भारतीय संघाचा दिल्लीत इनडोअर सराव?

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-10-31 02:07:47

img

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली ट्‌वेंटी-20 लढत पाच दिवसांवर आली आहे, तरीही दिल्लीतील प्रदूषण कमी होण्यास तयार नाही. या परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघ लढतीपूर्वी खुल्या मैदानात सरावात सहभागी होण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार खेळाडूंना देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दिवाळी; त्यात पंजाब तसेच हरियाणातील शेतकरी राब जाळत असल्यामुळे दिल्लीतील प्रदूषण जास्तच वाढले आहे. यात फार सुधारणा होण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे लढतीपूर्वी भारतीय खेळाडू खुल्या मैदानातील सरावाऐवजी जिममध्येच तंदुरुस्तीकडे लक्ष देतील, अशी चिन्हे दिसत आहेत.

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू 31 ऑक्‍टोबरला दिल्लीत दाखल होतील आणि त्यांनी 1 तसेच 2 नोव्हेंबरला दुपारी सराव करणे अपेक्षित आहे. तर बांगलादेश संघ दुपारी 12 पासून सराव करणार आहे. रात्रीच्या वेळी प्रदूषण कमी होत आहे, त्यामुळे सामन्याच्या वेळी याचा त्रास होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दिल्लीतील खराब हवेमुळे भर दुपारीही डोळे चुरचुरत आहेत. या परिस्थितीत बांगलादेश गुरुवारी सराव करण्याची शक्‍यता कमी आहे. ते सामन्याच्या आदल्या दिवशी दुपारी उशिरा सराव करण्याची शक्‍यता आहे, असे दिल्ली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रदूषणाचा आघाडीवर
- दिल्लीतील लढत अन्यत्र खेळवण्याची पर्यावरणप्रेमींची भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना विनंती
- खेळाडूंचा थोडा तरी विचार करा, दिल्लीकर जे काही करीत आहेत, ते पाहता तिथे आंतरराष्ट्रीय लढत घेणे कितपत योग्य आहे?
- दिल्लीत सामना होतो की नाही, यापेक्षा येथील हवा कधी सुधारणार याची चिंता दिल्लीकरांना जास्त आहे, असे खासदार गौतम गंभीर यांचे प्रतिपादन
- प्रदूषणाचा सामन्याच्या संयोजनावर परिणाम होणार नाही ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अपेक्षा

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD