दिल्लीतील सामना ठरल्याप्रमाणे होणार

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-01 03:07:00

img

नवी दिल्ली :

राजधानी दिल्लीतील हवा प्रदूषित झालेली असली तरी भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्माला या सामन्यावेळी प्रदूषणाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नसल्याचे वाटते. रविवारी 3 नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध येथे पहिला टी-20 सामना होणार आहे. हा सामना अन्यत्र घेण्याबाबत मागणी केली जात होती. पण बीसीसीआयने ती शक्यता फेटाळून लावली आहे.

येथील फिरोजशहा कोटला मैदानावर बांगलादेश संघाने पहिले सराव सत्र आयोजित केले होते. त्यावेळी त्यांचा फलंदाज लिटन दास दूषित हवेचा प्रभाव टाळण्यासाठी फेसमास्क लावून सराव करताना दिसून आला. मात्र भारतीय कर्णधार रोहितने ही अति चिंताजनक बाब नसल्याचे म्हटले आहे. माजी क्रिकेटपटू व आता खासदार बनलेल्या गौतम गंभीरने तसेच पर्यावरणवाद्यांनी दिल्लीतील हवेच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. मात्र हा सामना कोणत्याही परिस्थिती ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे बीसीसीआयने याआधीच स्पष्ट केले आहे.

‘मी नुकताच येथे दाखल झालो असून स्थिती अजून अंदाज घेतलेला नाही. 3 तारखेला सामना होणार असून तो ठरल्याप्रमाणे खेळविला जाणार आहे, एवढेच मी सध्या सांगू शकतो,’ असे रोहितने सांगितले. नियमित कर्णधार कोहलीला या मालिकेत विश्रांती देण्यात आली असल्याने रोहितकडे हंगामी नेतृत्व सोंपविण्यात आले आहे. ‘लंकेविरुद्ध आम्ही येथे कसोटी खेळली आहे. त्यावेळी आम्हाला कोणतीही समस्या आली नव्हती. प्रदूषणासंदर्भात नेमकी काय चर्चा सुरू आहे, याची मला माहिती नाही. पण मला मात्र कोणतीही अडचण आलेली नाही,’ असेही तो म्हणाला.

रोहितने ज्या कसोटीचा उल्लेख केला तो सामना 2017 मध्ये या ठिकाणी झाला होता. लंकेविरुद्धच्या तिसऱया कसोटीवेळी लंकन संघातील खेळाडूंनी फेस मास्क लावला होता. याशिवाय दाट धुके आणि हवेचा खालावलेला दर्जा यामुळे 20 मिनिटे खेळही थांबवण्यात आला होता. वर्षाच्या या कालावधीत दिल्लीतील हवेचा दर्जा सुमार असतो आणि दिवाळी सणामुळे त्याचा दर्जा आणखी खालावत असतो.  दिल्लीपासून जवळच असलेल्या पंजाब व हरियाणा राज्यात शेतात पिकांच्या कापणीनंतर राहिलेले गवत जाळण्यात येते, त्याचाही दिल्लीतील हवेच्या दर्जावर परिणाम होत असतो.

गुरुवारी बांगलादेश संघाने सरावाला सुरुवात केली. त्यावेळी लिटन दासने सुमारे दहा मिनिटे मास्क घातला होता. पण तो प्रदूषणामुळे घातला नव्हता, असे त्याने नंतर स्पष्ट केले. मात्र दाट धुके मैदानावर दिसत असले तरी त्यांच्या अन्य कोणत्याही खेळाडूने मास्क घातला नव्हता. लिटन दासने फलंदाजीचा सराव करताना मात्र मास्क वापरला नव्हता.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN