डेव्हिस चषकासाठी रोहित राजपाल भारताचे बहिस्थ कर्णधार

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-05 05:11:00

img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

माजी भारतीय खेळाडू व राष्ट्रीय टेनिस फेडरेशन निवड समितीचे अध्यक्ष रोहित राजपाल यांची पाकिस्तानविरुद्ध खेळवल्या जाणाऱया आगामी डेव्हिस चषक लढतीसाठी ‘नॉन प्लेईंग कॅप्टन’ अर्थात बहिस्थ कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय टेनिस संघटनेने सोमवारी याची अधिकृत घोषणा केली. भारत-पाकिस्तान यांच्यातील आगामी डेव्हिस चषक लढत दि. 29 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत इस्लामाबाद येथे खेळवली जाणार आहे.

बहिस्थ कर्णधार म्हणून 46 वर्षीय लियांडर पेसची वर्णी लागेल, अशी यापूर्वी अपेक्षा होती. लियांडर पेस व भूपती या अनुभवी खेळाडूंनी आपण त्यासाठी उपलब्ध असल्याचे जाहीर केले होते. पण, अखिल भारतीय टेनिस संघटनेने राजपाल यांची नियुक्ती केली. चंदिगढ येथे वार्षिक सर्वसाधारण सभेत राजपाल यांची वर्णी लागली.

‘माजी अध्यक्ष अनिल खन्ना व प्रवीण महाजन यांनी रोहित राजपाल यांच्या नावाची शिफारस केली आणि त्यावर एकमत झाले. बहिस्थ कर्णधार म्हणून राजपाल आता पाकिस्तान दौऱयावर जातील. ही नियुक्ती सध्या पाकिस्तानविरुद्ध केवळ एकमेव मालिकेसाठी आहे’, असे फेडरेशनमधील एका सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

भारताच्या मागणीवर निर्णय नाही

प्रारंभी, भारतीय फेडरेशनने ही लढत पाकिस्तानऐवजी अन्य कोठेही तटस्थ ठिकाणी खेळवावी, यासाठी हरसंभव प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले नाही. पण, सोमवारी पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी याप्रश्नी पुन्हा आवाज उठवला आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस कार्यकारिणी याबाबत लवकरच अंतिम निर्णय जाहीर करणे अपेक्षित आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, उभय संघातील ही लढत सप्टेंबरमध्ये होणार होती. पण, भारताने पाकिस्तानमधील अराजक परिस्थिती आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न हे दोन महत्त्वाचे मुद्दे उचलून धरल्यानंतर लढत लांबणीवर टाकली गेली होती. भारताने जम्मू व काश्मीरचा विशेष दर्जा रद्दबातल ठरवत त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर पाकिस्तानने त्याचा तीव्र विरोध केला आणि यामुळे देखील उभय देशात मतभेदांची दरी आणखी रुंदावली होती.

1990 मध्ये पदार्पण

राजपाल यांनी 1990 मध्ये कोरियाविरुद्ध सेऊल येथे डेव्हिस चषक पदार्पण केले, ज्यात भारताला 0-5 अशा व्हॉईटवॉशला सामोरे जावे लागले होते. राजपालने त्यावेळी केलेले हे एकमेव प्रतिनिधीत्व ठरले. राजपालला आपल्या लढतीत जाए-सिक किम 1-6, 2-6 असा पराभव स्वीकारावा लागला होता. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये राजपाल यांच्याकडे पाच सदस्यीय निवड समितीचे अध्यक्षपद सोपवले गेले. त्यानंतर त्यांना दुसरी महत्त्वाची जबाबदारी येथे सोमवारी दिली गेली आहे.

राजपाल हे सत्तारुढ भाजप युनिटचे सदस्य तसेच दिल्ली लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्षपदही भूषवत आहेत. माजी कर्णधार आनंद अमृतराज हे देखील बहिस्थ कर्णधाराच्या जबाबदारीसाठी इच्छुक होते. पण, त्यांना 2 वर्षांचा करार मिळावा, ही अपेक्षा होती.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD