दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना आजपासून

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-26 05:25:00

img

पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रोहित स्वतःला आजमावणार, कसोटी संघातील स्थान निश्चितीच्या दिशेनेच प्रवास

विजियानगरम / वृत्तसंस्था

सध्या भारत दौऱयावर असलेल्या दक्षिण आफ्रिकन कसोटी संघाचा आजपासून (दि. 26) बोर्ड अध्यक्षीय एकादश संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना होत असून यात पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रोहित स्वतःला आजमावून पाहील. कसोटी संघात सातत्याने आत-बाहेर प्रवास करणाऱया रोहित शर्मासाठी कसोटी संघातील स्थान निश्चित करण्यासाठी ही मालिका महत्त्वाची संधी मानले जाते. येथील सराव सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ सकाळी 9.30 पासून सुरु होईल.

राष्ट्रीय निवड समिती व संघव्यवस्थापनाने रोहितला कसोटी संघात सलामीवीर या नात्याने बढती देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर पुढील 5 कसोटी सामने रोहितसाठी त्याचा कसोटी क्रिकेटमधील प्रवास कसा असेल, हे ठरवणारे असेल, हे निश्चित झाले. 32 वर्षीय रोहित मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम योगदान देत आला असून आता कसोटी क्रिकेटमध्येही संघाला त्याच्याकडून अशीच बहारदार डावांची अपेक्षा आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये रोहित मयांक अगरवालच्या साथीने सलामीला उतरेल. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी दि. 2 ऑक्टोबरपासून विशाखापट्टणम येथे खेळवली जाणार असून मध्यमगती गोलंदाज उमेश यादवच्या कामगिरीवरही तेथे लक्ष असेल. आघाडीचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराह दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर फेकला गेल्यानंतर त्याच्याऐवजी उमेश यादवची संघात वर्णी लागली आहे.

दक्षिण आफ्रिकन संघातील फॅफ डय़ू प्लेसिस व एडन मॅरक्रम या दिग्गजांचा बचाव भेदण्याची जबाबदारी मुख्यत्वेकरुन उमेशवर असेल. अर्थात, येथे सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी पूर्ण फोकस मात्र रोहित शर्मावरच असणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज असलेल्या रोहितला कसोटीत मात्र सर्वसाधारण कामगिरीवरच समाधान मानावे लागले असून त्याला 27 कसोटीत जेमतेम 39.62 ची सरासरी नोंदवता आली. यात तीन शतकांचा समावेश राहिला.

कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे व वेगाने प्रगतीपथावर असलेल्या हनुमा विहारी यांनी मध्यफळीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले असल्याने या पार्श्वभूमीवर भारतीय संघव्यवस्थापनाच्या दृष्टीने रोहितसाठी सलामी सोडून अन्य कोणत्याही स्थानी खेळवण्याची संधीच नव्हती. दक्षिण आफ्रिकन गोलंदाजी ताफ्यात कॅगिसो रबाडा, व्हरनॉन फिलँडर, लुंगी एन्गिडी यांच्यासारख्या एकापेक्षा एक सरस जलद गोलंदाजांचा समावेश असल्याने विशाखापट्टणम येथील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी हा सराव सामना त्याचे एक प्रकारे ड्रेस रिहर्सलच असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

बोर्ड अध्यक्षीय एकादश : रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अगरवाल, प्रियंक पांचाळ, एआर ईश्वरन, करुण नायर, सिद्धेश लाड, केएस भरत (यष्टीरक्षक), जलज सक्सेना, धर्मेंद्रसिंह जडेजा, अवेश खान, इशान पोरेल, शार्दुल ठाकुर, उमेश यादव.

दक्षिण आफ्रिका कसोटी संघ : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), तेम्बा बवूमा (उपकर्णधार), थेऊनिस डे ब्रुएन, क्विन्टॉन डी कॉक, डीन एल्गार, झुबेर हमझा, केशव महाराज, एडन मॅरक्रम, सेनूरन मुथूसामी, लुंगी एन्गिडी, ऍनरिच नोर्त्झे, व्हरनॉन फिलँडर, डेन पिएडेट, कॅगिसो रबाडा, रुडी सेकंड.

सामन्याची वेळ : सकाळी 9.30 पासून.

बॉक्स

तरीही संघव्यवस्थापनाचे रोहित शर्मालाच प्राधान्य!

प्रचंड वळण्यासाठी ओळखल्या जाणाऱया रेड एसजी, डय़ूक्स किंवा कुकाबुरा चेंडूवरील गोलंदाजीला सामोरे जाताना रोहितच्या तंत्राची कसून परीक्षा होती, त्याची त्रेधातिरपिट उडते, हे यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये बऱयाचदा दिसून आले आहे. पण, वीरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये जे यश संपादन केले, त्याच यशाची विराट कोहली-रवी शास्त्री यांना रोहित शर्माकडून पुनरावृत्ती अपेक्षित असून त्या दृष्टीने त्यांनी रोहितला कसोटीत सलामीला उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ही चाल फळली तर खऱया अर्थाने भारतीय कसोटी क्रिकेटसाठी हा मास्टरस्ट्रोक ठरेल. पण, हा पर्याय फळला नाही तर मात्र संघव्यवस्थापनाला शुभमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, प्रियंक पांचाळ यांचा विचार करावा लागणार आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN