प्रदूषणाच्या विळख्य़ात आज पहिली टी-20

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-03 05:40:00

img

भारत-बांगलादेश मालिकेला प्रारंभ, भारताचे युवा खेळाडूंना प्राधान्य

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

राजधानीभोवती प्रदूषणाचा विळखा आणखी घट्ट झाला असून याच अनिश्चिततेच्या भोवऱयात यजमान भारत-बांगलादेश यांच्यातील पहिली टी-20 लढत होणार आहे. एक तरी प्रदूषणाचा विळखा, त्यात धुक्याचे साम्राज्य अशा दुहेरी संकटावर मात करत सामना निर्धोक पार पाडावा, अशी आयोजकांची अपेक्षा आहे. सायंकाळी 7 वाजता या लढतीला प्रारंभ होईल.

दिल्लीमध्ये दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषण आणखी टोकाला पोहोचले आहे. पण, काही कारणांमुळे शेवटच्या क्षणी सामना अन्यत्र हलवणे शक्य नसल्याचे बीसीसीआयने यापूर्वीच जाहीर केले असल्यामुळे आयोजकांना सामना सुरळीत होईल, ही अपेक्षा करण्याशिवाय आणखी कोणताही पर्याय नाही, हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

शिवम, शार्दुल, चहरसाठी संधी

पाहुण्या बांगलादेश संघाने आतापर्यंत प्रदूषणाबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही. पण, गत आठवडय़ातच शकीब-अल-हसनवर दोन वर्षांची बंदी लादली गेली असल्याने या धक्यातून हा संघ सावरलेला नाही, हे त्यामागील मुख्य कारण आहे. भारताने या लढतीसाठी पूर्णपणे नवे जलद-मध्यमगती गोलंदाज आजमावणे पसंत केले असून या पार्श्वभूमीवर मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबे, त्याचा सहकारी शार्दुल ठाकुर व राजस्थानचा दीपक चहर यांना येथे उत्तम संधी असेल.

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ बरेच टी-20 सामने खेळणार आहे. पण, अधिक वेळ न दवडता संघ निश्चित करण्यावर आपला भर असेल, असे भारतीय व्यवस्थापनाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. साहजिकच, युवा खेळाडूंना या मालिकेच्या माध्यमातून उत्तम संधी मिळाली असून फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचाही यात समावेश आहे.

रोहितचा बहारदार फॉर्म अपेक्षित

हंगामी कर्णधार रोहित शर्मा सध्या उत्तम बहरात असून कसोटीतील बहारदार फॉर्म आता टी-20 क्रिकेटमध्येही उतरवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. रोहितचा सहकारी शिखर धवन मात्र अद्याप मोठय़ा खेळीच्या अपेक्षेत आहे. इंग्लिश भूमीत जुलैमध्ये संपन्न झालेल्या वनडे विश्वचषकादरम्यान धवनला अंगठय़ाची दुखापत झाली आणि त्यामुळे त्या स्पर्धेच्या मध्यातूनच तो बाहेर फेकला गेला होता.

दिल्लीच्या या डावखुऱया फलंदाजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत अनुक्रमे 36 व 40 धावा जमवल्या तर अलीकडेच संपन्न झालेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत त्याला बरेच झगडावे लागले. या स्पर्धेतील 7 सामन्यात त्याला फक्त एकच अर्धशतक झळकावता आले.

पांडे, सॅमसनविषयी अनिश्चितता

अन्य फलंदाजांमध्ये केएल राहुल, श्रेयस अय्यर, कृणाल पंडय़ा व स्थानिक खेळाडू ऋषभ पंत यांचा मध्यफळीत समावेश निश्चित मानला जातो. शिवम दुबेला पदार्पणाची संधी मिळाल्यास फलंदाजी क्रमात त्याला बढती मिळण्याची शक्यता चर्चेत आहे. त्याला निवडल्यास मनीष पांडे, संजू सॅमसन यांना बाहेर व्हावे लागेल. कारण, अशा परिस्थितीत यजुवेंद्र चहल, खलील अहमद, दीपक चहर, वॉशिंग्टन सुंदर यांचे खेळणे निश्चित असेल. धवनप्रमाणेच लेगस्पिनर चहलला देखील संघातील स्थान मिळवण्याची येथे संधी असेल.

कोटलाच्या संथ गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर चहलला संधी मिळण्याची शक्यता असून त्याच्या सोबतीला लेगस्पिनर राहुल चहरऐवजी ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरला खेळवणे पसंत केले जाईल, अशी शक्यता चर्चेत आहेत. संघ दोन मनगटी गोलंदाज खेळवणार नाही, अशी शक्यता असल्याने या परिस्थितीत फलंदाजीत अधिक सरस असलेल्या सुंदरला प्राधान्य मिळू शकते.

प्रथम फलंदाजी करताना आपले प्रदर्शन अधिक सरस व्हावे, यासाठी भारतीय संघाला येथे आणखी एक संधी लाभू शकते. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले तर मध्यफळी अपेक्षेप्रमाणे योगदान देत नाही, असे संघव्यवस्थापनाच्या निदर्शनास आले असून यावर वेळीच तोडगा काढण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.

बांगलादेशसमोर लौकिक राखण्याचे आव्हान

आशियाई खंडात आक्रमक संघ म्हणून बांगलादेशने अलीकडील काही वर्षात लक्षवेधी यश प्राप्त केले. एक प्रकारे त्यांनी श्रीलंकेचीच जागा येथे घेतली. पण, मागील काही टप्प्यात ते त्यांच्या उत्तम फॉर्ममध्ये नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अफगाणिस्तानने सप्टेंबरमध्ये चित्तगाव येथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवत बांगलादेशला शब्दशः जमिनीवर आणले होते. त्यानंतर 4 सामन्यांच्या टी-20 सामन्यात बांगलादेशने ओळीने तीन सामने जिंकले. पण, चौथ्या व शेवटच्या सामन्यात अफगाणने आणखी एक नाटय़मय विजय संपादन करत बांगलादेशच्या जखमेवर आणखी मीठ चोळण्याचे कर्तव्य इमानइतबारे पार पाडले होते. अर्थात, यानंतरही कर्णधार महमुदुल्लाह रियादच्या नेतृत्वाखालील बांगलादेशची मजबूत फलंदाजी लाईनअप भारतीय संघाला आव्हान देण्यास कसर सोडणार नाही, हे लक्षात घेता रोहितसेनेला सावध रहावेच लागेल.

पाहुण्या बांगलादेश संघाला शकीब हसनची गैरहजेरी जाणवणार, हे निश्चित असून या परिस्थितीत लिटॉन दास, मुश्फिकूर रहीम, सौम्या सरकार यांच्यावर त्यांची भिस्त असणार आहे.

संभाव्य संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), खलील अहमद, यजुवेंद्र चहल, दीपक चहर, राहुल चहर, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, कृणाल पंडय़ा, ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर.

बांगलादेश : महमुदुल्लाह रियाद (कर्णधार), तईजूल इस्लाम, मोहम्मद मिथुन, लिटॉन कुमार दास, सौम्या सरकार, नईम शेख, मुश्फिकूर रहीम, अफिफ होसेन, मोसद्देक होसेन सैकत, अमिनूल इस्लाम बिपलॉब, अराफत सनी, अबू हिदर, अल-अमिन होसेन, मुस्तफिजूर रहमान, शफिउल इस्लाम.

सामन्याची वेळ : सायं. 7 वा.

कोटस

शकीब हा आमचा दिग्गज खेळाडू होता, आहे आणि राहील. त्याच्याकडून चूक झाली आहे. पण, हा काही मोठा गुन्हा नव्हे. तो ज्यावेळी संघात परतेल, त्यावेळी आम्ही आनंदाने, खुल्या दिलाने त्याचे स्वागत करु.

-बांगलादेशचा टी-20 कर्णधार महमुदुल्लाह रियाद

संजू सॅमसन व शिवम दुबे यांच्यापैकी एक खेळाडू आज अंतिम संघातून निश्चितपणाने खेळेल आणि अंतिम निर्णय रविवारीच होणार असला तरी आमचे प्राधान्य शिवम दुबेला असू शकते. अर्थात, या दोघांनीही सातत्य दाखवले आहे.

-भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्मा

बांगलादेशचे लक्ष प्रदूषणावर नव्हे तर क्रिकेटवर!

बांगलादेशचा संघ मागील तीन दिवसांपासून खराब प्रदूषणाच्या विळख्यातही सातत्याने सराव करत आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर कर्णधार महमुदुल्लाह रियादने आपल्या संघाचे लक्ष प्रदूषणावर नव्हे तर अव्वल क्रिकेट साकारण्यावर असेल, असे स्पष्ट केले. सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

शकीबच्या गैरहजेरीत नेतृत्वाची धुरा माझ्याकडे आली असली तरी मी त्याला डोईजोड जबाबदारी मानत नाही. माझ्यासाठी ही संधी आहे. टी-20 व कसोटीमध्ये यापूर्वीही शकीबच्या गैरहजेरीत ही जबाबदारी मी सांभाळली आहे, असे रियाद येथे म्हणाला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN