भारतीय महिलांचा 51 धावांनी विजय

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-03 04:59:00

img

चौथ्या टी-20 सामन्यात द.आफ्रिकन महिला संघाची निराशा, पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची 2-0 ने आघाडी

वृत्तसंस्था/ सुरत

सलामीवीर शेफाली वर्मा (46), जेमिमा रॉड्रिग्ज (33) यांची फटकेबाजी तसेच पूनम यादव, राधा यादव फिरकी त्रिकुटाने केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिला संघाने चौथ्या टी-20 दक्षिण आफ्रिकन महिला संघावर 51 धावांनी विजय संपादन केला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा व तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता, उभय संघातील पाचवा व शेवटचा सामना दि. 3 रोजी सुरत येथेच होईल.

पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 17 षटकांचा खेळवण्यात आला. प्रारंभी, शेफाली वर्मा व स्मृती मानधना जोडीने 6 षटकांत 52 धावांची सलामी दिली. ही जोडी स्थिरावलेली असताना स्मृतीला 13 धावांवर डी क्लार्कने बाद केले.  अर्धशतकाच्या उंबरठय़ावर असलेल्या शेफालीही सेखुनेने बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. शेफालीने अवघ्या 33 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह 46 धावांची आक्रमक खेळी साकारली. ही जोडी बाद झाल्यानंतर मुंबईकर जेमिमाने 22 चेंडूत 5 चौकारासह 33 धावांची खेळी साकारल्याने भारतीय संघाला 17 षटकांत 4 बाद 140 धावापर्यंत मजल मारता आली. तिला दीप्ती शर्मा (16 चेंडूत नाबाद 20) व हरमनप्रीत कौर (9 चेंडूत 16) यांनी चांगली साथ दिली.

भारताने विजयासाठी दिलेल्या 141 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना द.आफ्रिकन संघाला 17 षटकांत 7 बाद 89 धावापर्यंत मजल मारता आली. फिरकीपटू पूनम यादव 13 धावांत 3 तर राधा यादवने 16 धावांत 2 बळी घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आफ्रिका संघाकडून लॉराने सर्वाधिक 23 धावा केल्या. तजमीन ब्रिटसने 20 धावांचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक : भारत : 17 षटकांत 4 बाद 140 (शेफाली वर्मा 46, जेमिमा रॉड्रिग्ज 33; निकोल डी क्लार्क 2/24)

दक्षिण आफ्रिका : 17 षटकांत 7 बाद 89 (लॉरा वॉल्वरडॅट 23, ब्रिटस 20, पूनम यादव 3/13, राधा यादव 2/16).

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN