दिल्लीतील पहिल्या टी-20 सामन्यावर प्रदूषणाचे सावट

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-27 06:04:00

img

दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणात प्रचंड भर पडण्याचे संकेत

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

राजधानीतील प्रदूषित हवा, ही यापूर्वीचीच जटिल समस्या ठरत आली असून त्यात आता दिवाळीत होणाऱया फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आणखी भर पडणार आहे. साहजिकच, दि. 3 नोव्हेंबर रोजी भारत-बांगलादेश यांच्यात फिरोजशाह कोटला मैदानावर प्रदूषणाचे सावट असल्याने आयोजक चिंतेत आहेत.

यापूर्वी डिसेंबर 2017 मध्ये फिरोजशाह कोटला मैदानावर कसोटी सामन्यादरम्यान लंकन क्रिकेटपटूंनी श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याची तक्रार केली. त्यावेळी काही खेळाडूंनी मास्क परिधान केले होते तर काही खेळाडू आजारीही पडले होते. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची रोटेशन पॉलिसी आणि भारत दौऱयावर येणाऱया बांगलादेशी क्रिकेट संघाच्या प्रवासाची दिशा, यानुसार या दौऱयातील पहिला कसोटी सामना दिल्लीमध्ये घेणे भाग पडले. आता मात्र आयोजकांनी नशिबावर भरवसा ठेवत ही लढत निर्धोकपणे पार पडेल, अशी भाबडी अपेक्षा नोंदवली आहे.

दिवाळीला काही दिवसांचा अवधी बाकी असताना एअर क्वॉलिटी इंडेक्स (एक्यूआय) अतिशय खराब होता. एक्यूआयच्या स्तरमापनानुसार 0-50 हा इंडेक्स उत्तम, 51 ते 100 समाधानकारक, 101-200 साधारण, 201 ते 300 खराब व 301 ते 400 सर्वात खराब असे मानले जाते. ही पातळी 400 च्या वर पोहोचल्यास सदर हवामान तब्येतीसाठी धोकादायक असते. गुरुवारी सकाळी 8.30 वाजता दिल्ली विद्यापीठ परिसरात ही पातळी 357 वर होती. म्हणजेच अगदी सध्याचे दिल्लीतील हवामानही अतिशय खराब स्वरुपाचे आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व दिल्ली क्रिकेट संघटना यांनी याबाबत बोलताना प्रदूषण आटोक्यात ठेवणे नियंत्रणाबाहेर असल्याचे कबूल केले आणि सामना निर्धोक पार पडावा, इतकीच आपण अपेक्षा करु शकतो, हे नमूद केले. मात्र, यापूर्वीचा अनुभव आणि लंकन क्रिकेटपटूंच्या प्रतिसादामुळे इथली प्रतिमा पुरती डागाळली असताना तरीही बीसीसीआय रोटेशन पॉलिसीत बदल करत हा सामना दिल्लीऐवजी अन्यत्र का खेळवू शकली नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

बांगलादेशचा संघ थेट दिल्लीत दाखल होईल आणि कोलकात्यातून मायदेशी रवाना होईल, याप्रमाणे प्रवासाची रुपरेषा आखली गेली. उत्तरेपासून सुरुवात आणि त्यानंतर पश्चिम (नागपूर, राजकोट, इंदोर) व नंतर पूर्वेकडे सांगता (कोलकाता) असे याचे स्वरुप आहे, असे बीसीसीआयतर्फे यावेळी सांगण्यात आले. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बांगलादेशी खेळाडूंना मास्क सोबत ठेवण्याची सूचना केली जाईल, असे सध्याचे संकेत आहेत.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN