भारताकडून ‘दसऱया’ची भेट

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-07 05:55:00

img

द.आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

मोहम्मद शमीची घातक वेगवान स्विंग गोलंदाजी आणि त्याला रवींद्र जडेजाकडून मिळालेल्या पूरक साथीमुळे भारताने येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर तब्बल 203 धावांनी दणदणीत विजय मिळवित तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दोन्ही डावांत शतके झळकवणारा सलामीवीर रोहित शर्मा सामनावीराचा मानकरी ठरला.

या विजयामुळे भारताचे कसोटी विश्व कसोटी चॅम्पियनशिपमधील स्थान आणखी भक्कम झाले आहे. भारताने येथील 40 गुणांसह एकूण 160 गुण घेत आघाडीचे स्थान कायम राखले आहे. या मालिकेतील दुसरा सामना पुणे येथे 10 ऑक्टोबरपासून खेळविली जाणार आहे.

द.आफ्रिकेला भारताने 395 धावांचे विजयाचे आव्हान दिले होते. त्यांच्याकडून कडवा प्रतिकार होईल अशी अपेक्षा केली जात होती. पण 1 बाद 11 या धावसंख्येवरून शेवटच्या दिवसाची सुरुवात केल्यानंतर शमी व जडेजा यांच्या भेदक जलद-फिरकी माऱयासमोर त्यांचा दुसरा डाव 63.5 षटकांत केवळ 191 धावांत आटोपला. शमीने कारकिर्दीत पाचव्यांदा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेताना 35 धावांत 5 तर जडेजाने 87 धावांत बळी मिळविले. पदार्पणवीर सेनुरन मुथुसामी (नाबाद 49) व डेन पिएडेट (107 चेंडूत 56) यांनी नवव्या गडय़ासाठी 91 धावांची भागीदारी करून पराभव लांबवण्याचे काम केले. 8 बाद 70 अशी केविलवाणी स्थिती असताना ही जोडी जमल्याने द.आफ्रिकेची दुहेरी धावसंख्येत बाद होण्याची नामुष्की टळली.

शमी, जडेजाचा भेदक मारा

img

पहिल्या दिवसात खेळपट्टीने फलंदाज-गोलंदाजांना समान साथ दिली. क्वचितप्रसंगी एखादा चेंडू चकित करून जात होता. पण अखेरच्या दिवशी मात्र तिचा स्वभाव बदलल्याचे दिसून आले. टर्न चांगला मिळाल्याने चेंडू खूप वळत होते तर बदलणाऱया बाऊन्सचा लाभ वेगवान गोलंदाजांना मिळाला. पुजाराने याबाबत शनिवारीच भाकीत केले होते. दिवसातील दुसऱया षटकापासूनच द.आफ्रिकेच्या पडझडीला सुरुवात झाली. अश्विनने थेऊनिक डी बुईनला 10 धावांवर त्रिफळाचीत केले. ऑफस्टंपवरून खूप आत वळलेल्या चेंडूवर तो त्रिफळचीत झाला. अश्विनचा हा 350 वा बळी होता. अश्विनने सुरुवात करून दिल्यानंतर शमीने टेम्बा बवुमा (0), पहिल्या डावातील शतकवीर क्विन्टॉन डी कॉक (0) व फॅफ डु प्लेसिस (13) यांना झटपट गुंडाळून द.आफ्रिकेचा कणाच मोडून काढला. जडेजाने स्वतःच्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपत ऐडन मार्करमचा (39) प्रतिकारही मोडून काढल्यानंतर 27 व्या षटकांतच त्यांची स्थिती 6 बाद 70 अशी झाली. याच षटकात जडेजाने फिलँडर व केशव महाराज यांना लागोपाठच्या चेंडूवर पायचीत केले आणि त्यांची स्थिती 8 बाद 70 अशी झाल्याने भारताचा विजय निश्चित झाला होता.

उपाहाराआधीच त्यांचा डाव संपणार असे वाटत होते. पण पिएडेट व मुथुसामी यांनी शानदार अर्धशतकी भागीदारी करीत भारताचा विजय थोडाफार लांबवला. पिएडेटने मिडविकेटच्या दिशेने एक षटकारही मारला. तो या सामन्यातील विक्रमी षटकार होता. त्याने आपल्या आठव्या कसोटीत पहिले अर्धशतक पूर्ण केले. उपाहारावेळी त्यांनी 8 बाद 117 धावांपर्यंत मजल मारली होती. उपाहारानंतरही त्यांनी तासभर किल्ला लढविला. शमीला पुन्हा गोलंदाजीस आणल्यावर त्याने पहिल्याच चेंडूवर पिएडेटची उजवी यष्टी उडविली. मुथुसामी व रबाडा यांनीही अखेरच्या गडय़ासाठी आणखी 30 धावांची भर घातली. शमीने रबाडाला बाद करून भारताचा विजय साकार केला.

संक्षिप्त धावफलक : भारत प.डाव 7 बाद 502 डाव घोषित, द.आफ्रिका प.डाव सर्व बाद 431, भारत दु.डाव 4 बाद 323 डाव घोषित, द.आफ्रिका दु.डाव 63.5 षटकांत सर्व बाद 191 : मार्करम 39, एल्गार 2, डी ब्रुईन 10, डु प्लेसिस 13, मुथुसामी नाबाद 49, पिएडेट 56, रबाडा 18, बेवुमा, डी कॉक, फिलँडर, महाराज प्रत्येकी 0, अवांतर 4. गोलंदाजी : अश्विन 1-44, जडेजा 4-87, शमी 5-35, इशांत 0-18, रोहित शर्मा 0-3).

कसोटीत अश्विनचे 350 बळी, मुरलीधरनच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी आर अश्विनने दक्षिण आफ्रिकेच्या डी ब्रूनची विकेट घेत कसोटी कारकिर्दीत 350 बळी घेण्याचा टप्पा पार केला. अश्विनने हा कसोटी क्रिकेटमध्ये 350 विकेट्स किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा केवळ चौथा गोलंदाज ठरला आहे. याआधी भारताकडून केवळ अनिल कुंबळे, कपिल देव आणि हरभजन सिंग यांनी हा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, अश्विनने 350 बळींचा टप्पा 66 सामन्यात पूर्ण केला आहे. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 350 विकेट्स घेण्याच्या मुथय्या मुरलीधरनच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. तसेच अश्विन भारताकडूनही सर्वात जलद 350 कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. याआधी भारताकडून सर्वात जलद 350 कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेच्या नावावर होता. कुंबळेने 77 कसोटी सामन्यात 350 विकेट्सचा टप्पा पार केला होता.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 350 बळी घेणारे गोलंदाज –

मुथय्या मुरलीधरन – 66 सामने

आर. अश्विन – 66 सामने

रिचर्ड हॅडली – 69 सामने

डेली स्टीन – 69 सामने

भारताकडून सर्वात जलद 350 कसोटी बळी घेणारे गोलंदाज ा

आर. अश्विन – 66 सामने

अनिल कुंबळे – 77 सामने

हरभजन सिंग- 83 सामने

कपिल देव – 100 सामने

विशाखापट्टणम कसोटीत षटकारांचा पाऊस

विशाखापट्टणम येथे झालेल्या भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत यजमान संघाने 203 धावांनी बाजी मारली. दरम्यान या कसोटी सामन्यात दोन्ही संघातल्या खेळाडूंनी षटकारांचा पाऊस पाडला आहे. विशेष म्हणजे, भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवलेला गेलेला हा कसोटी सामना सर्वात जास्त षटकारांची नोंद झालेला सामना ठरला आहे. दोन्ही संघातील फलंदाजांनी मिळून या सामन्यात तब्बल 36 षटकार ठोकले. याआधी 2014 मध्ये न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात 35 षटकार नोंदवले गेले होते.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावलेले सामने –

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ा 2019 (36 षटकार)

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड ा 2014 (35 षटकार)

पाकिस्तान विरुद्ध भारत ा 2005 (27 षटकार)

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड ा 2013 (27 षटकार)

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD