भारताची ‘दिवाळी’….द.आफ्रिकेचे ‘दिवाळे’!

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-23 05:22:00

img

रांची / वृत्तसंस्था

येथील तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी अवघ्या दोनच षटकात दक्षिण आफ्रिकेचे शेवटचे दोन फलंदाज बाद करत भारताने विजय संपादन केला, शिवाय, 3 कसोटी सामन्यांची ही मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकत क्लीन स्वीपवरही शिक्कामोर्तब केले. शाहबाज नदीमने दिवसातील दुसऱया षटकात शेवटच्या दोन चेंडूंवर 2 बळी घेतले आणि यासह द.आफ्रिकेचा दुसरा डाव 133 धावांवरच संपुष्टात आला. भारताने हा सामना एक डाव व 202 धावांनी जिंकला. या निकालासह दक्षिण आफ्रिकेसाठी या कटू दौऱयाची सांगता झाली. एकीकडे, भारताने येथे दिवाळी झोकात साजरी करणारा पराक्रम केला तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचे मात्र खऱया अर्थाने ‘दिवाळे’ निघाले.

या विजयासह भारताने विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 240 गुणांवर झेप घेतली आणि आपली आघाडी आणखी भक्कम केली. विराट कोहलीसाठी कर्णधार नात्याने हा 11 वा मालिकाविजय तर पहिला क्लीन स्वीप ठरला. दक्षिण आफ्रिका तीनपैकी एकाही आघाडीवर भारताविरुद्ध अगदी तग धरुन उभीही राहू शकली नाही. घरच्या भूमीवर भारताचा हा सलग 11 वा मालिकाविजयही ठरला. रोहित सामनावीर व मालिकावीर अशा दोन्ही पुरस्कारांचा मानकरी ठरला.

द. आफ्रिकेकडून सपशेल निराशा

या मालिकेत भारताने एकतर्फी वर्चस्व गाजवले असताना दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटमधील दर्जा ढासळत चालल्याचे विदारक चित्र अधोरेखित झाले. एकीकडे, त्यांचे गोलंदाज भारतीय फलंदाजांसमोर अजिबात आव्हान उभे करु शकले नाहीत, दुसरीकडे, शमीसारखा गोलंदाज बहरल्यानंतर त्यांचे फलंदाज अक्षरशः गर्भगळित झाले. मोहम्मद शमीने या मालिकेत एकूण 13 बळी घेतले आहेत.

मंगळवारी, या सामन्याच्या चौथ्या दिवशी शाहबाज नदीमने दुसऱयाच षटकात (6 षटकात 2-18) दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळण्यात एकतर्फी वाटा उचलला. पाचव्या चेंडूवर शाहबाजने ब्रुईनला (49 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 30) यष्टीरक्षक साहाकरवी झेलबाद केले तर त्यानंतर पुढील चेंडूवरच एन्गिडीचा परतीचा झेल टिपत दक्षिण आफ्रिकेचा डाव 48 षटकात सर्वबाद 133 धावांवर संपुष्टात आणला.

द.आफ्रिकेतर्फे 2 शतके, 4 अर्धशतके

कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सपशेल कोसळत राहिली आणि या पूर्ण मालिकेत त्यांना 2 शतके व 4 अर्धशतकांवरच समाधान मानावे लागले.

संक्षिप्त धावफलक : भारत प.डाव : 9 बाद 497 डाव घोषित. द.आफ्रिका प.डाव 56.2 षटकांत सर्व बाद 162 : झुबेर हामझा 62 (79 चेंडूत 10 चौकार, 1 षटकार), बवुमा 32 (72 चेंडूत 5 चौकार), लिंडे 37 (81 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), अवांतर 12. गोलंदाजी : उमेश यादव 3-40, शमी 2-22, नदीम 2-22, जडेजा 2-19. फॉलोऑननंतर द.आफ्रिका दु.डाव 46 षटकांत सर्वबाद 133 : एल्गार जखमी निवृत्त 16, लिंडे 27 (55 चेंडूत 5 चौकार), पीडेट 23 (73 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), डी बुईन 30 (49 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), रबाडा  12 (16 चेंडूत 3 चौकार), नॉर्जे नाबाद 5. अवांतर 6. गोलंदाजी : शमी 3-10, यादव 2-35, शाहबाज नदीम 2-18, जडेजा 1-36, अश्विन 1-28). 

रवी शास्त्री ‘झोपून उठले’ आणि म्हणाले, ‘भाड मे गया पिच’!

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मंगळवारी अवघ्या दोन षटकांच्या खेळात दोन कारणांमुळे विशेष चर्चेत राहिले. खेळादरम्यान शास्त्री पेंगताना दिसून आले आणि दोन षटकांमध्ये उर्वरित 2 गडी बाद करत भारताने क्लीन स्वीपवर शिक्कामोर्तब केल्यानंतर ते समालोचकांशी संवाद साधण्यासाठी आले, त्यांची जीभ घसरली आणि ते शुद्ध हिंदी भाषेत म्हणाले, ‘भाड मे गया पिच’!

अर्थात, शास्त्री यांचा रोख दुसऱया दिशेने होता. जर 20 बळी घेणारे सक्षम 5 गोलंदाज असतील तर पिच कशी आहे, याचा काही प्रश्नच येत नाही आणि मग ते मैदान मुंबई, ऑकलंड, मेलबर्न यापैकी कोणतेही असो. त्यानंतर फलंदाजी अपेक्षेप्रमाणे बहरली तर संघ फेरारीप्रमाणे वेगाशी स्पर्धा करतो, असे शास्त्री यांनी येथे प्रतिपादन केले. शास्त्रींनी येथे रोहित शर्मा व पदार्पणवीर शाहबाज नदीम यांचीही प्रशंसा केली. पण, अर्थातच, सोशल मीडियाने फक्त त्यांच्या पेंगण्याची आणि भाड मे गया पिच, असे म्हटले, त्याचीच दखल घेतली आणि दिवसभर शास्त्री यात ट्रोल होत राहिले!

कोट

प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहली यांच्या भक्कम पाठबळामुळे व विश्वासामुळेच मला कसोटीत सलामीला खेळण्याची संधी मिळाली आणि मी त्याचे चीज करु शकलो. या संधीबद्दल मी व्यवस्थापनाचा नेहमीच ऋणी राहीन.

-भारतीय सलामीवीर रोहित शर्मा

सर्वच आघाडय़ांवर अपयश येते, असे दौरे नेहमीच वेदनादायी असतात आणि या भारत दौऱयात आम्हाला हाच कटू अनुभव आला आहे. आमचे प्रथमश्रेणी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यातील तफावत या निमित्ताने दिसून आली आहे.

-दक्षिण आफ्रिकन कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस

बॉक्स

आयसीसी चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारताची आघाडी आणखी भक्कम

दुबई : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3-0 असा क्लीन स्वीप प्राप्त करत 120 गुण प्राप्त केले आणि एकूण 240 गुणांवर झेप घेत गुणतालिकेत आपली आघाडी आणखी भक्कम केली. बांगलादेशविरुद्ध आगामी मालिकेत हाच सिलसिला पुढेही कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारत-बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका दि. 14 नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. दरम्यान, जून 2021 मध्ये गुणतालिकेत अव्वलस्थानी असणारे दोन संघ इंग्लंडमध्ये कसोटी चॅम्पियनशिपसाठी अंतिम लढतीत आमनेसामने भिडतील.

बॉक्स

देशात पाचच ठिकाणी कसोटी खेळवा : विराट कोहलीची सूचना

रांचीतील या कसोटी सामन्यांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यानंतर नाराज झालेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने देशात महत्त्वाच्या, निवडक पाच स्टेडियम्सवरच कसोटी सामने भरवा, अशी सूचना केली. याबाबत इंग्लिश व ऑस्ट्रेलियन मॉडेलचे उदाहरण त्याने दिले.

ऑस्ट्रेलियत मेलबर्न, सिडनी, पर्थ, ब्रिस्बेन व ऍडलेड या फक्त पाच ठिकाणी कसोटी सामने भरवले जातात तर इंग्लंडमध्ये लॉर्ड्स, ओव्हल, ट्रेंट ब्रिज, ओल्ड ट्रफोर्ड, एजबस्टन, साऊदम्प्टन व हेडिंग्ले अशी सात कसोटी केंद्रे आहेत.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN