टीम इंडियाचे टार्गेट ‘व्हाईटवॉश’चे

Pudhari

Pudhari

Author 2019-10-19 04:14:41

img

रांची : वृत्तसंस्था

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि मालिकेतील अंतिम कसोटी सामना आज शनिवारपासून रांची येथे होत आहे. या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली असून, तिसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला 3-0 असा ‘व्हाईटवॉश’ देण्याचे टीम इंडियाचे टार्गेट आहे. मालिका अगोदरच जिंकल्यामुळे या सामन्यातील निकालाचा मालिकेवर परिणाम होणार नसला तरी कसोटी चॅम्पियनशिपसाठी महत्त्वपूर्ण 40 गुण मिळवण्यासाठी भारतीय संघ खेळणार आहे. तर दुसरीकडे पहिल्या दोन्ही कसोटीत सपाटून मार खाल्लेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटच्या सामन्यात लाज राखण्याचा प्रयत्न करणार आहे.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला प्रत्येक क्षेत्रात नामोहरम करीत विशाखापट्टणम येथे झालेला पहिला कसोटी सामना 203 धावांनी जिंकला. त्यानंतर पुण्यातील दुसर्‍या सामन्यात एक डाव 137 धावांनी दक्षिण आफ्रिकेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवला. भारतीय संघाचा विचार करता भारताला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत फारशी चिंता करण्यासारखी कोणतीही गोष्ट दिसत नाही.

वन-डेत यशस्वी ठरलेला रोहित शर्मा कसोटीतही तितकाच यशस्वी झाला आहे. त्याच्या जोडीला असणार्‍या मयंक अग्रवाल या युवा खेळाडूने आपल्या पहिल्या कसोटी शतकाचे रूपांतर द्विशतकामध्ये केले होते आणि त्यानंतर पुण्यातील सामन्यातही त्याने शतक करून आपण ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे दाखवून दिले.

तिसर्‍या क्रमांकावर खेळणार्‍या विराट कोहलीने पुण्याच्या सामन्यात आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना नाबाद 254 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याच्या नावापुढे द्विशतकी धावसंख्या उभी रहात असताना तो मात्र हे माझे नेहमीचे काम आहे, अशा थाटात खेळत होता. चेतेश्वर पुजारानेही तीन डावांपैकी 2 अर्धशतके नोंदवली आहेत. तोही आता शतक झळकावण्यास आतुर आहे.

दोन्ही कसोटीत मिळून भारताच्या फक्त 16 विकेट घेण्यात पाहुण्या गोलंदाजांना यश आले. तर, भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या दोन्ही कसोटीत मिळून 40 विकेट घेतल्या आहेत. ही इतकी आकडेवारी दोन्ही संघांतील फरक स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. उमेश यादवने जसप्रीत बुमराहच्या जागेवर मिळालेल्या संधीचे सोने करताना पुणे कसोटीत 22 धावांत 3 विकेट घेत भारताला सुरुवातीलाच संधी निर्माण करून दिली. अर्थात, त्याच्या या यशात यष्टिरक्षक वृद्धिमान साहाचादेखील मोठा वाटा आहे. दुसर्‍या कसोटीत विराटने हनुमाला वगळून उमेशच्या रूपात तिसरा वेगवान गोलंदाज खेळवला होता. आता रांचीमध्ये तो कोणाला संधी देतो हे पाहावे लागेल.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ-ड्यु-प्लेसिसने रांचीची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल असे म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही संघ दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकी गोलंदाज खेळवतील. तसे झाले तर इशांत किंवा उमेश यापैकी एकाला बाहेर बसावे लागेल.

कसोटी चॅम्पियनशिपचा विचार करता भारताकडे आता 200 गुण झाले असून, तो दुसर्‍या स्थानावरील न्यूझीलंडपेक्षा 140 गुणांनी पुढे आहे. ‘भारताचा कर्णधार विराट कोहली याने चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापर्यंत आम्हाला सातत्य ठेवायचे आहे,’ असे यापूर्वीच सांगितले आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN