दिल्लीतील प्रदूषण, भारताचे बांगलादेशपुढे आव्हान

Indian News

Indian News

Author 2019-11-03 07:47:03

img

नवी दिल्ली : गेले काही दिवस दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि हवेची खालावलेली पातळी हा चर्चेचा विषय झाला असताना, पाहुण्या बांगला देशपुढे टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात आज रविवारी मुख्य आव्हान असेल ते प्रदूूषण तसेच बलाढ्य भारतीय संघावर मात करण्याचेच. ही मालिका उभय संघांसाठी पुढील वर्षी आॅस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी संघबांधणीचा एक भाग मानला जात आहे.

राजधानीतील हवा जीवघेणी बनली असल्याने शाळांना सुटी घोषित करण्यात आली. दुसरीकडे आधीचा कटू अनुभव पाठीशी असताना बीसीसीआयच्या रोटेशन पद्धतीमुळे हा सामना येथेच खेळणे अनिवार्य झाले आहे. लंकेविरुद्ध दोन वर्षांआधी अशाच परिस्थितीत येथे कसोटीचे आयोजन झाले होते.

त्यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंना त्रास झाला होता. यंदादेखील पर्यावरण तज्ज्ञांनी दूषित हवेत सामना आयोजित करू नये, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
तथापि, अशा परिस्थितीवर मात करण्याचा विश्वास दोन्ही संघातील खेळाडूंनी व्यक्त केला. बांगला देशच्या खेळाडूंनी मास्क घालून सराव केला खरा; पण आमच्या खेळाडूंसाठी प्रदूषण हा मुद्दा नाहीच, असे पाहुण्या संघाचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी आधीच स्पष्ट केले. भारताचे फलंदाजी कोच विक्रम राठोड यांनीही मैदानावर उतरल्यानंतर हा मुद्दा राहणार नसल्याचे म्हटले आहे.

भारताचेच वर्चस्व...
नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिल्याने रोहित शर्मा नेतृत्व करेल. उभय संघात आतापर्यंत झालेल्या आठही टी-२० सामन्यात भारताने बाजी मारली. अष्टपैलू शाकिब अल हसनच्या अनुपस्थितीत पुन्हा एक विजय मिळेल, याबद्दल भारतीय खेळाडू निर्धास्त आहेत. कोहलीच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल तिसऱ्या स्थानावर खेळेल. संजू सॅमसन हा देखील तिसऱ्या स्थानासाठी उत्तम पर्याय आहे. श्रेयस अय्यर, मनीष पांडे यांना मालिकेत चांगली संधी असून, सर्वांचे लक्ष असेल ते यष्टिरक्षक ऋषभ पंतवर. पंतला यष्टिरक्षण आणि फलंदाजी या दोन्ही आघाडीवर सरस कामगिरी करावीच लागेल.
हार्दिक पांड्या तसेच रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत अष्टपैलूत्व सिद्ध करण्याची संधी शिवम दुबेकडे असेल. बांगला देशचा कर्णधार महमुदुल्लाह आणि कोच डोमिंगो यांनी खेळाडूंना निराश न होता खेळण्याचे आवाहन केले आहे. भारताने मागील ज्या सहा सामन्यात आधी फलंदाजी केली त्यातील चार सामने गमावले, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे. (वृत्तसंस्था)

उभय संघ यातून निवडणार
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कृणाल पांड्या, खलील अहमद, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, राहुल चाहर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर.

बांगलादेश : महमूदुल्लाह (कर्णधार), लिटन दास, सौम्या सरकार, नईम शेख, मुशफिकुर रहीम, मोहम्मद मिथून, आफिफ हुसेन, मोसद्देक हुसेन,अमीन इस्लाम, अराफात सनी, तयाजुल इस्लाम, मुस्तफिजूर रहमान, शफीउल इस्लाम, अबू हैदर, अल अमीन हुसेन.

आता लक्ष क्रिकेटवर : महमुदुल्लाह
बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाह रियादने आता खेळावर लक्ष देण्याची वेळ असून वातावरणावर आपले नियंत्रण नसल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला,'आम्ही या स्थितीवर चर्चा केली आहे. हे आमच्या नियंत्रणात नाही. आम्ही रविवारी होणारा सामना व त्यात विजय मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही येथे खेळलेलो नाही. ज्यावेळी आम्ही येथे आलो त्यावेळी धुके होते आणि याची आम्हाला कल्पना आहे.तीन दिवसांपासून सराव करीत असून परिस्थितीसोबत जुळवून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दुबेला पदार्पणाची संधी
भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने शनिवारी संकेत दिले की, मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबे याला रविवारी बांगलादेशविरुद्धच्या सलामी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पणाची संधी मिळू शकते. कर्णधाराने युवा दुबे व संजू सॅम्सन यांची प्रशंसा केली. या दोघांपैकी एक खेळाडू अंतिम अकरामध्ये खेळताना दिसू शकतो.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN