दसरा विशेष : सोनेरी सीमोल्लंघन, पोलिओवर मात करत कर्णधारपद

Loksatta

Loksatta

Author 2019-10-03 21:23:04

img

दसऱ्याला केल्या जाणाऱ्या सीमोल्लंघनाला एकेकाळी विशेष महत्त्व होते. आज काळ बदलला असला, पूर्वीसारखे सीमोल्लंघन केले जात नसले तरी आपल्यात असलेल्या मर्यादा पार करून त्यापलीकडे पोहोचणं, आकाशाला गवसणी घालणारं काहीतरी मिळवणं हेदेखील एक प्रकारचं सीमोल्लंघनच. मानसी जोशी आणि विक्रांत केणी या दोन क्रीडापटूंनी आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करत जागतिक पातळीवर कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या सीमोल्लंघनाच्या निमित्ताने..

दोन महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला उपांत्य फेरीतून गाशा गुंडाळावा लागला; परंतु त्याच इंग्लंडमध्ये भारताच्या अपंग क्रिकेट संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावून डौलाने तिरंगा फडकावला. या यशात मोलाचा वाटा होता तो मराठमोळा कर्णधार विक्रांत केणीचा.

अवघ्या तीन-चार महिन्यांचा असतानाच आलेले अपंगत्व आणि घरची हलाखीची परिस्थिती या आव्हानांवर मात करत विक्रांतने गेल्या काही वर्षांत अपंगांच्या क्रिकेटमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात डावखुऱ्या विक्रांतने पाच सामन्यांत ११५ धावा करतानाच सहा बळीही मिळवले आहेत.

तो सांगतो, ‘‘प्रशिक्षक, निवड समिती आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे आम्ही हे यश मिळवू शकलो. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पाच दिवस अगोदरच आम्ही इंग्लंडला पोहोचून सरावाला सुरुवात केली व त्याचा फायदा आम्हाला स्पर्धेदरम्यान झाला,’’

आपला मुलगा लहानपणापासून क्रिकेट खेळत असला तरी तो कधी भारताला विश्वचषक जिंकून देईल, याची कल्पनाही विक्रांतचे वडील रवींद्र यांनी केली नव्हती. तर भारतीय अपंग संघाचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी विक्रांतची स्तुती करताना ‘‘विक्रांतकडे दडपणाच्या परिस्थितीतही संयम बाळगून अचूक निर्णय घेण्याची क्षमता आहे. खेळाडूंकडून योग्य कामगिरी कशी करवून घेता येईल याची त्याला जाणीव आहे. विशेषत: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने जी खेळी साकारली, ती अविस्मरणीय होती.’’ असे म्हटले आहे. कुलकर्णी यांचे हे शब्द विक्रांतच्या यशाची पोचपावती देतात. विश्वविजेतेपद मिळवून परतल्यानंतर विक्रांतचे पालघर येथे जल्लोषात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.

३३ वर्षीय विक्रांत तारापूर येथील कांबोडे परिसरात राहतो. त्याला बालपणीच पोलिओ झाला होता. त्यामुळे आलेल्या शारीरिक मर्यादा खरं म्हणजे खेळाच्या क्षेत्रासाठी मारक ठरणाऱ्या. घरची परिस्थितीदेखील यथतथाच. वडिलांचा मासेमारीचा व्यवसाय आणि आई गृहिणी. एकूण आठ जणांच्या कुटुंबात विक्रांतचे बालपण कठीण गेले.

नेहमी सामान्य मुलांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या विक्रांतने त्याच्या शारीरिक अपंगत्वाचा परिणाम खेळावर कधीच होऊ दिला नाही. मोठय़ा भावाला क्रिकेट खेळताना पाहून वयाच्या १३व्या वर्षी विक्रांतने क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले. २०१३मध्ये जागतिक शारीरिक तंदुरुस्ती दिनानिमित्त झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याद्वारे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात उजव्या हातावर ताण पडून त्याला खूप त्रास जाणवायचा; परंतु हळूहळू त्याने त्याची इच्छाशक्ती वाढवत नेली. मग हळूहळू तो त्रास जाणवेनासा झाला.

अपंगत्वामुळे विक्रांतला कोठेही काम मिळत नव्हते. मात्र काही वर्षांपूर्वीच डी-डेकोर कंपनीने त्याला क्रिकेटपटू म्हणून व्यावसायिक पातळीवर संधी दिली. आजवरच्या कारकीर्दीत आई-वडील, प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्याव्यतिरिक्त यती साकरे, विवेक कदम, रवी पाटील व राजू सुतार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे विक्रांतने इथवर मजल मारली आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला आदर्श मानणाऱ्या विक्रांतने मुंबईतील कांगा लीग आणि विविध क्लबस्तरीय स्पर्धामध्येही स्वत:चे नाणे खणखणीत वाजवले आहे. त्याच्या या यशामुळेच देशातील किंबहुना विश्वातील अपंगांना त्यांच्या आवडीच्या खेळात कारकीर्द घडवण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळेल.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD