बांगलादेशचा संघ शकीबशिवाय भारतात दाखल

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-31 05:19:00

img

नवी दिल्ली :

शकीब हसनच्या वादाने सावलीसारखा पिच्छा पुरवल्यानंतर यातून तावून सुलाखून निघालेला बांगलादेशचा क्रिकेट संघ शकीब हसनशिवाय भारतात दाखल झाला. शकीबची उणीव बांगलादेशला जाणवेल, हे निश्चित आहे. पण, विद्यमान टी-20 कर्णधार महमुदुल्लाह रियाधने शकीबच्या गैरहजेरीत आपला संघ आणखी जिद्दीने खेळेल, अधिक प्रेरणेने लढत देईल, असा दावा केला.

शकीबवर दोन वर्षांची बंदी लादली गेल्यानंतर दुसऱया दिवशी 15 सदस्यीय बांगलादेशचा संघ भारताच्या राजधानीत दाखल झाला. या दौऱयात बांगलादेशचा संघ 3 टी-20 सामने खेळणार असून नवी दिल्ली (3 नोव्हेंबर), राजकोट (7 नोव्हेंबर), नागपूर (10 नोव्हेंबर) येथे या लढती होतील. याशिवाय, दोन कसोटी सामने अनुक्रमे इंदोर (14 ते 18 नोव्हेंबर) व कोलकाता (22 ते 26 नोव्हेंबर) येथे खेळवले जाणार आहेत.

‘आम्हाला वस्तुस्थितीची, प्रतिकूल इतिहासाची आणि आमच्या मर्यादांची जाणीव आहे. भारताला रोखणे आव्हानात्मक असेल. पण, अशक्य अजिबात नसेल. सांघिक खेळावर भर दिला तर संधीचे सोने करता येऊ शकते’, असे महमुदुल्लाह याप्रसंगी म्हणाला. शकीब आमचा अव्वल खेळाडू आहे आणि त्याच्याशिवाय खेळणे कठीण असेल. पण, एखादा खेळाडू जखमी होऊन वर्षभरासाठी संघाबाहेर गेला तर त्याची जागा अन्य खेळाडूंना भरुन काढावीच लागते, याचा त्याने पुढे उल्लेख केला.

बांगलादेशचा टी-20 संघ : महमुदुल्लाह (कर्णधार), लिटॉन दास, सौम्या सरकार, मोहम्मद नईम, मुश्फिकूर रहीम, अतिफ होसेन, मोसद्देक होसेन, अमिनूल इस्लाम, अराफत सनी, अल-अमिन होसेन, मुस्तफिजूर रहमान, शफिउल इस्लाम, मोहम्मद मिथुन, तईजूल इस्लाम, अबू हिदर रोनी.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD