भारताचा आफ्रिकेवर ११ धावांनी विजय

Navprabha

Navprabha

Author 2019-09-25 13:27:01

>> दीप्ती शर्माचा प्रभावी मारा, हरमनप्रीतची अष्टपैलू चमक

येथील लालभाई कॉंट्रॅक्टर स्टेडियमवर काल मंगळवारी भारताच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ११ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने विजयासाठी ठेवलेल्या १३१ धावांचा पाठलाग करताना पाहुण्यांचा डाव १९.५ षटकांत ११९ धावांत संपला.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. भारताने १५ वर्षीय शफाली वर्मा हिला पदार्पणाची संधी दिली. परंतु, सलामीला उतरलेल्या शफालीला भोपळाही फोडता आला नाही. स्मृती मंधाना हिने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत १६ चेंडूंत २१ धावा जमवल्या. मधल्या फळीत कर्णधार हरमनप्रीत कौरने ३४ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४३ धावा करत धावगती वाढवली.

२५ चेंडूंचा सामना करत १९ धावा केल्यानंतर जेमिमाने परतीचा रस्ता धरला. दीप्ती शर्माने १६ व वेदा कृष्णमूर्तीने १० धावांचे योगदान दिले. तळाला तानिया भाटियाने केवळ ५ चेंडूंत नाबाद ११ धावा केल्या. पाहुण्यांकडून शबनम इस्माईलने सर्वाधिक ३ गडी बाद केले. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्यांची सुरुवात वेगवान होती. पूजा वस्राकरच्या षटकात १८ धावा चोपत त्यांनी इरादे स्पष्ट केले. दुसर्‍या षटकात शिखा पांडेने धोकादायक लिझेल ली (१६) हिचा त्रिफळा उडवून भारताला पहिले यश मिळवून दिले. ऑफस्पिनर दीप्ती शर्माने आपली सुरुवातीची तीन षटके निर्धाव टाकत ताझमिन ब्रिट्‌स, नादिन डी क्लर्क व शबनम इस्माईल यांना तंबूत पाठवले. मधल्या फळीत मिग्नॉन डू प्रीझने एकाकी झुंज देताना ४३ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५९ धावांची धीरोदात्त खेळी केली. ४ षटकांत ८ धावा देत ३ बळी घेतलेली दीप्ती सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. शिखा पांडे, राधा यादव व पूनम यादव यांनी प्रत्येकी २ तर हरमनप्रीतने १ गडी बाद केला. मालिकेतील दुसरा सामना २६ रोजी खेळविला जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक ः भारत ः २० षटकांत २० षटकांत ८ बाद १३० (हरमनप्रीत ४३, मंधाना २१, इस्माईल २६-३) वि. वि. दक्षिण आफ्रिका १९.५ षटकांत सर्वबाद ११९ (मिग्नॉन डु प्रीझ ५९, ली १६, दीप्ती ८-३)

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD