भारताचा ऐतिहासिक मालिका विजय

Navprabha

Navprabha

Author 2019-10-14 14:16:06

>> दुसर्‍या कसोटीत आफ्रिकेला डाव व १३७ धावांनी नमविले

पहिल्या डावातील कर्णधार कोहलीसह इतर फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांच्या भेदक मार्‍याच्या जोरावर भारताने पुण्यात खेळविण्यात आलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला डाव व १३७ धावांनी धूळ चारत तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा हा ऐतिहासिक मालिका विजय ठरला. त्यांनी मायभूमीत सलग ११वा मालिका विजय मिळविला. अशी कामगिरी करणारा भारत हा एकमेव संघ होय.
विजयानंतर बोलताना विराटने ‘आम्ही ही मालिका ३-० अशी जिंकण्यासाठी प्रयत्न करू’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

भारताच्या ६०१ धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकन संघ तिसर्‍या दिवशी २७५ धावांवर गारद झाला होता व भारताने पहिल्या डावात ३२६ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे काल चौथ्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीने अपेक्षेप्रमाणे दक्षिण आफ्रिकन संघाला फॉलोऑन दिला.
फॉलोऑन नंतर पुन्हा मैदानावर उतरलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाला दुसर्‍या दुसर्‍या डावातही भारतीय गोलंदाजांच्या तिखट मार्‍यासमोर स्थिरावता आले नाही व त्यांचा संपूर्ण संघ ६७.२ षट्‌कांत १८९ धावांवर गारद झाल्याने त्यांना डाव व १३७ धावांनी पराभूत व्हावे लागले.

आफ्रिकेची सुरुवात एकदम खराब झाली. ईशांत शर्माने ऍडेन मारक्रमला खाते खोलण्यापूर्वीच पायचितच्या जाळ्यात अडकविले. थिउनिस डी-ब्रून (८) उमेश यादवच्या गोलंदाजीवर यष्ट्यांमागे वृद्धिमन साहाकडे झेल देऊन परतला. कर्णधार फाफ डुप्लेसिसही जास्त वेळ खेळपट्टीवर स्थिरावू शकला नाही व केवळ ५ धावा जोडून तो रविचंद्रन अश्विननच्या गोलंदाजीवर यष्ट्यांमागे झेल देऊन बाद झाला. जम बसवलेल्या डीन एल्गारला अर्धशतकासाठी २ धावा कमी पडल्या. अश्विनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यानंतर तेंबा बावुमा (३८), वेर्नोन फिलँडर (३७) आणि केशव महाराज (२२) यांनाच थोडाफार प्रतिकार करता आला. परंतु भारतीय सूत्रबद्ध गोलंदाजीपुढे त्यांचे जास्तवेळ चालले नाही. भारताकडून उमेश यादव व रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३, रविचंद्रन अश्विनने २ तर ईशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला.
पहिल्या डावात द्विशतकी खेळी केलेल्या विराट कोहलीची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली. या मालिकेतला तिसरा व शेवटचा कसोटी सामना १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

धावफलक
भारत, पहिला डाव ः ५ बाद ६०१ (डाव घोषित),
दक्षिण आफ्रिका, पहिला डाव ः सर्वबाद २७५.
दक्षिण आफ्रिका, दुसरा डाव ः ऍडेन मारक्रम पायचित गो. ईशांत शर्मा ०, डीन एल्गार झे. उमेश यादव गो. रविचंद्रन अश्विन ४८, थिउनिस डी-ब्रून झे. वृद्धिमन साहा गो. उमेश यादव ८, फाफ डूप्लेसिस झे. वृद्धिमन साहा गो. रविचंद्रन अश्विन ५, तेंबा बावुमा झे. अजिंक्य रहाणे गो. रविंद्र जडेजा ३८, क्विंटन डी कॉक त्रिफळाचित गो. रविंद्र जडेजा ५, सेनुरन मुथूसामी झे. रोहित शर्मा गो. मोहम्मद शमी ९, वेर्नोन फिलँडर झे. वृद्धिमन साहा गो. उमेश यादव ३७, केशव महाराज पायचित गो. रविंद्र जडेजा २२, कागीसो रबाडा झे. रोहित शर्मा गो. उमेश यादव ४, ऍन्रिच नॉर्तजे नाबाद ०.
अवांतर ः १३. एकूण ६७.२ षट्‌कांत सर्वबाद १८९ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-० (ऍडेन मार्करम ०.२), २-२१ (थिउनिस डी-ब्रून, ५.४), ३-७० (फाफ डुप्लेसिस, २३.३), ४-७१ (डीन एल्गार, २५.२), ५-७९ (क्विंटन डी कॉक, २८.२), ६-१२५ (तेंबा बावुमा, ४३.२), १२९-७ (सेनुरन मुथूसामी, ४४.५), ८-१८५ (वेर्नोन फिलँडर, ६६.१), ९-१८९ (कागीसो रबाडा, ६७), १०-१८९ (केशव महाराज, ६७.२)
गोलंदाजी ः ईशांत शर्मा ५/२/१७/१, उमेश यादव ८/३/२२/३, मोहम्मद शमी ९/२/३४/१, रविचंद्रन अश्विन २१/६/४५/२, रविंद्र जडेजा २१.२/४/५२/३, रोहित शर्मा २/०/४/०, विराट कोहली १/०/४/०.

भारताचे मायदेशात वर्चस्व
भारतीय संघाने मायदेशांतील खेळपट्ट्यांवरील आपले वर्चस्व कायम राखताना आपला सलग ११वा मालिका विजय नोंदविला. हा त्यांचा विश्वविक्रम ठरला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. भारताला २०१२-१३ पासून ते आतापर्यंत कोणत्याही देशाला कसोटी मालिकेत पराभूत करता आलेले नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने १९९४-९५ ते २०००-०१ या कालावधीत सलग दहा, तर २००४ ते २००८-०९ या कालावधीत दहा कसोटी मालिका जिंकल्या होत्या.

विराट नवव्यांदा सामनावीर
भारतीय कर्णधार म्हणून ५०वा कसोटी सामना खेळलेल्या विराट कोहलीची त्याच्या द्विशतकी खेळीमुळे सामनावीर पुरस्कासाठी निवड झाली. विराटचा हा कसोटी सामन्यातील नववा सामनावीर पुरस्कार होय. सर्वाधिक कसोटी सामनावीर पुरस्कार मिळविणार्‍या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने कपिल देवला (८) मागे टाकले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर १४ पुरस्कारांसह पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर राहुल द्रविड ११ व अनिल कुंबळेने १० वेळा सामनावीर पुरस्कार मिळविलेले आहेत.

द. आफ्रिका विदेशात अपयशी
दक्षिण आफ्रिकन संघ विदेशात कसोटी मालिकेत पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. त्यांचा हा विदेशातील सलग सहावा कसोटी मालिका पराभव ठरला. २०१७ पासून दक्षिण आफ्रिकेला विदेशात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. याआधी फेब्रुवारी १९११ ते ऑगस्ट १९२४ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा सलग ११ कसोटी मालिकांमध्ये पराभव झाला होता.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN