पंजाबकडून विदर्भ पराभूत

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-01-17 03:59:56

img

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : फिरकीपटू करण कैलाच्या भेदक माऱ्यानंतर गुरकिरत मान व अनमोलप्रीत सिंगच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पंजाबने विजय हजारे करंडक (एलिट "ब' गट) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील चौथ्या साखळी सामन्यात विदर्भाचा सात गड्यांनी पराभव केला. या पराभवामुळे विदर्भाचा बादफेरीचा मार्ग थोडा कठीण झाला आहे.
बडोदा येथील एसजीएसए क्रिकेट मैदानावर शनिवारी खेळल्या गेलेल्या या एकतर्फी सामन्यात विदर्भाने दिलेले 156 धावांचे माफक लक्ष्य पंजाबने 46.2 षटकांत केवळ तीन गडी गमावून सहज गाठले. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या गुरकिरत मानने पाच चौकार व एका षटकारासह 85 चेंडूत नाबाद 51 आणि अनमोलप्रीत सिंगने चार चौकारांसह 98 चेंडूत नाबाद 42 धावा फटकावून पंजाबला दिमाखदार विजय मिळवून दिला. याशिवाय सलामीवीर अभिजित शर्माने 33 व प्रभसिमरन सिंगने 22 धावांचे योगदान दिले. विदर्भाकडून फिरकीपटू अक्षय वखरेने दोन व अक्षय कर्णेवारने एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, पंजाबने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाचा डाव 43.1 षटकांत अवघ्या 155 धावांत संपुष्टात आला. कर्णधार फैज फजलने एकाकी झुंज देत सहा चौकार व एका षटकारासह 96 चेंडूंत सर्वाधिक 72 धावा केल्या. मधल्या फळीतील रिषभ राठोडने 26, जितेश शर्माने 16 आणि श्रीकांत वाघने 15 धावांचे योगदान दिले. अनुभवी वसीम जाफर, गणेश सतीशसह अन्य फलंदाज दुहेरी आकड्यात धावा करू शकले नाही. पंजाबचा फिरकीपटू करण कैलाने 32 धावांत सर्वाधिक चार गडी बाद केले. संदीप शर्मा व मनदीपसिंगने प्रत्येकी दोन गडी बाद केले. चार सामन्यांत सहा गुणांची कमाई करणाऱ्या विदर्भाचा पाचवा साखळी सामना सात ऑक्‍टोबरला हिमाचल प्रदेशविरुद्ध होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ : 43.1 षटकांत सर्वबाद 155 (फैज फजल 72, जितेश शर्मा 16, रिषभ राठोड 26, श्रीकांत वाघ 15, संदीप शर्मा 2-27, मनदीपसिंग 2-12, करण कैला 4-32, मयंक मार्कंडे 1-37).
पंजाब : 46.2 षटकांत 3 बाद 158 (अभिषेक शर्मा 33, प्रभसिरमन सिंग 22, अनमोलप्रीत सिंग नाबाद 42, गुरकिरतसिंग नाबाद 51. अक्षय वखरे 2-29, अक्षय कर्णेवार 1-13).

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN