भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा एक डाव १३७ धावांनी धुव्वा

Indian News

Indian News

Author 2019-10-14 07:06:55

img

अमोल मचाले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कर्णधार म्हणून दिवसेंदिवस अधिक परिपक्व होत असलेल्या विराट कोहलीने आक्रमक डावपेच लढवत दक्षिण आफ्रिकेवर फॉलोआॅन लादला. यानंतर गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्याने दुसऱ्या कसोटीत चौथ्याच दिवशी भारताने पाहुण्यांचा एक डाव १३७ धावांनी धुव्वा उडवत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या धमाकेदार विजयासह मायदेशात सलग सर्वाधिक ११ मालिका जिंकण्याचा विश्वविक्रमही टीम इंडियाने रचला. याआधी आॅस्टे्रलियाने मायदेशात सलग दहा मालिका जिंकल्या होत्या. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्र्धेच्या गुणतालिकेत २०० गुणांसह भारताने आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात ५ बाद ६०१ धावांवर पहिला डाव घोषित करणाऱ्या भारताने आफ्रिकेला तिसऱ्या दिवसअखेर २७५ धावांवर रोखून ३२६ धावांची आघाडी घेतली. संपूर्ण तिसरा दिवस गोलंदाजी केल्याने भारतीय गोलंदाज थकले होते. त्यामुळे गोलंदाजांच्या विश्रांतीसाठी कोहली प्रतिस्पर्ध्यांवर फॉलोआॅन न लादता दुसऱ्या डावात काही वेळ फलंंदाजी करणे पसंत करेल, अशी शक्यता होती. मात्र, कोहलीने गोलंदाजांवर विश्वास दाखवित फॉलोआॅन लादला. गोलंदाजांनीही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवित भारताला चौथ्याच दिवशी विजयी केले.

दुसऱ्या डावात पहिल्या षटकापासून आफ्रिकेचे फलंदाज नियमित अंतराने बाद झाले. सलामीवीर डीन एल्गर (४८) व बवूमा (३८) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी नांगी टाकल्याने भारताने वेगाने विजयाकडे वाटचाल केली होती. पहिल्या डावाप्रमाणे यावेळीही आफ्रिकेचे शेपूट वळवळले. वर्नोन फिलँडर व केशव महाराज यांनी पहिल्या डावाप्रमाणे पुन्हा भारतीयांना झुंजवले. वेगवान गोलंदाज उमेश यादवने एकाच षटकात फिलँडर (३७) व रबाडा (४) यांना बाद केल्यानंतर फिरकीपटू रवींद्र जडेजाने महाराजला (२२) पायचित करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसऱ्या डावात उमेश यादव व जडेजा यांनी प्रत्येकी ३, तर रवीचंद्रन अश्विनने २ गडी बाद केले. इशांत व शमी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. सामन्यात यादव आणि अश्विन यांनी प्रत्येकी ६ बळी घेण्याचा पराक्रम केला. पहिल्या डावात विक्रमी नाबाद द्विशतक झळकाविणारा कोहली निर्विवादपणे सामनावीर ठरला.


डावाने पराभव टाळण्यासाठी सव्वातीनशेपार धावांचे लक्ष्य ठेवून फलंदाजीस उतरलेल्या आफ्रिकेला पहिल्या षटकात धक्का बसला. इशांतच्या दुसऱ्याच चेंडूवर पंचांनी मार्करमला (०) पायचित दिले. रिप्लेमध्ये मात्र चेंडू यष्टीच्या वरून जात असल्याचे दिसत होते. मार्करम रिव्ह्यू मागण्याचा विचार करीत असतानाच १० सेकंदांचा अवधी संपल्याने त्याला मैदान सोडवे लागले. पुढील चार फलंदाज नियमित आंतराने बाद झाल्याने आफ्रिकेची अवस्था ५ बाद ७९ अशी झाली. बवूमा-मुथूस्वामी यांनी सहाव्या गड्यासाठी ४६ धावांची भागिदारी करीत पराभव थोडा लांबविला. बवूमाला जडेजाने, तर शमीने मुथूस्वामीला ४ धावांच्या फरकाने तंबूत धाडल्यानंतर फिलँडर-महाराज जोडीने आठव्या गड्यासाठी ५६ धावांची भागिदारी करून भारतीयांची विजयाची प्रतीक्षा वाढविली. आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील ही सर्वोच्च भागिदारी ठरली. पहिल्या डावातही या दोघांनी सर्वोच्च भागिदारी करत नवव्या गड्यासाठी १०९ धावा जोडल्या होत्या. अखरेचा फलंदाज महाराजला जडेजाने पायचित केल्यानंतर त्याने रिव्ह्यू मागितला. मात्र, पंचांचा निर्णय बरोबर असल्याचे मैदानावरील स्क्रीनवर दिसताच स्टेडियममध्ये सुमारे २० हजार भारतीय समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.

संक्षिप्त धावफलक
भारत : पहिला डाव : ५ बाद ६०१ धावांवर घोषित.
द. आफ्रिका : पहिला डाव : सर्व बाद २७५ धावा.
द. आफ्रिका फॉलोआॅननंतर दुसरा डाव : ६७.२ षटकांत सर्व बाद १८९ धावा (डीन एल्गर ४८, बवूमा ३८, वर्नोन फिलँडर ३७, केशव महाराज २२, उमेश यादव ३/२२, रवींद्र जडेजा ३/५२, रवीचंद्रन अश्विन २/४५, इशांत शर्मा १/१७, मोहम्मद शमी १/३४).

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN