देवधर चषक स्पर्धेत भारत ब अजिंक्य

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-05 05:21:00

img

अंतिम लढतीत भारत क संघाला 51 धावांनी नमवले

रांची / वृत्तसंस्था

केदार जाधवची 86 धावांची तडफदार खेळी व डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमच्या 4 बळींमुळे भारत ब संघाने देवधर चषक स्पर्धेच्या जेतेपदावर आपले नाव कोरले. सोमवारी येथे झालेल्या अंतिम लढतीत ब संघाने क संघाचा 51 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारत ब संघाने खराब सुरुवातीनंतरही 7 बाद 283 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली तर प्रत्युत्तरात भारत क संघाला 9 बाद 232 धावांवरच थांबावे लागले.

भारत ब संघाने धावांचा डोंगर उभा केला, त्यात केदार जाधवचा 86 धावांचा झंझावात व यशस्वी जैस्वालची 54 धावांची खेळी निर्णायक ठरली. याशिवाय, तळाच्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या विजय शंकरने 33 चेंडूत जलद 45 धावांचे योगदान दिले. पुढे गोलंदाजीत भारत ब संघाने क संघाला 232 धावांवर रोखले, त्यात शाहबाज नदीम (4-32), मोहम्मद सिराज (2-43) यांचा वाटा मोलाचा ठरला.

शुभमन सर्वात युवा कर्णधार

भारत क संघाचे नेतृत्व भूषवणारा शुभमन गिल देवधर चषक स्पर्धेच्या फायनलमधील आजवरचा सर्वात युवा कर्णधार ठरला. या निकषावर त्याने विराट कोहलीचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. पण, तो स्वतः येथे एका धावेवर बाद झाला. तो तंबूत परतल्यानंतर मयांक अगरवाल (28) व प्रियम गर्ग (74) यांनी 54 धावांची भागीदारी साकारली. मयांकला नंतर 12 व्या षटकात नदीमने बाद केले. पुढील षटकातच विराट सिंगला ऋतुराज गायकवाड व अक्षर पटेल यांनी धावबाद केले तर सुर्यकांत यादव नदीमच्या डावातील 16 व्या षटकात बाद होण्यापूर्वी दुहेरी धावसंख्याही गाठू शकला नाही. 10 चेंडूत 3 धावांसह अनुभवी दिनेश कार्तिकने निराशा केली आणि यामुळे भारत क संघाची 18 षटकात 5 बाद 77 अशी दाणादाण उडाली होती.

मागील सामन्यातील हिरो अक्षर पटेलने पुढे गर्गसह 63 धावा जोडल्या. पण, गर्गला सिराजने बाद केले आणि क संघाचा संघर्ष जवळपास संपुष्टात आला. जलज एस. सक्सेना (नाबाद 36) व मयांक मार्कंडे (27) यांनी संघाला 200 धावांचा टप्पा सर करुन दिला. पण, प्रत्येक षटकामागे 10 धावा फटकावण्याचे आव्हान असताना त्यांच्या प्रयत्नांवर बऱयाच मर्यादा राहिल्या. अंतिमतः क संघाला निर्धारित षटकात 9 बाद 232 धावांवर समाधान मानावे लागले.

इशानचे 5 बळी

तत्पूर्वी, मध्यमगती गोलंदाज इशान पोरेलने 43 धावात 5 बळी घेतले. पण, तरीही भारत ब संघाने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली होती. पोरेलने ऋतुराज गायकवाडला (0) पहिल्या षटकात तर कर्णधार पार्थिव पटेलला (14) नवव्या षटकात बाद केले व यामुळे ब संघाची 2 बाद 28 अशी स्थिती होती. सक्सेनाने 21 व्या षटकात बाबा अपराजितला (13) बाद करत आणखी खळबळ उडवून दिली. जैस्वालने 79 चेंडूत 54 धावा जमवल्यानंतर संघाने 100 धावांच्या उंबरठय़ापर्यंतचा टप्पा सर केला. अक्षर पटेलने त्याला 25 व्या षटकात बाद केले, त्यावेळी ब संघाच्या फलकावर 4 बाद 92 धावा होत्या.

राणा-जाधवची भागीदारी

पुढे, नितीश राणा (20) व जाधव यांनी 79 धावांची भागीदारी साकारली. पोरेलने पुन्हा यश संपादन करत राणाला बाद केले व यामुळे 39 षटकात 171 धावांवर ब चा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र, शंकर हा जाधवच्या साथीला येत 74 धावा जोडण्यात यशस्वी झाल्याने संघाला पावणेतीनशे धावांचा टप्पा सर करता आला. शंकरने त्याच्या डावात 4 चौकार व 2 षटकार खेचले. डावातील शेवटच्या अर्थात, 50 व्या षटकात तो बाद झाला. पण, यापूर्वी त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती.

संक्षिप्त धावफलक

भारत ब : 50 षटकात 7 बाद 283. (केदार जाधव 94 चेंडूत 4 चौकार, 4 षटकारांसह 86, यशस्वी जैस्वाल 79 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 54, विजय शंकर 33 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 45, कृष्णप्पा गौतम 10 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 35. अवांतर 16. इशान पोरेल 10 षटकात 43 धावात 5 बळी, जलज, अक्षर प्रत्येकी 1 बळी).

भारत क : 50 षटकात 9 बाद 232 (प्रियम गर्ग 77 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 74, जलज सक्सेना 65 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 37, मयांक मार्कंडे 35 चेंडूत 3 चौकारांसह 27, अक्षर पटेल 49 चेंडूत 38, मयांक अगरवाल 31 चेंडूत 3 चौकारांसह 28. अवांतर 4. शाहबाज नदीम 10 षटकात 32 धावात 4 बळी, मोहम्मद सिराज 10 षटकात 2-43, कलारिया 1-56).

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD