दुसऱया वनडेत भारतीय महिलांचा विंडीजला दणका

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-05 05:19:00

img

53 धावांनी मात, पूनम राऊतचे अर्धशतक, मिताली-हरमनप्रीतची फटकेबाजी

वृत्तसंस्था /नॉर्थ साऊंड (वेस्ट इंडिज)

मुंबईकर पुनम राऊतचे अर्धशतक आणि कर्णधार मिताली राज-हरमनप्रीत कौरच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारतीय महिलांनी दुसऱया वनडे सामन्यात 53 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. प्रारंभी, भारतीय महिलांनी 50 षटकांत 6 बाद 191 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीज संघाचा डाव 47 षटकांत 138 धावांवर आटोपला. आता, उभय संघातील तिसरा व अंतिम सामना दि. 7 रोजी होईल.

नाणेफेक जिंकून भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर प्रिया पुनिया (5) आणि जेमिमा रॉड्रीग्ज (0) या झटपट माघारी परतल्या. यानंतर पुनम राऊत आणि मिताली राज यांनी तिसऱया गडय़ासाठी 66 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पूनमने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 128 चेंडूत 4 चौकारासह 77 धावा फटकावल्या. मिताली राजने 40 धावा करत तिला चांगली साथ दिली. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असताना मितालीला गिरीमोर्डने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर, पूनमने हरमनप्रीतसोबत 93 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला 191 धावांचा टप्पा गाठून दिला. हरमनप्रीतने 52 चेंडूत 4 चौकारासह 46 धावा केल्या.  विंडीजकडून आलिया ऍलेन व ऍफी फ्लेचर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

भारतीय गोलंदाजासमोर विंडीज फलंदाजांचे लोटांगण

विजयी आव्हानाचा पाठलाग करताना राजेश्वरी गायकवाड (27 धावांत 2), पूनम यादव (26 धावांत 2) तर दीप्ती शर्मा (25 धावांत 2 बळी) यांच्या भेदक माऱयासमोर एकाही विंडीज महिला फलंदाजाला मैदानावर टिकाव धरता आला नाही. विंडीज संघाचा डाव 47 षटकांत 138 धावांवर संपुष्टात आला. कर्णधार सारा टेलर (20) आणि शेमिन कँपबेल (39) यांनी काहीकाळ भारतीय गोलंदाजांचा सामना करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही अपयश आले. यानंतर इतर फलंदाजांनी हजेरी लावण्याचे काम केल्याने विंडीज संघाला 53 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

संक्षिप्त धावफलक : भारतीय महिला संघ 50 षटकांत 6 बाद 191 (पूनम राऊत 77, मिताली राज 40, हरमनप्रीत कौर 46, ऍलेन 2/38, फ्लेचर 2/32).

विंडीज महिला संघ 47 षटकांत सर्वबाद 138 (कॅम्पबेल 39, सारा टेलर 20, मॅक्लेन 15, राजेश्वरी 2/27, पूनम यादव 2/26, दीप्ती शर्मा 2/25).

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN