भारत-दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी आजपासून

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-03 06:05:00

img

भारताचे लक्ष रोहित शर्मावर, मयांक अगरवालच्या साथीने सलामीला उतरणार 

@ विशाखापट्टणम / वृत्तसंस्था

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा आता कसोटी संघात स्वतःला नव्याने आजमावून पाहण्यासाठी सज्ज झाला असून आजपासून (दि. 2) खेळवल्या जाणाऱया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात तो मयांकच्या साथीने सलामीला उतरणार आहे. भारताने नेहमीप्रमाणे एक दिवस आधीच 11 सदस्यीय अंतिम संघ जाहीर करताना यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला वगळून वृद्धिमान साहाला संधी दिली. पहिल्या दिवसाच्या खेळाला सकाळी 9.30 पासून सुरुवात होईल.

भारतीय कर्णधार विराट कोहलीने या पहिल्या कसोटीतून ऋषभ पंतला डच्चू दिल्याचे स्पष्ट केले आणि साहा तब्बल 22 महिन्यांच्या कालावधीनंतर आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळेल, हे देखील निश्चित झाले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटप्रमाणेच रोहित कसोटी क्रिकेटमध्येही यशस्वी होईल, अशी भारतीय संघव्यवस्थापनाची अपेक्षा असून युवराजसह बहुतांशी आजी-माजी खेळाडूंनी रोहित कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

यापूर्वी, विंडीजविरुद्ध दोन कसोटी सामन्यात रोहितला मधल्या फळीत सामावून घेता आले नव्हते. पण, आता केएल राहुलला खराब फॉर्ममुळे संघातून बाहेर जावे लागले असून त्याच्या जागी रोहितची वर्णी लागली. रोहितला संधी देण्याची चाल फळली तर केएल राहुलचा खराब फॉर्मही काहीतरी पथ्यावर पाडून देणारा ठरु शकेल. मंगळवारी रोहितने सराव सत्रात कसून फटके घोटवले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 10 हजारपेक्षा अधिक धावांची आतषबाजी करणाऱया रोहितला कसोटीत मात्र आतापर्यंत केवळ 27 सामनेच खेळता आले असून त्यात त्याने 39.62 च्या सरासरीने जेमतेम 1585 धावा जमविल्या आहेत.

पंत व साहातील चुरस संपुष्टात

या मालिकेत यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतकडे असेल की, साहाकडे याबाबत बरीच चुरस होती. ती पहिल्या कसोटीपुरती संपुष्टात आली. ऋषभ पंत अलीकडील कालावधीत फलंदाजीत अतिशय खराब फॉर्ममध्ये असून याचमुळे त्याच्यापेक्षा तांत्रिकदृष्टय़ा सरस असलेल्या साहाची वर्णी लागणे साहजिकच मानले जात होते. त्यावर येथे शिक्कामार्तब झाले.

अश्विन संघात परतला

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध येथील पहिल्या कसोटी सामन्यात अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचेही पुनरागमन झाले आहे. गतवर्षी ऍडलेड येथील कसोटी सामना विजयानंतर अश्विन दुखापतीमुळे बाहेर फेकला गेला. त्यानंतर विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत त्याला संधी मिळाली नव्हती. भारतीय संघ येथे दोन मध्यमगती गोलंदाज आणि दोन फिरकीपटू खेळवेल, हे निश्चित आहे. खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक असेल तर तिसरा फिरकीपटू म्हणून हनुमा विहारीकडे चेंडू सोपवला जाईल, असे संकेत आहेत.

जसप्रित बुमराह मालिकेतून बाहेर फेकला जाणे भारतीय संघासाठी धक्का देणारे ठरले असले तरी इशांत शर्मा व मोहम्मद शमी हे तेज गोलंदाज आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची क्षमता राखून आहेत. यापूर्वी विंडीजमध्ये भारताने रविंद्र जडेजाच्या रुपाने एकच फिरकी गोलंदाज खेळवला होता. त्याला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अश्विनची साथ लाभेल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ अननुभवी

पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघात यंदा बरेच नवे चेहरे आहेत. 4 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकन संघाचा भारतात 0-3 असा धोबीपछाड झाला, त्यावेळी सध्याच्या संघातील विद्यमान कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिससह फक्त 5 खेळाडू त्यात समाविष्ट होते. मुळातच या मालिकेत दक्षिण आफ्रिकेसाठी प्रतिकूल स्थिती असेल, असे संकेत आहेत. त्यात चेंडू चांगलाच वळू लागला तर आफ्रिकेच्या अडचणी आणखी वाढतील, हे निश्चित आहे.

यापूर्वी सराव सामन्यात एडन मार्करम व तेम्बा बवूमा यांनी उत्तम फलंदाजी केली. यामुळे, त्यांचे मनोबल उंचावलेले असेल. याशिवाय, कॅगिसो रबाडा, व्हरनॉन फिलँडर, लुंगी एन्गिडी भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. दक्षिण आफ्रिकेची भिस्त याच मोजक्या खेळाडूंवर आहे. या लढतीच्या पाचही दिवसात थोडाफार पावसाचा व्यत्यय येणे व ढगाळ हवामान असणे अपेक्षित आहे.

भारतीय संघ या मालिकेच्या निमित्ताने मायदेशातील सलग 11 वी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असून दक्षिण आफ्रिकेच्या जलद त्रिकुटाचा बीमोड केल्यास विराटसेनेला यात सहज यश येणे अपेक्षित आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत (11 सदस्यीय अंतिम संघ) : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), तेम्बा बवूमा, थेऊनिस डे ब्रुएन, क्विन्टॉन डी कॉक, डीन एल्गार, झुबेर हमझा, केशव महाराज, एडन मार्करम, सेनूरन मुथूसामी, लुंगी एन्गिडी, ऍनरिच नोर्त्झे, व्हरनॉन फिलँडर, डेन पिएडेट, कॅगिसो रबाडा, रुडी सेकंड.

सामन्याची वेळ : सकाळी 9.30 पासून. 

2015 मधील भारत दौऱयापासून मी अनेक धडे शिकले आहेत. त्या दौऱयात 7 डावात जेमतेम 60 धावांवर समाधान मानावे लागल्यानंतर मी फिरकी गोलंदाजीचा कसा सामना करावा, यावर लक्ष केंद्रित केले. त्या मालिकेपेक्षा यंदा आपला संघ सरस कामगिरी साकारेल, असा विश्वास वाटतो.

-दक्षिण आफ्रिकन कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस. 

रोहितला कसोटीत स्थिरावण्यासाठी पुरेशी संधी मिळेल : विराट कोहली

रोहित शर्मासारखा दिग्गज फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी झाला तर भारतीय फलंदाजी आणखी धारदार होईल. या पार्श्वभूमीवर रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये स्थिरावण्यासाठी पुरेपूर संधी दिली जाईल, असे अभिवचन भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिले. आमच्या अपेक्षेप्रमाणे रोहित यशस्वी झाला तर जागतिक स्तरावरील अन्य कोणत्याही संघापेक्षा आमची फलंदाजी लाईनअप सर्वाधिक भक्कम होईल, असे विराट याप्रसंगी म्हणाला.

विरेंद्र सेहवागने जी भूमिका पार पाडली, त्याच प्रकारे आम्हाला रोहितकडून अपेक्षा आहे. मी स्वतः कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्यावेळी सहाव्या स्थानी फलंदाजीला येत असे. त्यानंतर चौथ्या स्थानी बढती मिळाली. स्वतःला सिद्ध करता आले तर कसोटी क्रिकेटमध्ये यश संपादन करणे फारसे दूर नसेल, असे विराटने येथे स्पष्ट केले. रोहितची फटकेबाजीची क्षमता निर्विवाद आहे आणि याचवेळी खेळपट्टी आव्हानात्मक असेल तर अशा परिस्थितीत कसे खेळावे, यावरही त्याची हुकूमत आहे, याचा विराटने येथे उल्लेख केला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN