भारतीय संघाला विक्रमाची संधी

Deshdoot

Deshdoot

Author 2019-10-02 03:01:00

img

विशाखापट्टणम । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरूवात होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान विशाखापट्टणम येथे होणार आहे. या वर्षातील भारताची मायदेशात ही पहिलीच कसोटी मालिका आहे. भारताने या आधी मायदेशात शेवटची कसोटी मालिका ऑक्टोबर 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली होती. या मालिकेत भारताने 2-0 असा विजय मिळवला होता. त्यानंतर थेट वर्षभरानंतर भारतीय संघ मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसोबतच भारतीय संघाला एका मोठा पराक्रम करण्याची संधी आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध मिळवलेला विजय हा भारताचा मायदेशातील सलग 10 वा मालिका विजय होता. त्यामुळे बुधवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणार्‍या कसोटी मालिकेत जर भारतीय संघाने विजय मिळवला, तर हा भारताचा मायदेशातील सलग 11 वा कसोटी मालिका विजय असेल. या आधी कोणत्याही संघाला मायदेशात सलग 10 पेक्षा अधिक कसोटी मालिका विजय मिळवला आलेले नाही. त्यामुळे भारताला मायदेशात सलग 11 कसोटी मालिका विजय मिळवून नवा पराक्रम करण्याची संधी आहे.

मायदेशात सर्वाधिक सलग कसोटी मालिका विजय मिळवण्याचा विक्रम भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघाच्या नावावर आहे. दोनही संघांनी 10 मालिका विजय मिळवले आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने दोन वेळा मायदेशात सलग 10 कसोटी मालिका विजय मिळवले आहेत. पण त्यांना 11 वा विजय मिळवता आलेला नाही. तो पराक्रम करण्याची भारताकडे संधी आहे.

भारताने फेब्रुवारी 2013 पासून आत्तापर्यंत मायदेशात सलग 10 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाने स्टिव्ह वॉ आणि मार्क टेलर यांच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबर 1994 ते नोव्हेंबर 2000 दरम्यान पहिल्यांदा सलग 10 कसोटी मालिका मायदेशात जिंकल्या होत्या. त्यानंतर रिकी पॉटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने जुलै 2004 ते नोव्हेंबर 2008 दरम्यान दुसर्‍यांदा मायदेशात सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

पंतऐवजी साहाला संधी
दक्षिण आफ्रिका वि. भारत कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत ऋषभ पंतची जागा वृद्धिमान साहा घेणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने या कसोटीआधी मंगळवारी ही माहिती दिली. ही कसोटी मालिका बुधवारपासून सुरू होत आहे. साहाला अनुभव आणि यष्टीरक्षण कौशल्यामुळं टीम इंडियात पुन्हा जागा मिळू शकते. भारतीय मैदानांवरील खेळपट्ट्यांवर चेंडू उसळल्यानंतर टर्न घेतो. अशी परिस्थिती साहा चांगल्या पद्धतीनं हाताळतो. वृद्धिमान साहाने आपला मागील कसोटी सामना जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्याच्या गैरहजेरीत पंतने जबाबदारी सांभाळली आणि इंग्लंड तसेच ऑस्ट्रेलियात शतकी खेळी करत टीमची पहिली पसंती बनला. गेल्या काही काळापासून मात्र पंतला खराब शॉटमुळे टीकेचा धनी व्हावे लागले आणि कदाचिक हेच कारण आहे की संघ व्यवस्थापनाने मालिकेची सुरुवात साहासोबत करण्याचा निर्णय घेतला. वृद्धिमान साहाने आतापर्यंत 32 कसोटी सामन्यांमध्ये 30.63 च्या सरासरीने 1,164 धावा केल्या आहेत.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN