टेकडीचा हिमालय होताना!
-आदित्य गुंड
सध्याच्या क्रिकेटची परिस्थिती पाहिली तर तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं अशी परिस्थिती आहे. एक वेळ अशी होती की त्याला मोठ्या खेळया करताना एका ठराविक काळानंतर फिटनेस साथ देत नसे. त्याच्यातल्या चाणाक्ष खेळाडूने ते वेळीच ओळखले. या अतिशय तीव्र स्पर्धेत टिकायचे असेल तर फिटनेसला पर्याय नाही हे त्याने जाणले. तेव्हापासून ते आजतागायत जगभरातल्या सर्वोत्तम फिटनेस असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना केली जाते. नुसता स्वतःचा फिटनेस वाढवून तो थांबला नाही तर आपल्या संघ सहकाऱ्यांना त्याने बरोबरीला घेतले. त्याने फिटनेस ही संघाची सवय बनवली. आज भारतीय संघाच्या अत्त्युच्च दर्जाच्या फिटनेसचं बरेच श्रेय त्याला जातं.
क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात पदार्पण केल्यापासून त्याने राखलेलं सातत्य तोंडात बोटं घालण्यासारख आहे. त्याने खेळपट्टीवर येणं, भल्याभल्या गोलंदाजांची पिस काढणं आणि संघाला जिंकून देणं ह्याची चाहत्यांना सवय झाली आहे. तो शून्यावर बाद झाला तर त्याची बातमी होते. त्याच्या प्रत्येक शतकानंतर चाहतेच काय, मोठमोठे विश्लेषक, टीकाकारसुद्धा हा कसं एवढं सातत्य राखू शकतो याचा विचार करत अचंबित होताना दिसतात.
ज्याला आदर्श मानून क्रिकेट खेळायला सुरुवात केली, ज्याला सारं जग क्रिकेटचा देव म्हणते, जो क्रिकेटमधल्या फलंदाजीचा हिमालय गणला जातो त्याचेच एकेक विक्रम मागे हा मागे टाकत सुटलाय. बरं हे करताना त्याच्या मनात आपण त्या हिमालयासमोर एक साधी टेकडी आहोत हीच भावना आहे. तो हिमालय समोर दिसला तर त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला तो मागेपुढे बघत नाही. टीकाकार मात्र हिमालय आणि त्याची तुलना करतात. ती तुलना करताना टेकडीच्या फुकाच्या माजाची, रागाची, आक्रमकपणाची साक्ष देतात. तो मात्र त्याच हिमालयाला समोर ठेवत टीकाकारांना थोबाडत असतो. आपण आक्रमक आहोत हे तो कुठेही लपवत नाही. किंबहुना त्याच आक्रमकपणाची कास धरून त्याने भल्याभल्यांची तोंड बंद केली आहेत. सामान्याच्या पन्नासाव्या षटकात किंवा कसोटीच्या दिवसाच्या शेवटच्या षटकातही त्याची ऊर्जा पाहण्यासारखी असते. कित्येकदा केवळ या ऊर्जेच्या जोरावर त्याने संघाचे मनोबल उंचावलेले आहे.
आकडेवारीच्या नादाला मी लागतच नाही. कारण हा पठ्ठ्या वेळोवेळी आकडेवारी खिशात घालत असतो. जगभरातल्या क्रिकेट सांख्यिकीतज्ञांना सतत कामाला लावणाऱ्या खेळाडूंमध्ये हा सर्वात वर असतो. एकेका सामन्यात पाच सहा विक्रम सहज आपल्या नावावर करतो.केवळ अकरा वर्षांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत असलेला तो केवळ तिसरा भारतीय आहे.
त्याची ती दाढी जुन्यांना नाही आवडत. तीच दाढी आज संबंध भारतातील तरुणाईमध्ये ट्रेंड आहे. त्याचे टॅटू अनेकांना आवडत नाहीत. तरुणाईला मात्र त्याची भुरळ पडते. आज तो इन्स्टाग्राम,ट्विटर, फेसबुकवर नुसत्या एका पोस्टवर धुमाकूळ घालतोय. हे सगळं आपोआप जुळून आलेलं नाही. त्यामागे त्याची अकरा वर्षांची मेहनत आहे.
त्याला आजतागायत ना कुठली टीका, ना कुणाचे टोमणे थांबवू शकलेले नाही. किती? तर अगदी आयसीसीने सुद्धा किंग कोहली बिरुद वापरत त्याचा सिंहासनावर बसलेला फोटो ट्विट केलाय. अजून काय पाहिजे?
आज वाढदिवशी शुभेच्छा देताना एकच इच्छा असेल, ही टेकडी अशीच डरकाळ्या फोडत राहू देत, अशीच एकामागे एक शिखरे सर करत राहू देत आणि ते करताना ज्या हिमालयाला आदर्श मानले त्यांच्यापर्यंत पोहचून पुन्हा नतमस्तक होऊ देत. त्या हिमालयाचा आशिर्वाद घेत पुढची वाटचाल करत राहू देत.