टी-20 ही लॉटरीच, तरी विश्वचषकासाठी भारतही फेवरीट!

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-07 05:39:00

img

ऍडम गिलख्रिस्ट म्हणतो,

मुंबई / वृत्तसंस्था

टी-20 क्रिकेट हे एखाद्या लॉटरीसारखेच असते. पण, पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदासाठी भारतही प्रबळ दावेदार असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू, माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टने मांडले. भारतासह इंग्लंड, यजमान ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे देखील प्रबळ दावेदार असतील, असे त्याला वाटते. गिलख्रिस्ट सध्या पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्यटन प्रसारासाठी भारत दौऱयावर असून यादरम्यान त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

‘पुढील वर्षी होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरी व अंतिम फेरीत खेळू शकेल, असा माझा अंदाज आहे. ही स्पर्धा कोण जिंकेल, याचे भाकित वर्तवणे कठीण असेल. पण, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांचा उपांत्य फेरीत सहभाग असेल आणि यापैकी एक संघच विश्वचषक उंचावू शकतो’, असे गिलख्रिस्ट पुढे म्हणाला.

गिलख्रिस्टने उल्लेख केलेल्या या देशात पाकिस्तानचा समावेश नाही. पण, पाकिस्तानही सनसनाटी निकाल नोंदवण्याची क्षमता राखून आहे, असे या दिग्गज खेळाडूचे मत आहे. तो म्हणतो, ‘20 षटकांच्या या छोटेखानी क्रिकेट प्रकारात काहीही होऊ शकते. सध्या या क्रिकेट प्रकारातील मानांकन यादीत पाकिस्तानच अव्वलस्थानी आहे. पण, टी-20 क्रिकेट ही एक प्रकारे लॉटरी असते आणि ती कोणालाही लागू शकते. विजयासाठी शेवटची धाव घेतली जात नाही किंवा शेवटचा बळी घेतला जात नाही, तोवर जेतेपदावर कोणता संघ शिक्कामोर्तब करेल, हे सांगता येत नसते’.

ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी महिला व पुरुष अशा दोन्ही गटात टी-20 विश्वचषक स्पर्धा होत आहे. सर्वप्रथम 24 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत महिलांची स्पर्धा होईल. यात यजमान ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यात सिडनी येथे सलामीची लढत होणार आहे. त्यानंतर आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धा दि. 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणार असून या स्पर्धेत 45 सामने होणार आहेत. या दोन्ही विश्वचषक स्पर्धांमधील सामने ऍडलेड, ब्रिस्बेन, कॅनबेरा, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ व सिडनी या 8 ऑस्ट्रेलियन शहरात खेळवले जाणार आहेत.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD