द. आफ्रिकेच्या ‘व्हॉईटवॉश’साठी भारत सज्ज

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-19 06:21:00

img

रांचीत तिसरी औपचारिक कसोटी आजपासून

@ रांची / वृत्तसंस्था

यजमान भारत आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱया व औपचारिक कसोटी सामन्यात मैदानात उतरेल, त्यावेळी आफ्रिकेचा व्हॉईटवॉश करत विश्व कसोटी चॅम्पियनशिपमधील महत्त्वाचे गुण संपादन करणे, हेच त्यांच्यासमोरील एकमेव लक्ष्य असेल. येथे विजय संपादन करता आल्यास भारत 3-0 अशा एकतर्फी फरकाने बाजी मारेल. शिवाय, 3 सामन्यांच्या मालिकेत विश्व चॅम्पियनशिपमधील उर्वरित 40 गुणही प्राप्त करेल. सकाळी 9.30 वाजता पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्व आघाडय़ांवर वर्चस्व गाजवताना भारताने या मालिकेत विशाखापट्टणम येथील पहिली कसोटी 203 धावांनी जिंकली तर पुणे येथील गहुंजे स्टेडियमवरील दुसरी कसोटी एक डाव व 137 धावांच्या आणखी एका बडय़ा फरकाने जिंकली. तोच कित्ता येथेही जिंकण्याचा विराटसेनेचा प्रयत्न असणार आहे.

भारत 140 गुणांनी आघाडीवर

सध्याच्या घडीला विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या खात्यावर 4 सामन्यात 200 गुण असून विराटसेना नजीकचे प्रतिस्पर्धी न्यूझीलंड, श्रीलंकेपेक्षा तब्बल 140 गुणांनी आघाडीवर आहेत. कर्णधार विराट कोहलीने मात्र तरीही तिसरी व शेवटची कसोटी जिंकत ही आघाडी आणखी भक्कम करण्याकडे आपला कल असेल, असे स्पष्ट केले.

सलामीवीर रोहित शर्माच्या बहारदार फॉर्ममुळे भारताची आघाडी फळी आणखी मजबूत झाली असून पहिल्या कसोटीतील दोन्ही डावातील त्याची तडफदार शतके लक्षवेधी ठरली. मयांकनेही त्याला समयोचित साथ दिली. त्यानंतर किंग कोहलीने पुण्यात नाबाद 254 ही कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारत आपली हुकूमत नव्याने अधोरेखित केली होती. या मालिकेत दोन अर्धशतके झळकावणारा चेतेश्वर पुजारा येथे शतकावर कब्जा करण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरला तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल.

मालिकेत भारताचे फक्त 16 गडी बाद

मालिकेतील पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे डाव सपशेल गडगडत राहिले आहेत तर भारताने मात्र अवघे 16 बळी गमावले आहेत. भारतासाठी नाणेफेकीचा कौल अनुकूल लागत आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ मागील वेळी भारत दौऱयावर आला, त्यावेळी सर्व खेळपट्टय़ा फिरकीला पोषक होत्या. पण, फिरकीपटूंप्रमाणेच मध्यमगती-जलद गोलंदाजांचाही त्याच्यावर वरचष्मा राहिला होता. या मालिकेत पुण्यातील कसोटीत उमेश यादवने 22 धावात 3 बळी घेत उत्तम पुनरागमन नोंदवले होते.

तळाच्या फलंदाजांकडूनच प्रतिकार

वास्तविक, विशाखापट्टणम येथील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी थोडाफार तरी संघर्ष केला होता. पण, त्यानंतर पुण्यातील दुसऱया कसोटीत त्यांनी अक्षरशः लोटांगण घातले आणि भारताने तेथे डावाने विजय संपादन करत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली होती. पुण्यात आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांनीच प्रतिकार साकारला होता. आफ्रिकन कर्णधार डय़ू प्लेसिसने डीन एल्गार, क्विन्टॉन डी कॉक व तेम्बा बवूमा यांच्याकडून अधिक जबाबदारीने फलंदाजीची अपेक्षा नोंदवली आहे.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), तेम्बा बवूमा (उपकर्णधार), थेयूनिस डे ब्रुएन, क्विन्टॉन डी कॉक, डीन एल्गार, झुबएर हमझा, जॉर्ज लिन्डे, सेनूरन मुथूसामी, लुंगी एन्गिडी, ऍनरिच नॉर्त्झे, व्हरनॉन फिलँडर, डेन पिएडेट, कॅगिसो रबाडा, रुडी सेकंड.

सामन्याची वेळ : सकाळी 9.30 पासून. 

दुखापतींमुळे आफ्रिकेच्या अडचणीत आणखी भर

एकीकडे, मालिकेत 0-2 अशा फरकाने पिछाडीवर असताना दक्षिण आफ्रिकेसमोर या कसोटी सामन्यापूर्वी अडचणीत आणखी भर पडली आहे. सलामीवीर एडन मारक्रम दुखापतीमुळे या कसोटीतून बाहेर फेकला गेला असून सर्वात अनुभवी फिरकीपटू केशव महाराज देखील येथे खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कॅगिसो रबाडा, व्हरनॉन फिलँडर, ऍनरिच नॉर्त्झे फारसे परिणामकारक ठरले नसल्याने यामुळेही दक्षिण आफ्रिकेला अपेक्षित लढा साकारता आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

नेतृत्व प्लेसिसकडेच….पण, नाणेफेकीला मात्र सहकाऱयाला पाठवणार?

आशियाई खंडात झालेल्या क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकन कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस एकदा-दोनदा नव्हे तर सलग 9 वेळा नाणेफेकीचा कौल जिंकू शकलेला नाही. हा दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी प्लेसिस येथे आपल्याच एखाद्या सहकाऱयाला नाणेफेकीसाठी धाडण्याची शक्यता आहे. स्वतः प्लेसिसनेच असे संकेत दिले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करता आली तर या कसोटीत काहीही होऊ शकते, असा गर्भित इशारा येथे प्लेसिसने दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेला भारतीय वातावरणात सातत्याने झगडावे लागले असून विशाखापट्टणम व पुणे येथील दोन्ही लढतीत नाणेफेकीचा कौल प्रतिकूल लागला असल्याने याचाही त्यांना फटकाच बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागावा, या दृष्टिकोनातून प्लेसिस नाणेफेकीला आपण न जाता आपल्या सहकाऱयाला धाडणार का, याची आज उत्सुकता असेल.

कोटस

संघात यष्टीरक्षकाच्या जागेसाठी माझी ऋषभ पंतशी स्पर्धा जरुर आहे. पण, यानंतरही आम्हा दोघांमध्ये उत्तम मैत्री आहे. विविध प्रकारच्या खेळपट्टय़ांवर यष्टीरक्षणातील आव्हाने कशी बदलतात, याविषयी आम्ही प्रशिक्षण पथकातील पदाधिकाऱयांशी सातत्याने चर्चा करत असतो.

-यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD