तुषार देशपांडेकडून संघनिवड सिद्ध

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-11-09 01:51:41

img

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वादंगानंतर मुंबई संघात दाखल झालेल्या तुषार देशपांडेने मुश्‍ताक अली ट्‌वेंटी 20 स्पर्धेत मिझोरामच्या तीन फलंदाजांना बाद करीत आपली उपयुक्तता सिद्ध केली. दरम्यान, सिद्धेश लाडचे पाच बळी आणि जय बिस्ताच्या नाबाद अर्धशतकामुळे मुंबईने सलामीची लढत 10 विकेटनी जिंकली.

जयपूरला सुरू झालेल्या या स्पर्धेत मुंबईच्या लढतीत पावसाचा व्यत्यय न आल्याने मुंबईला विजयाची औपचारिकता सहज पूर्ण करता आली. अर्थात, या स्पर्धेतील मुंबईची संघनिवड गाजली आणि त्याबद्दल दोन निवड समिती सदस्यही दूर झाले. आता तुषार देशपांडे आणि सुजीत नायक या दोघांना अंतिम संघात स्थान देण्यात आले. त्यापैकी तुषारने तिघांना टिपले. अर्थात सिद्धेश लाडने निम्मा संघ बाद करीत मिझोरामला पाऊणशतकीही मजल मारू दिली नाही.

संक्षिप्त धावफलक- मिझोराम ः 19.3 षटकांत 77 (तरुवर कोहली 26- 31 चेंडूत 3 चौकार, लाल्हमा नागथा 16, पवन प्रसाद 11, धवल कुलकर्णी 3-0-10-1, तुषार देशपांडे 2.3-0-8-2, शम्स मुलानी 4-1-14-1, कृतिक हंगावाडी 2-0-16-0, सिद्धेश लाड 4-1-13-5) पराजित वि. मुंबई ः 8.1 षटकात बिनबाद 78 (जय बिस्ता नाबाद 54- 24 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार, आदित्य तरे नाबाद 22- 25 चेंडूत 3 चौकार).

तुषार देशपांडे, सुजीत नायक हे संघात आल्यामुळे संघ जास्त ताकदवान झाला. त्याचबरोबर चांगले सक्षम सहकारी असल्यामुळे एकंदर संघावरील दडपणही कमी झाले. सलामीच्या लढतीत फारसे आव्हान नव्हते, पण त्या वेळी गाफील राहिलो नाही आणि लढत सहज जिंकलो याचे नक्कीच समाधान आहे.
- विनायक सामंत, मुंबई मार्गदर्शक

मुश्‍ताक अली स्पर्धेतच पृथ्वीचे पुनरागमन?
पृथ्वी शॉ मुश्‍ताक अली स्पर्धेद्वारेच क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्‍यता आहे. उत्तेजक घेतल्याबद्दल पृथ्वीवर असलेली बंदी 15 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यानंतर लगेचच तो 16 नोव्हेंबरच्या सामन्यात खेळू शकेल. आम्ही पहिल्या तीन लढतींसाठीच मुंबईचा संघ जाहीर केला आहे. त्यामुळे पृथ्वीचा विचार नक्की होऊ शकतो, असे मुंबईच्या प्रभारी निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद रेगे यांनी सांगितले. अर्थात पृथ्वी उपलब्ध होण्यापूर्वी मुंबईच्या स्पर्धेतील सहा लढती झालेल्या असतील.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD