भारतीय महिला क्रिकेट संघाचा वनडे मालिका विजय

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-08 03:20:00

img

अँटीग्वा :

विंडीजच्या दौऱयावर गेलेल्या मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान विंडीजचा तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 असा पराभव केला. स्मृती मानधनाला ‘सामनावीर’ तर विंडीजच्या स्टीफेनी टेलरला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. बुधवारी येथे झालेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने विंडीजचा 6 गडय़ांनी पराभव केला.

तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सर्वबाद 194 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 42.1 षटकांत 4 बाद 195 धावा जमवित विजय नोंदविला.

विंडीजच्या डावामध्ये कर्णधार स्टिफेनी टेलरने 112 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 79, किंगने 45 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 38, मॅथ्यूजने 39 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 26 धावा जमविल्या. विंडीजच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. विंडीजच्या डावात 4 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे झुलन गोस्वामी, पुनम यादव यांनी प्रत्येकी 2 तर शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्स या सलामीच्या जोडीने 25.1 षटकांत 141 धावांची शतकी भागिदारी केली. रॉड्रिग्सने 92 चेंडूत 6 चौकारांसह 69, मानधनाने 63 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 74 धावा जमविल्या. राऊतने 49 चेंडत 1 चौकारांसह 24 तर कर्णधार मिताली राजने 35 चेंडूत 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. भारताच्या डावात 3 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे मॅथ्यूजने 27 धावांत 3 तर फ्लेचरने 33 धावांत  1 गडी बाद केला. आता उभय संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार असून या मालिकेतील पहिले दोन सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी डरेन सॅमी स्टेडियमवर खेळविले जातील.

संक्षिप्त धावफलक

विंडीज-50 षटकांत सर्वबाद 194 (टेलर 79, किंग 38, मॅथ्यूज 26, नाईट 16, गोस्वामी, यादव प्रत्येकी दोन बळी, पांडे, गायकवाड, शर्मा प्रत्येकी 1 बळी), भारत- 42.1 षटकांत 4 बाद 195 (स्मृती मानधना 74, रॉड्रिग्ज 69, राऊत 24, मिताली राज 20, मॅथ्यूज 3-27, फ्लेचर 1-35).

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN