भारतीय महिलांचा 11 धावांनी विजय

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-26 04:32:00

img

दीप्ती शर्माचा भेदक मारा, हरमनप्रीत 43, डु प्रीझचे अर्धशतक वाया

वृत्तसंस्था/ सूरत

महिला फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माने चारपैकी तीन षटके निर्धाव टाकत तीन बळीही मिळविल्याने भारतीय महिलांनी येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघावर 11 धावांनी विजय मिळविला. द.आफ्रिकेच्या मिग्नॉन हु प्रीझने झळकवलेले अर्धशतक मात्र वाया गेले.

भारताला प्रथम फलंदाजी मिळाल्यावर संथ खेळपट्टीवर मधल्या फळीतील फलंदाजांना चांगली सुरुवात करूनही संघर्ष करावा लागल्याने 20 षटकांत 8 बाद 130 धावांपर्यंतच मजल मारता आली. कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 43 धावा फटकावल्या. तिने 34 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार मारले. पण तिच्या अन्य सहकाऱयांना द.आफ्रिकन मारा खेळणे जड गेले. नंतर भारतीय फिरकी गोलंदाजांनीही अनुकूल परिस्थितीचा लाभ घेत द.आफ्रिकेचा डाव एक चेंडू बाकी असताना 119 धावांत गुंडाळून विजय साकार केला. टी-20 प्रकारातील सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करताना दीप्ती शर्माने केवळ 8 धावांत 3 बळी मिळविले. तिची तीन निर्धाव षटकेच अखेर निर्णायक ठरल्याचे दिसून आले. याशिवया लेगब्रेक गोलंदाज पूनम यादव व वेगवान गोलंदाज शिखा पांडे यांनीही प्रत्येकी 2 बळी मिळवित तिला मोलाची साथ दिली.

डु प्रीझने मात्र धडाकेबाजी फलंदाजी करीत द.आफ्रिकेच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. ती द.आफ्रिकेला विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच ती बाद बाद झाली. 6 बाद 65 अशी बिकट परिस्थिती असताना ती मैदानात उतरली होती. तिने आक्रमक फटकेबाजी करीत 43 चेंडूत 59 धावा फटकावताना 4 चौकार व 3 षटकार ठोकले. आयाबोन्गा खाकासमवेत तिने 32 धावांची भागीदारी केली, तेव्हा भारतीय गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. शिखा पांडेने ही जोडी फोडताना आयाबोनाला 18 व्या षटकात त्रिफळाचीत केले. या षटकात शिखाने केवळ 1 धाव दिली होती. 19 व्या षटकात दीप्तीने 8 धावा दिल्याने शेवटच्या षटकांत द.आफ्रिकेला 18 धावांची गरज होती. डु प्रीझने राधा यादवला षटकार मारत सुरुवात केली. पण चौथ्या चेंडूवर ती यष्टिचीत झाल्याने सामना भारताच्या बाजूने फिरला.

तत्पूर्वी, 15 वर्षीय शेफाली वर्मा पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाली. वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईलने भेदक मारा करीत भारतीयांना धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडले. तिने 26 धावांत 3 बळी मिळविले. हरमनप्रीत व दीप्ती शर्मा (16 चेंडूत 16) यांनी 46  धावांची भागीदारी करून डाव सावरला. पडा नॅडाईन डी क्लेर्कने दोघींना तीन चेंडूंच्या फरकाने बाद केल्याने भारताला शेवटच्या षटकात फटकेबाजी करता आली नाही. जेमिमा रॉड्रिग्स (25 चेंडूत 19) व वेदा कृष्णमूर्ती (11 चेंडूत 10) या देखील फार वेळ टिकल्या नाहीत.

संक्षिप्त धावफलक : भारतीय महिला 20 षटकांत 8 बाद 130 (हरमनप्रीत कौर 43, मानधना 23, एस. इस्माईल 3-26, डी क्लेर्क 2-10), दक्षिण आफ्रिकन महिला 19.5 षटकांत सर्व बाद 119 (डु प्रीझ 59, वोलवार्ट 14, दीप्ती शर्मा 3-8, शिखा पांडे 2-18).

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN