भारत दौऱयामधून तमिम इक्बालची माघार
वृत्तसंस्था/ ढाक्का
बांगलादेशचा क्रिकेट संघ पुढील महिन्यात भारताच्या दौऱयावर येणार आहे. या दौऱयासाठी या संघातील सलामीचा अनुभवी फलंदाज तमिम इक्बाल उपलब्ध होवू शकणार नाही, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.
30 वर्षीय तमिम इक्बालच्या पाठीच्या भागाला दुखापत झाली असून अद्याप ती पूर्ण बरी झालेली नाही तसेच इक्बालची पत्नी या कालावधीत दुसऱया मुलाला जन्म देणार असल्याचे सांगण्यात आले. या कारणास्तव इक्बालने आपण भारत दौऱयासाठी उपलब्ध होवू शकणार नाही, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाला कळविले आहे.
इक्बालची गैरहजेरी या दौऱयात बांगलादेश संघाला चांगलीच भासेल. आता तमीम इक्बालच्या जागी इमरूल कायेसला संघात संधी देण्यात आली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. अनुभवी फलंदाज तमिम इक्बालने आतापर्यंत बांगलादेश संघाचे 204 वनडे, 58 कसोटी आणि 75 टी-20 सामन्यांत प्रतिनिधीत्व केले आहे. बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी मंडळाकडे आपल्या वेतन श्रेणीत वाढ करण्याची मागणी केली होती.
भारताच्या दौऱयावर संघातील काही खेळाडूंनी बहिष्काराची सूचना दिली होती पण बांगलादेश क्रिकेट मंडळाने क्रिकेटपटूंची मागणी मान्य केल्याने आता बांगलादेशचे क्रिकेटपटू भारत दौऱयावर येण्यासाठी सज्ज झाले आहेत