भारत-द. आफ्रिका कसोटी मालिका : सलामीवीर रोहितची ‘कसोटी’

Loksatta

Loksatta

Author 2019-10-02 04:56:33

img

विशाखापट्टणम : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भारताच्या फलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधील सलामीवीराच्या भूमिकेला बुधवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत प्रारंभ करणार आहे. कसोटीमध्ये पुन्हा स्थिरावण्याची संधी तो कशी साधतो, याकडे क्रिकेटजगताचे लक्ष लागले आहे. याचप्रमाणे यष्टिरक्षक-फलंदाजाच्या स्थानासाठी झगडणाऱ्या ऋषभ पंतला वगळून अनुभवी वृद्धिमान साहाला अजमावण्याचा प्रयोग केला जाणार आहे.

मायदेशातील भारताच्या पहिल्या कसोटीसाठी कर्णधार विराट कोहलीने संघाची घोषणा करताना दिल्लीकर यष्टिरक्षक-फलंदाज पंतला वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे २२ महिन्यांच्या अंतराने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी साहाला मिळणार आहे.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील यश रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये परावर्तित करावे, अशी संघ व्यवस्थापनाची आशा आहे. या सामन्याआधीच्या सराव सामन्यात रोहित शून्यावर बाद झाल्यामुळे हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो, याबाबत साशंका निर्माण झाली आहे. रोहित कारकीर्दीतील सर्वोत्तम लयीत असून, तो कसोटी क्रिकेटमधील सलामीच्या भूमिकेला न्याय देईल, असे युवराज सिंगसहित अनेक माजी क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे.

वेस्ट इंडिजमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहितला मधल्या फळीत संधी मिळाली नव्हती; परंतु धावांसाठी झगडणाऱ्या लोकेश राहुलला वगळण्यात आल्यामुळे रोहितकडून उत्तम सलामीची अपेक्षा करण्यात येत आहे. पहिल्या कसोटीआधीच्या भारतीय संघाच्या सराव सत्रांमध्येही सर्वाचे लक्ष रोहितच्या फलंदाजीकडे होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा खात्यावर असणाऱ्या रोहितने २७ कसोटी सामन्यांत ३९.६२च्या सरासरीने १५८५ धावा केल्या आहेत.

कसोटीत स्थिरावण्यासाठी रोहितला पुरेशी संधी दिली जाईल -कोहली

’कसोटी क्रिकेटमध्ये सलामीच्या स्थानासाठी रोहित शर्माला स्थिरावण्यासाठी पुरेशी संधी दिली जाईल, असे स्पष्टीकरण कोहलीने दिले आहे.

’‘‘रोहित सलामीला यशस्वी ठरला, तर भारताची फलंदाजीची फळी अधिक भक्कम होईल. जगातील सर्वोत्तम फलंदाजीची फळी हा लौकिक भारताला मिळवता येऊ शकेल.

’रोहितला अजमावताना आम्ही घाई करणार नाही. मायदेशात आणि परदेशात स्वतंत्र संघबांधणीचे धोरण आम्ही अवलंबतो. त्यामुळे सलामीसाठी योग्य न्याय तो देऊ शकेल,’’ असे कोहलीने सांगितले.

कसोटीवर पावसाचे सावट

ढगाळ आकाश आणि हलक्या सरी यामुळे पहिल्या कसोटीवरही चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. पाचही दिवस पावसाची शक्यता असून, पहिल्या दिवशी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पहिल्या तीन दिवसांचे पावसामुळे नुकसान झाल्यास उर्वरित दोन दिवस ओलसर खेळपट्टीचे आव्हान असेल.

साहा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टिरक्षक – कोहली

’धावांसाठी आणि यष्टीपाठी झगडणाऱ्या पंतच्या कामगिरीने साहाचा मार्ग मोकळा केला. भारतामधील फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ांवर पंतपेक्षा साहा तांत्रिकदृष्टय़ा सरस आहे.

’‘‘साहा दुखापतीतून सावरत तंदुरुस्त झाल्याने कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे. संघात पुन्हा स्थान मिळवण्याच्या इराद्याने साहाने लक्षवेधी फलंदाजीची कामगिरीसुद्धा साकारली आहे.

’माझ्या मते तो जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे,’’ असे कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले.

अश्विनचे पुनरागमन : रविचंद्रन अश्विन पहिल्या कसोटीत खेळणार असल्याचे कोहलीने जाहीर केले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अ‍ॅडलेड कसोटीत अश्विनला दुखापत झाली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही तो खेळू शकला नव्हता. जसप्रित बुमराच्या अनुपस्थितीत भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा सांभाळतील, तर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यावर फिरकीची भिस्त असेल. हनुमा विहारी हा आणखी फिरकी गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध असेल.

वेगवान त्रिकुटावर आफ्रिकेची भिस्त

नव्या खेळाडूंचा भरणा असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारताचे पारडे जड मानले जात आहे. चार वर्षांपूर्वी भारताने आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले होते. कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिससहित पाच खेळाडूंकडे त्या मालिकेत खेळल्याचा अनुभव गाठीशी आहे. एडीन मार्करम आणि टेंबा बव्हुमा यांनी सराव सामन्यात धावा काढून आत्मविश्वास उंचावला आहे. आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याची भिस्त कॅगिसो रबाडा, व्हर्नन फिलँडर आणि लुंगी एन्गिडी या त्रिकुटावर असेल.

११भारतीय संघ मायदेशातील विक्रमी ११वी कसोटी मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे.

रविचंद्रन अश्विनच्या खात्यावर

६५ कसोटी सामन्यांत ३४२ बळी जमा असून, ३५० बळींचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आणखी आठ बळींची आवश्यकता आहे.

रवींद्र जडेजाने ४३ कसोटी सामन्यांत १९८ बळी घेतले असून, बळींचे द्विशतक साकारण्यासाठी त्याला दोन बळींची आवश्यकता आहे.

७४ फॅफ डय़ू प्लेसिसने कसोटी कर्णधार म्हणून १९२६ धावा केल्या असून, दोन हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला ७४ धावांची गरज आहे. हा टप्पा गाठणारा तो ग्रॅमी स्मिथ आणि हॅन्सी क्रोनिए यांच्यानंतर तिसरा आफ्रिकेचा कर्णधार ठरेल.

केशव महाराजने ९४ कसोटी बळी घेतले असून, बळींचे शतक साकारण्यासाठी त्याला सहा बळींची आवश्यकता आहे.

संघ

भारत (अंतिम ११) :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), टेंबा बव्हुमा, थ्युनिस डी ब्रून, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडीन मार्करम, सेनुरान मुथूसामी, लुंगी एन्गिडी, एनरिच नॉर्जे, व्हर्नन फिलँडर, डेन पीट, कॅगिसो रबाडा, रुडी सेकंड.

सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN