पुण्यातील सामन्यात साळगावकरांचीही "कसोटी' 

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-10-09 14:21:39

img

शैलेश नागवेकर 

पुणे : दसऱ्याच्या मुहूर्तावर "शस्त्र'पूजा केल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी सज्ज होणार आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर गुरुवारपासून सुरु होणाऱ्या या सामन्यात प्रमुख क्‍युरेटर पांडुरंग साळगावकर यांचाही कसोटी लागणार आहे. एका स्टिंग ऑपरेशनमुळे संकटात सापडलेल्या साळगावकरांना पाच दिवस चालेल आशी खेळपट्टी तयार करावी लागणार आहे. त्यातच पुण्यात कोसळत असलेल्या पावसामुळे खेळपट्टी तयार करण्यासाठी अचडणीचा सामना करावा लागलेला आहे. 

फेब्रुवारी 2017 मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर बराच वाद झाला होता. फिरकीचा आखाडा ठरलेल्या त्या खेळपट्टीवर 31 फलंदाज फिरकी गोलंदाजांनी बाद केले होते आणि सामना तीन दिवसातंच संपला होता. त्यानंतर आयसीसीने "दर्जाहीन' असा शेरा मारला होता. हा इतिहास लक्षात सामना पाच दिवस चालेल अशी खेळपट्टी तयार करण्यास प्रधान्य द्यावे लागणार आहे, परंतु गेल्या काही दिवसात अधूनमधून जोरदार कोसळणाऱ्या पावसाचा खेळपट्टी तयार करण्यावर किती परिणाम झाला असेल हे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. 

पहिले तीन दिवस फलंदाजांचे? 
आयसीसीकडून शेरा देण्यात आल्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने ताकही फुंकून पिण्यास सुरुवात केली आणि आयपीएलसाठी खेळपट्टी तयार करताना कोणताही धोका पत्करला नाही. साळगावकरांना महाराष्ट्र संघाचे माजी कर्णधार सुरेंद्र भावे खेळपट्टी तयार करण्यास सहाय्य करत आहेत त्यामुळे आता भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यासाठीची खेळपट्टी पहिले तीन दिवस तरी फलंदाजांना सहाय्य करणारी असू शकेल असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

साळगावकर सावध 
एका आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी खेळपट्टी तयार करत असताना स्टिंग ऑपरेशनचे बालंट आल्यामुळे साळगावकर आता सावधच आहेत. ही खेळपट्टी उत्तम असेल एवढेच त्यांनी सांगितले आहे. पूर्वअनुभव लक्षात घेता मी आता खेळपट्टीबाबत सामन्याअगोदर काहीच बोलणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व? 
गहुंजेची खेळपट्टी आता फिरकीका आखाडा नसणार हे उघड आहे. मात्र वेगवान गोलंदाजांना प्रभाव पाडण्याची संधी मिळू शकेल. अधूनमधून पावसाची शक्‍यता, ऑक्‍टोबरची तीव्र उन्हाळा त्यामुळे रिव्हर्स स्वींगची संधी अशा वातावरणाचा वेगवान गोलंदाज फायदा घेऊ शकतात. विशाखापठ्ठणम येथील सामन्यात आर. अश्‍विनने पहिल्या डावात सात विकेट मिळवल्यावर दुसऱ्या डावात खेळपट्टी अधिक खराब होणे अपेक्षित असताना दुसऱ्या डावात महम्मद शमीने कमाल करून दक्षिण आफ्रिका फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या होत्या. उष्णता आणि हवेतील आद्रता यामुळे रिव्हर्स स्विंगचा त्याने खुबीने वापर केला होता. पुण्यातील कोरड्या हवामानाचा तो कसा वापर करतो यावर भारतीय आक्रमण अवलंबून असेल. अशा वेळी अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांना किमान पहिल्या डावात तरी संयम बाळगावा लागणार आहे. 

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD