दादाची नवी इनिंग

Dainik Prabhat

Dainik Prabhat

Author 2019-10-20 16:19:00

img

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीची नियुक्‍ती करण्यात आली आहे. भारताच्या एखाद्या माजी कर्णधारास बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपविण्याची घटना 56 वर्षानंतर घडत आहे. पण क्रिकेटपटू आणि प्रशासक या दोन्ही वेगवेगळ्या भूमिका असतात. तसेच गांगुलीकडे अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी केवळ दहाच महिन्याचा कालावधी असणार आहे. या कमी काळातही बीसीसीआयमध्ये चांगले बदल होतील, अशी आशा बाळगली जात आहे.

टीम इंडियाचा दादा सौरभ गांगुली हा बीसीसीआय अध्यक्षाच्या रूपाने नवीन इनिंगला लवकरच सुरवात करत आहे. अर्थात बीसीसीआयच्या इतिहासातील हा गौरवाचा क्षण आहे. कारण भारताच्या एखाद्या माजी कर्णधारास बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपविण्याची घटना 56 वर्षानंतर घडत आहे. यापूर्वी 1954 रोजी विजयनग्राम किंवा विज्जीचे महाराज कुमार यांना बीसीसीआयचे अध्यक्ष केले होते. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी 1936 रोजी इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. सौरभ गांगुलीकडून भारतीय क्रिकेटच्या रचनेत व्यापक बदल होतील अशी अपेक्षा केली जात आहे. “बंगाली टायगर’मुळे बीसीसीआयची डागाळलेली प्रतिमा सुधारेल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

भारतीयांच्या नसानसांत क्रिकेट भिनलेले आहे. भारतातील प्रत्येक व्यक्‍तीला आपला मुलगा, भाऊ हा सचिनप्रमाणे खेळावा, धोनीसारखा षटकार मारावा असे मनोमन वाटत असते. म्हणूनच हजारो खेळाडू एकना एक दिवस भारतीय संघात खेळू या अपेक्षेने मैदानावर येत असतात. दुसरीकडे देशातील सर्वात लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या क्रिकेटचा कारभार हाकणाऱ्या बीसीसीआयची दुरावस्था ही कोणापासून लपलेली नाही. काही काळापूर्वी बंगालचे जगमोहन दालमिया यांनी बीसीसीआयवर हुकुमत गाजवली होती.

बीसीसीआयचे अध्यक्ष होणे ही बाब प्रतिष्ठेचीच नाही तर प्रसिद्धी, पैसा मिळवण्याची खूर्ची म्हणून त्याकडे पाहिले जावू लागले. बीसीसीआयचे मंडळही मर्जीतील असल्याने सर्वांचीच कोणत्या ना कोणत्या पातळीवर मिलिभगत राहिली. संघ निवडीतही हस्तक्षेप होत असल्याने प्रामाणिक खेळाडूंवर अन्याय होत राहिला आणि नको त्या खेळाडूंना अवास्तव महत्त्व दिले गेले. असे असले तरी न्यायालयाने हस्तक्षेप करुनही या संस्थेचे कारनामे सुरूच राहिले. आयपीएलनंतर या खेळावर बदनामीचे डाग येऊ लागले. हा काळिमा मॅच फिक्‍सिंगपर्यंत पोचला. तत्कालिन बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. कारण त्यांचे जावई गुरुनाथ मय्यपन देखील सट्टेबाजात अडकलेले होते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रावरही फिक्‍सिंगचे आरोप लावले गेले. या प्रकरणाची झळ जेव्हा खेळाडूंना बसली तेव्हा मोठ मोठे मासे गळाला लागले. देशभरात संतापाची लाट उसळली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचले. शेवटी बीसीसीआयच्या सुधारणेसाठी लोढा समितीची नेमणुक करण्यात आली. या समितीच्या देखरेखीखाली बीसीसीआयसाठी नवीन घटना लागू झाली. तरीही गैरव्यवहार सुरूच राहिले. नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी शिफारस लोढा समितीने केलेली असतानाही मंडळावर विराजमान असलेल्यांचे नातेवाईक बोर्डाच्या खुर्चीवर ठाण मांडून बसले होते.

क्रिकेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा, अधिकार मिळत असल्याने बीसीसीआय नावाची सोन्याची अंडी देणारी कोंबडी आपल्याकडेच राहवी, असे सर्वच उद्योगपतींना वाटू लागले. खेळाडूंशिवाय असलेल्या बीसीसीआय संस्थेच्या अव्यवस्थापनाचा फटका भारतीय संघालाही बसला. नेते मंडळी आणि उद्योगपती बीसीसीआयच्या खुर्चीवर बसण्यासाठी व्याकूळ असायचे. बीसीसीआयच्या नावाखाली आपला गोरखधंदा सुरू ठेवायचे. शेवटी पाच दशकांनंतर का होईंना एखाद्या खेळाडूची बोर्डावर निवड झाली ही खूपच समाधानाची बाब मानली पाहिजे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने सुमारे दशकापूर्वी संघरूपी डुबत्या नौकेला सुरक्षित ठिकाणी बाहेर काढून यश मिळवण्याचे शिकवले होते. त्याचप्रमाणे बीसीसीआयमध्ये देखील दादा चमत्कार करतील, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून बीसीसीआयकडे पाहिले जाते. बीसीसीआयच्या कामात सुधारणा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मोहिम सुरू असून सहा वर्षात बीसीसीआयची कमालीची पिछेहाट झाली आहे. सध्याची स्थिती पाहिल्यास आजही राज्याच्या क्रिकेट मंडळापासून बीसीसीआयच्या पदावर तेच चेहरे विराजमान आहेत की त्यांना रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि लोढा समिती आटापिटा करत आहे.

बीसीसीआयच्या प्रशासन आणि कामकाजाच्या पद्धतीत सुधारणा आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने माजी ऑडीटर जनरल विनोद राय यांची प्रशासकीय समिती नेमली होती. मात्र आज पदरात काय पडले? आजही निवड समितीत एकही असा खेळाडू नाही की तो खेळाडू म्हणून अनुभवी असेल. गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण टीम इंडिया ही कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याभोवती घुटमळत आहे. म्हणूनच याकाळात भारतीय संघ कोणताही मोठा किताब किंवा स्पर्धा जिंकू शकली नाही. सौरभ गांगुलीच्या क्षमतेवर शंका घेण्याचे कारण नाही.

टीम इंडियाचे कर्णधारपद भूषविल्यानंतर तो पाच वर्षापासून बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवित आहे. त्याच्या कार्यकाळात पश्‍चिम बंगालच्या क्रिकेटमध्ये आमुलाग्र बदल झाले आहेत. सौरभ गांगुलींनी देखील मनाशी काही खूणगाठ बांधली आहे, परंतु वाटते तेवढे सोपे नाही. जर बीसीसीआयचे पदाधिकारी पाहिले तर त्यात अमित शहांचा मुलगा आहे तर दुसरीकडे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ आहेत. दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे लोढा समितीच्या शिफारशीनुसार सौरभ गांगुलीकडे अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी केवळ दहाच महिन्याचा कालावधी मिळेल. हा खूपच कमी काळ आहे. परंतु सौरभ गांगुलीमुळे कमी काळातही बीसीसीआयमध्ये चांगले बदल होतील, अशी आशा बाळगली जात आहे.

सौरभ गांगुली हे समृद्ध कुटुंबात जन्मले आणि या खेळाडूने आपला स्वत:चा मार्ग निवडला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मणसारख्या खेळाडूंबरोबर त्याने स्वत:ची ओळखही निर्माण केली. साहस आणि आक्रमकता हे सौरभच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्ये आहे. याच नेतृत्वाने पुढे एम.एस धोनीसाठी मार्ग तयार केला. प्रिन्स ऑफ कोलकता, द महाराजा, द गॉड ऑफ द ऑफ साइड, दादा, द वॉरियर प्रिन्स अशा नावाने देखील सौरभला ओळखतात. सौरभने आंतरराष्ट्रीय क्रिकेटध्ये 11 हजारांवरून अधिक धावा काढल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 49 पैकी 21 सामने जिंकले आहेत. गांगुलीच्या कर्णधारपदाच्या काळात भारतीय संघ हा आठव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोचला होता.

2002 मध्ये विस्डेन क्रिकेटच्या निरीक्षकांनी त्याला जगातील सहावा सर्वोत्तम फलंदाज म्हणून गौरविले होते. त्यापूर्वी सचिन तेंडुलकर, रिचर्डस, ब्रायन लारा, डिन जोन्स, मायकल बेव्हन यासारख्या मातब्बर फलंदाजांना हा मान मिळाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार असताना तो सर्वांना सोबत घेऊन चालायचा. सौरभच्या स्वभावाचे वैशिष्ट्ये म्हणजे संघातील कोणताही खेळाडू त्याच्याकडे नाराजी व्यक्‍त करायचा आणि त्यावर सौरभदादा तोडगा काढायचे. बीसीसीआयचा कारभार एखाद्या माजी खेळाडूकडेच सोपवावा अशी क्रिकेट तज्ञांकडून नेहमीच मागणी राहिली आहे. कारण मैदानावर आणि मैदानाबाहेरच्या अडचणी तो समर्थपणे सोडवू शकतो, असे तज्ञांना वाटायचे. आता सौरभ चंडीदास गांगुली हा सप्टेंबर 2020 पर्यंत बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर असणार आहे. बीसीसीआयच्या कारभाराला शिस्त लावण्याबरोबरच संघाची कामगिरी उंचावण्यासाठी देखील त्याची निवड फायद्याची ठरू शकते.

सरोजिनी घोष
कोलकाता

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN