पुणेकरांसाठी बॅड न्यूज, कसोटी सामना पावसाच्या सावटाखाली

Loksatta

Loksatta

Author 2019-10-10 09:58:07

img

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत १-०ने आघाडीवर आहे. पहिला कसोटी सामना भराताने मोठ्या फरकाने जिंकला होता. दुसऱ्या कसोटीसह विजयी आघाडी घेण्याचा भारताचा निर्धार असेल तर आफ्रिकाचा संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या दृष्टीने मैदानात उतरेल. मात्र, पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळे पुणेकरांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

बुधवारी सकाळच्या उन्हामुळे भारतीय संघाला नेटमधील सराव करता आला. पण सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याने गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी आणि दुपारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचप्रमाणे पुढील दोन दिवसही वीजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील २ दिवस पाऊस झालाच तर सायंकाळी आणि रात्रीच व्हावा, अशी क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. पाऊस झाला तरी, सामना लवकर सुरू करण्यासाठी पाऊस थांबताच २० मिनिटांत मैदान खेळासाठी सज्ज करण्याची यंत्रणा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडे आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचे पावसामुळे नुकसान झाले होते. मात्र, भारताने वरचढ खेळ करत अखेरच्या चार दिवसांमध्ये सामना जिंकला होता.

पाटा खेळपट्टी अशी ओळख असलेल्या या खेळपट्टीने २०१७ मध्ये झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला तीन दिवसांत धूळ चारली होती. प्रतिस्पर्धी संघासाठी रचलेल्या फिरकीच्या जाळ्यात भारत स्वत:च सापडला.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या दिवशीच भारताचा ३३३ धावांनी धुव्वा उडल्यावर या खेळपट्टीवर मोठी टीका झाली होती. खेळपट्टीचे हेच हुकमी स्वरूप भारतासाठी धोकादायक ठरू शकते. दोन वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती येथे होऊ नये, अशी प्रार्थना क्रिकेटप्रेमी करीत आहेत. याशिवाय पावसाचे सावट असल्याने कधी ढगाळ तर कधी प्रखर सूर्यप्रकाश हे वातावरण दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

भारतीय सलामीवीर लक्ष्यस्थानी

विशाखापट्टणमच्या कसोटीतील दोन्ही डावांमध्ये शतके झळकावून रोहित शर्माने मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा फलंदाज हा शिक्का पुसून टाकला, तर दुसरा सलामीवीर मयांक अगरवालने द्विशतकी खेळीने क्रिकेटरसिकांची दाद मिळवली. कसोटीतील सलामीची जोडी मिळाल्यामुळे मायदेशात होणाऱ्या आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यांसाठी भारताची प्रमुख समस्या मिटली आहे. आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे भारताच्या सलामीवीरांना जेरबंद करण्याचे प्राथमिक आव्हान असेल. रोहित कसोटी क्रिकेटमध्ये काय करतोय, याकडे लक्ष केंद्रित करू नका, असा सल्ला विराटने पत्रकारांना दिला आहे. विराट, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि हनुमान विहारी यांच्या भारताची फलंदाजी अधिक भक्कम झाली आहे. त्यामुळे गहुंजेच्या खेळपट्टीने फलंदाजांना साथ दिल्यास हे भारतीय फलंदाज पुन्हा बहारदार शतकांसह संघाला ५०० धावसंख्येचा डोंगर उभारून देऊ शकतील.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD