भारताचे दक्षिण आफ्रिकेला 395 धावांचे आव्हान

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-06 06:26:00

img

प्रत्युत्तरात आफ्रिकन संघ दिवसअखेर 1 बाद 11, भारताच्या दुसऱया डावात रोहितचे विक्रमी शतक

विशाखापट्टणम / वृत्तसंस्था

सलामीवीर या नात्याने स्वप्नवत पर्दापण करणाऱया रोहित शर्माने (149 चेंडूत 10 चौकार, 7 षटकारांसह 127) दुसऱया डावातही शानदार शतक झळकावल्यानंतर भारताने येथील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला आणि दक्षिण आफ्रिकेला 395 धावांचे कडवे आव्हान दिले. शनिवारी या सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने 1 बाद 11 अशी सुरुवात केली. ही लढत जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 384 धावांची तर भारताला उर्वरित 9 गडी बाकी करण्याची गरज असून अर्थातच आज सामन्यातील शेवटचा दिवस रोमांचक ठरु शकतो.

शनिवारी दक्षिण आफ्रिकेने 8 बाद 385 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर सर्वबाद 431 धावांपर्यंत मजल मारली तर भारताने 4 बाद 323 धावांवर डाव घोषित करत आफ्रिकेला चौथ्या डावात 385 धावांचे कडवे आव्हान दिले. त्यानंतर दिवसभरातील उर्वरित 9 षटकात दक्षिण आफ्रिकेने 11 धावा जमवल्या. मात्र, यासाठीही त्यांना एक गडी गमवावा लागला.

डीन एल्गार स्वस्तात गारद

भारताने 67 षटकात आपला दुसरा डाव घोषित केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 45 मिनिटे फलंदाजीला पाचारण करता येईल, याची तजवीज केली. पण, अंधुक प्रकाशामुळे केवळ 30 मिनिटांचाच खेळ होऊ शकला. रविंद्र जडेजाने पहिल्या डावातील शतकवीर डीन एल्गारला पायचीत केल्यानंतर द. आफ्रिकेला पहिला झटका बसला. चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी मारक्रम 3 तर ब्रुएन 5 धावांवर नाबाद राहिले.

येथील खेळपट्टी शनिवारी चौथ्या दिवशीही अपेक्षेप्रमाणे संथच राहिली. पण, काही ठिकाणी जेथे तडे गेले आहेत, तेथे चेंडूचा टप्पा पडल्यास साहजिकच फलंदाजांचा अंदाज चुकत राहिला. या पार्श्वभूमीवर पहिल्या डावात 7 बळी घेणारा अश्विन व जडेजा येथे पाचव्या व शेवटच्या दिवशी निर्णायक भूमिका बजावू शकतील, असे प्रथमदर्शनी चित्र आहे.

ठाण मांडून उभे राहण्यासाठी ओळखल्या जाणाऱया एल्गारला स्वस्तात बाद करत भारताने मोठे यश संपादन केले. मात्र, नेहमी भारत व विजय याच्या आड येणाऱया क्विन्टॉन डी कॉकचा अडथळा दूर सारणे विराटसेनेसाठी आज शेवटच्या दिवशी विशेष महत्त्वाचे ठरेल. आज शेवटच्या दिवशी पूर्ण 90 षटके फलंदाजी करणे हे लक्ष्य समोर ठेवत दक्षिण आफ्रिकन फलंदाज मैदानात उतरतील.

पहिल्या डावाअखेर 71 धावांची आघाडी

तत्पूर्वी, दिवसाच्या पहिल्या टप्प्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांवर गुंडाळत डावाअखेर 71 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त केली. केशव महाराज (9), रबाडा (15) असे शेवटचे दोन फलंदाज अश्विनने बाद केले तर मुथूसामी 106 चेंडूत 4 चौकारांसह 33 धावांवर नाबाद राहिला. भारतातर्फे अश्विनने 46.2 षटकात 145 धावात 7 बळी घेतले तर जडेजा (2-124), इशांत (1-54) यांनी उर्वरित फलंदाजांना बाद केले.

रोहितची दुसऱया डावातही फटकेबाजी

त्यानंतर मयांक अगरवाल (7) स्वस्तात बाद झाला असला तरी भारताने दुसऱया डावातही जोरदार फटकेबाजी केली. बहरातील रोहितने 149 चेंडूत 10 चौकार, 7 षटकारांसह 127 धावा रचल्या तर चेतेश्वर पुजाराने 148 चेंडूत 13 चौकार, 2 षटकारांसह 81 धावांचे योगदान दिले. रविंद्र जडेजानेही 32 चेंडूत जलद 40 धावा फटकावल्या. यात 3 षटकारांचा समावेश राहिला. कर्णधार विराट कोहली 25 चेंडूत 31 तर शनिवारीच कन्यारत्न लाभलेला अजिंक्य रहाणे 17 चेंडूत 27 धावांवर नाबाद राहिले.

धावफलक

भारत पहिला डाव : 7-502 घोषित.

दक्षिण आफ्रिका पहिला डाव : डीन एल्गार झे. पुजारा, गो. जडेजा 160 (287 चेंडूत 18 चौकार, 4 षटकार), मारक्रम त्रि. गो. अश्विन 5 (21 चेंडूत 1 चौकार), ब्रुएन झे. साहा, गो. अश्विन 4 (25 चेंडूत 1 चौकार), पिएडेट त्रि. गो. जडेजा 0 (4 चेंडू), बवूमा पायचीत गो. इशांत 18 (26 चेंडूत 3 चौकार), फॅफ डय़ू प्लेसिस झे. पुजारा, गो. अश्विन 55 (103 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), क्विन्टॉन डी कॉक त्रि. गो. अश्विन 111 (163 चेंडूत 16 चौकार, 2 षटकार), मुथूसामी नाबाद 33 (106 चेंडूत 4 चौकार), फिलँडर त्रि. गो. अश्विन 0 (10 चेंडू), केशव महाराज झे. अगरवाल, गो. अश्विन 9 (31 चेंडूत 1 चौकार), कॅगिसो रबाडा पायचीत गो. अश्विन 15 (17 चेंडूत 3 चौकार). अवांतर 21. एकूण 131.2 षटकात सर्वबाद 431.

गडी बाद होण्याचा क्रम

1-14 (मारक्रम, 7.1), 2-31 (ब्रुएन, 16.3), 3-34 (पिएडेट, 17.3), 4-63 (बवूमा, 26.1), 5-178 (प्लेसिस, 57.3), 6-342 (एल्गार, 99.3), 7-370 (डी कॉक, 109.3), 8-376 (फिलँडर, 113.2), 9-396 (केशव महाराज, 123.4), 10-431 (रबाडा, 131.2).

गोलंदाजी

इशांत 16-2-54-1, शमी 18-4-47-0, अश्विन 46.2-11-145-7, रविंद्र जडेजा 40-5-124-2, हनुमा विहारी 9-1-38-0, रोहित शर्मा 2-1-7-0.

भारत दुसरा डाव : मयांक अगरवाल झे. प्लेसिस, गो. महाराज 7 (31 चेंडूत 1 चौकार), रोहित शर्मा यष्टीचीत डी कॉक, गो. महाराज 127 (149 चेंडूत 10 चौकार, 7 षटकार), चेतेश्वर पुजारा पायचीत गो. फिलँडर 81 (148 चेंडूत 13 चौकार, 2 षटकार), रविंद्र जडेजा त्रि. गो. रबाडा 40 (32 चेंडूत 3 षटकार), विराट कोहली नाबाद 31 (25 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), अजिंक्य रहाणे नाबाद 27 (17 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार). अवांतर 10. एकूण 67 षटकात 4 बाद 323 वर घोषित.

गडी बाद होण्याचा क्रम

1-21 (मयांक, 7.6), 2-190 (पुजारा, 50.6), 3-239 (रोहित, 56.5), 4-286 (जडेजा, 62.5).

गोलंदाजी

फिलँडर 12-5-21-1, केशव महाराज 22-0-129-2, कॅगिसो रबाडा 13-3-41-1, पिएडेट 17-3-102-0, मुथूसामी 3-0-20-0.

दक्षिण आफ्रिका दुसरा डाव : मारक्रम खेळत आहे 3 (18 चेंडू), डीन एल्गार पायचीत गो. जडेजा 2 (16 चेंडू), ब्रुएन नाबाद 5 (20 चेंडूत 1 चौकार). अवांतर 1. एकूण 9 षटकात 1 बाद 11.

गडी बाद होण्याचा क्रम

1-4 (एल्गार, 3.3).

गोलंदाजी

अश्विन 5-2-7-0, रविंद्र जडेजा 4-2-3-1.

बॉक्स

अन् रोहितने पुजाराला अपशब्द उच्चारले!

रोहित शर्माने दुसऱया डावादरम्यान एकदा पुजाराने एकेरी धाव नाकारल्यानंतर त्याला उद्देशून अपशब्द उच्चारले आणि हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला. डावातील 26 व्या षटकात पुजारा नॉन स्ट्रायकर एण्डवर असताना हा किस्सा घडला. रोहितने यावेळी चेंडू हलकासा फटकावत एकेरी धावेसाठी कॉल दिला. पण, पुजाराने त्याला थांबवले आणि रोहित क्षणभर स्वतःला रोखू शकला नाही. रोहितने येथे पुजाराला उद्देशून अपशब्द उच्चारले आणि स्टम्प माईकमध्ये ते स्पष्टपणे रेकॉर्ड झाले. अर्थात, योगायोग म्हणजे नेमके याच घटनेनंतर पुजाराचा स्कोअरिंग रेट अचानक वाढला आणि त्याने दमदार फटकेबाजी सुरु केली.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN