टी-20 क्रमवारी : कोहली, धवनची प्रगती

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-26 04:44:00

img

वृत्तसंस्था/ दुबई

भारतीय कर्णधार विराट कोहली व डावखुरा सलामीवीर शिखर धवन यांनी आयसीसी टी-20 फलंदाजांच्या मानांकनात प्रगती केली आहे. बुधवारी ही यादी जाहीर करण्यात आली.

द.आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱया सामन्यात कोहलीने नाबाद 72 धावांची खेळी करीत भारताला विजय मिळवून दिला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. या खेळीमुळे त्याची एका स्थानाने प्रगती झाली असून तो आता 11 व्या क्रमांकावर विसावला आहे. धवनने तीन स्थानांची प्रगती करीत 13 वे स्थान मिळविले आहे. त्याने दोन सामन्यांत 40 व 36 धावा केल्या होत्या. नवा यादी जाहीर करताना आयसीसीने भारत-दक्षिण आफ्रिका, बांगलादेश तिरंगी मालिका तसेच आयर्लंड तिरंगी मालिका यांतील कामगिरी विचारात घेतली हेती. बांगलातील मालिकेत अफगाण व झिम्बाब्वे यांचा तर आयर्लंड मालिकेत स्कॉटलंड व नेदरलँड्स या संघांचाही समावेश होता.

पाचव्या क्रमांकावर असणारा हजरतुल्लाह झझाईचे 727 मानांकन गुण झाले असून अफगाणच्या फलंदाजाने मिळविलेले हे सर्वाधिक गुण आहेत. याशिवाय 21 व्या क्रमांकावर असणारा जॉर्ज मुन्सी हा 600 गुण नोंदवणारा स्कॉटलंडचा पहिला फलंदाज बनला होता. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ 56 चेंडूत नाबाद 127 धावा झोडपल्या होत्या. पण तिरंगी मालिकेअखेर त्याची 585 गुणांवर घसरण झाली आहे. भारतातील मालिकेत द.आफ्रिकेचा कर्णधार क्विन्टॉन डी कॉकनेही 49 वरून 30 व्या स्थानावर झेप घेतली आहे. गेल्या दोन वर्षातील त्याचे सर्वोच्च स्थान आहे. त्याने या मालिकेत 52 व नाबाद 79 धावा फटकावल्या होत्या. त्यांचा स्पिनर तबरेझ शमसीनेही गोलंदाजांच्या यादीत पहिल्यांदाच टॉप 20 मध्ये स्थान मिळविले आहे तर अँडिले फेहलुक्वायोने कारिकर्दीतील सर्वोच्च स्थान मिळविताना सातवा क्रमांक पटकावला आहे.

बांगलादेशमधील तिरंगी मालिकेत झिम्बाब्वेचा कर्णधार हॅमिल्टन मासाकेझाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असून त्याने कारकिर्दीची अखेर 22 व्या स्थानावर केली. अफगाणचा स्पिनर मुजीब उर रहमाननेही टॉपटेनमध्ये स्थान घेतले असून या मालिकेत त्याने 10 बळी मिळविले. आयर्लंडमधील मालिकेत नेदरलँड्सच्या बेन कूपर व मॅक्स ओडाऊड यांनी वैयक्तिक सर्वोच्च मानांकन मिळविले असून ते फलंदाजीत संयुक्त 41 व्या स्थानावर आहेत तर आयर्लंडचा फलंदाज केविन ओब्रायनने कारकिर्दीत सर्वाधिक 459 रेटिंग गुण मिळविले आहेत. अँड्रय़ू बलबिर्नीनेही प्रगती केली असून त्याने 95 वरून 53 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN