फोडली. पाठोपाठ कगिसो रबाडाही त्याच षटकात माघारी परतला. यानंतर जडेजाने केशव महाराजला माघारी धाडत चौथ्याच दिवशी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. दुसऱया डावात भारताकडून उमेश यादव आणि जडेजा यांनी प्रत्येकी 3-3, अश्विनने 2 तर इशांत आणि मोहम्मद शमीने 1-1 बळी घेतला. सामनावीर म्हणून द्विशतकवीर विराट कोहलीला घोषित करण्यात आले. या मालिकेतला अखेरचा सामना 19 ऑक्टोबरपासून रांचीत  खेळवला जाणार आहे.

भारताने मोडला ऑस्ट्रेलियाचा विक्रम

मायदेशात सलग 11 कसोटी मालिका विजय मिळवणारा भारत हा पहिलाच संघ बनला आहे. 2013 पासून भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. टीम इंडियाने ऑस्टेलियाचा 10 कसोटी मालिकाविजयांचा विक्रम मोडला.

द. आफ्रिकेवरील सर्वात मोठा विजय

भारताने दक्षिण अफ्रिकेवर साकारलेला सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी 2010 मध्ये कोलकाता कसोटीत 1 डाव 57 धावांनी विजय मिळवला होता.

11 वर्षानंतर अफ्रिकेवर ओढवली नामुष्की

कोहलीने द.आफ्रिकेला फॉलोऑन देऊन नवा विक्रमाची नोंद केली. द.आफ्रिकेला 11 वर्षानंतर प्रथमच एखाद्या संघाने फॉलोऑन दिला आहे. यापूर्वी 2008 मध्ये इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत त्यांना फॉलोऑन दिला होता. त्यात ग्रॅमी स्मिथ, नील मॅकेंझी आणि हाशीम आमला यांनी खिंड लढवत सामना अनिर्णित राखला होता.

विराटने कपिल देव आणि सेहवागला टाकले मागे

कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामनावीराचा किताब पटकावणाऱया खेळाडूंच्या यादीत विराट चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. विराटचा हा 9 वा सामनावीराचा पुरस्कार ठरला आहे. त्याने कपिल देव आणि वीरेंद्र सेहवागला याबाबतीत मागे टाकले आहे.

भारतीय संघात स्पर्धाः उमेश यादव 

img

जेव्हा आमच्या 600 धावा बोर्डवर लागल्या तेव्हाच फॉलोऑन द्यायचा निर्णय झाला होता. पण, तिसऱया दिवशीच्या बॉलिंगवर आम्ही ठरवले होते, फॉलोऑन द्यायचा की नाही. इतके दिवस मी संघाच्या बाहेर होतो. भारतीय संघात स्पर्धा वाढलेली आहे. मी माझे प्रयत्न सुरु ठेवत असतो. संघात नसतो तेव्हा कुठलीही मॅच असेल तर ती मी खेळतो. म्हणजे आपण रिकामे राहत नाही, असे भारतीय जलदगती गोलंदाज उमेश यादव याने चौथा दिवस संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

जखमी केशव महाराज तिसऱया कसोटीला मुकणार

img

विशाखापट्टणम कसोटीपाठोपाठ दक्षिण आफ्रिकन संघाला दुसऱया कसोटीतही दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह त्यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. फिरकी गोलंदाज केशव महाराज 19 ऑक्टोबरपासून रांचीत सुरु होणाऱया तिसऱया कसोटीतून खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. पुण्यात झालेल्या दुसऱया कसोटी दरम्यान दुसऱया दिवशी क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतरही त्याने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली होती. पण तपासणीनंतर तो तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी फिट नसल्याचे दिसून आले आहे. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी 14 ते 21 दिवस लागणार असल्याने तो तिसऱया कसोटीत सहभागी होणार नाही. त्याच्याऐवजी दक्षिण आफ्रिकेने 27 वषीय जॉर्ज लिन्ड याची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे. त्यामुळे आता जॉर्जला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे.

आयसीसी कसोटी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाच ‘बिग बॉस’

या विजयानंतर आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आपले अव्वलस्थान आणखी भक्कम केले आहे. या विजयासह भारताला 40 गुण मिळाले असून यामुळे भारताचे गुणतालिकेत 200 अंक झाले आहेत. या गुणतालिकेत 200 अंक मिळवणारा भारत पहिला संघ ठरला आहे. किवीज संघ 60 गुणासह दुसऱया तर श्रीलंकन संघ 60 गुणासह तिसऱया स्थानी आहे.

कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिका –

टीम इंडियाचा सलग 11 वा मालिकाविजय

भारताने मायदेशात सलग 11 कसोटी मालिकाविजय मिळवण्याचा विश्वविक्रम केला आहे. फेब्रुवारी 2013 पासून ही विजयी मालिका सुरू झाली आहे. याआधी मायदेशात सर्वाधिक सलग कसोटी मालिका विजय मिळवण्याचा विक्रम भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या नावावर संयुक्तरित्या होता. पण भारताने आता ऑस्ट्रेलियाला मागे टाकत नवा विश्वविक्रम नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाने दोन वेळा मायदेशात सलग 10 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. पण त्यांना दोन्ही वेळेस अकरवाव्या वेळी मालिका जिंकण्यात अपयश आले होते. मात्र आता भारतीय संघाने मायदेशात सलग 11 मालिका जिंकत हा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

मायदेशात सर्वाधिक सलग कसोटी मालिका जिंकणारे संघ

11 ा भारत (फेब्रुवारी 2013 ा आतापर्यंत)

10 ा ऑस्ट्रेलिया (1994ा2000)

10 ा ऑस्ट्रेलिया (2004ा2008)

8 ा वेस्ट इंडीज (1976ा1986)

संक्षिप्त धावफलक

भारत 5 बाद 601 घोषित, दक्षिण आफ्रिका पहिला डाव सर्वबाद 275 आणि दुसरा डाव सर्वबाद 189. (बवुमा 38 धावा, 4 चौकार, 1 षटकार), फिलँडर (37 धावा, 2 चौकार, 2 षटकार), गोलंदाजी : उमेश यादव 3/22, रवींद्र जडेजा 3/52, अश्विन 2-46, इशांत 1-17, शमी 1-34.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN