धीरज सिंगची प्रथमच वरिष्ठ संघात निवड

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-07 05:41:00

img

विश्वचषक पात्रता लढतीसाठी 26 सदस्यीय संघाची घोषणा

वृत्तसंस्था/ कोलकाता

युवा गोलरक्षक धीरज सिंग मोइरंगथेमला राष्ट्रीय संघात प्रथमच स्थान मिळाले असून प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमाक यांनी विश्वचषक पात्रता लढतीसाठी 26 जणांचा संघ घोषित केला आहे. अफगाणिस्तान व ओमान यांच्याविरुद्ध या लढती दुशनबे (ताजिकिस्तान) व मस्कत (ओमन) येथे अनुक्रमे 14 व 19 नोव्हेंबर रोजी होणार आहेत.

2017 मध्ये भारतात झालेल्या फिफा यू-17 विश्वचषक स्पर्धेत धीरजने गोलरक्षणात अप्रतिम कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या स्पर्धेत खेळलेल्या कर्णधार अमरजित सिंग व बचावपटू अन्वर अली या अन्य दोघांनाही वरिष्ठ संघात पहिल्यांदा संधी मिळाली आहे. ‘धीरज हा भविष्यातील खेळाडू असून युवा खेळाडूंवर आम्ही नेहमीच विश्वास दाखविला आहे. त्यांनी आपली क्षमता प्रत्यक्ष मैदानातही वेळोवेळी दाखवून दिली आहे. गुरप्रीत व अमरिंदर यांना गोलरक्षक म्हणून पहिली पसंती असेल. याशिवाय कलमजित व विशाल यांचा खेळही पाहिला आहे. धीरजलाही आम्ही आजमावून पाहणार आहोत कारण भविष्यात त्याच्यावर विसंबून रहावे, अशी क्षमता असणारा तो खेळाडू आहे,’ असे प्रशिक्षक स्टिमाक म्हणाले.

दोन्ही सामने प्रतिस्पर्ध्यांच्या भूमीत असल्याने खेळाडूंना प्रवासाची दगदग होणारच आहे. त्यामुळे या दोन्ही लढती सहज सोप्या असणार नाहीत, असे स्टिमाक यांना वाटते. ‘मात्र आम्ही व्यावसायिक खेळाडू असल्याने शरीराची कशी काळजी करावी, याची चांगली जाणीव आहे. प्रवास, जेवण्, झोप या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरणाऱया असतात,’ असे कर्णधार सुनील छेत्री म्हणाला. खेळाडूंमध्ये चुरस असल्याने खेळाडूंची छाननी करून संघ निवडणे अवघड जाणार असल्याचे स्टिमाक यावेळी म्हणाले.

स्टिमाक यांनी घोषित केलेला संघ : गोलरक्षक-गुरप्रीत सिंग संधू,अमरिंदर सिंग, धीरज सिंग. बचावपटू-प्रीतम कोटल, निशू कुमार, राहुल भेके, अनास इदाथोडिका, नरेंदर, आदिल खान, सार्थक गोलुइ, सुभाषिश बोस, मंदार राव देसाई. मध्यफळी-उदांता सिंग, जॅकिचंद सिंग, सीमिनलेन डुंगेल, रेनियर फर्नांडीस, विनित राय, साहल अब्दुल समद, प्रणय हलदर, अनिरुद्ध थापा, लालरिनझुआला छांगटे, ब्रँडन फर्नांडीस, आशिक कुरुनियन. आघाडी फळी-सुनील छेत्री, फारुख चौधरी, मनविर सिंग.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD