मयांकची तडाखेबंद द्विशतकी खेळी

Indian News

Indian News

Author 2019-10-04 08:30:53

img

विशाखापट्टणम: मयांक अग्रवालच्या तडाखेबंद द्विशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण
आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात 7 बाद 502 धावांवर डाव घोषित केला. रोहित शर्माने दीडशतकी खेळी करत मयांकसह विक्रमी 317 धावांची भक्‍कम सलामी दिली. आज दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 39 अशी दयनीय अवस्था झाली आहे.

कालच्या 115 धावांवरून रोहितने पुढे खेळ सुरू केल्यानंतर चौफेर फटकेबाजी केली. दुसरीकडे मयांकने देखील आपले शतक थाटात पूर्ण केले. रोहित दीडशतकी खेळी करून बाद झाल्यानंतर देखील कोणतेही दडपण न घेता त्याने खेळ केला. अर्थात दुसरीकडून त्याला म्हणावी तशी साथ मिळाली नाही.

चेतेश्‍वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्‍य रहाणे, हनुमा विहारी व यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. मयांकने यांच्याबरोबर छोट्या भागीदाऱ्या करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. आपले दीडशतक सहज पूर्ण करत मयांकने पहिल्या कसोटी द्विशतकाकडे आगेकूच केली. रवींद्र जडेजाने थोडीफार चमक दाखविताना उपयुक्‍त धावा केल्या.

मयांकने 371 चेंडूंचा सामना करताना 23 चौकार व सहा षटकारांच्या मदतीने 215 धावांची खेळी केली. समोरचे फलंदाज एका पाठोपाठ बाद होत असताना मयांकने मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. संपूर्ण मैदानभर चौफेर फटकेबाजी करताना त्याने वेगवान तसेच फिरकी गोलंदाजांच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. कर्णधार विराट कोहलीने रविचंद्रन अश्‍विन बाद झाल्यानंतर पहिला डाव घोषित केला.

जवळपास दिड दिवस क्षेत्ररक्षण करून दमलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. बऱ्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन केलेल्या रविचंद्रन अश्‍विनने आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. त्याने पाहुण्यांच्या डावाला पाहता पाहता खिंडार पाडले. जी खेळपट्टी मयांक व रोहित खेळत असताना फलंदाजीला पोषक वाटत होती, तीच खेळपट्टी अश्‍विन व जडेजा यांनी गोलंदाजी करत असताना अचानक भयानक वाटू लागली. दिवसातील केवळ 20 षटकांचा खेळ बाकी असताना दक्षिण आफ्रिकेने तीन फलंदाज गमावले. अश्‍विनने दोन तर जडेजाने एक बळी मिळविला. डिन एल्गर व थ्युनिस ब्रुयान जोडीने पाहुण्यांच्या डावाची सुरुवात केली. कोहलीने ईशांत शर्मा व मोहंमद शमी यांना नवीन चेंडूवर केवळ प्रत्येकी दोन षटके गोलंदाजी दिल्यानंतर अश्‍विन व जडेजा यांच्याकडे चेंडू सोपविला. त्याचा निर्णय सार्थ ठरविताना या फिरकी जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला सुरुंग लावला.

मार्करामचा अप्रतिम कॅरम बॉलवर त्रिफळा उडविताना अश्‍विनने पहिले यश मिळविले. पाठोपाठ ब्रुयानला यष्टिरक्षक साहाकरवी झेलबाद करत दुसरे यश मिळवून दिले. दुसरीकडून जडेजाने डेन पेड्‌टचा बळी मिळविताना पाहुण्यांची अवस्था आणखीनच खराब केली. थेंबा बवुमाने डिन एल्गरच्या साथीत दिवसातील उर्वरित षटके खेळून काढताना संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ अद्याप 463 धावांनी पिछाडीवर असून उद्या त्यांच्या फलंदाजांनी सावधगिरीने फलंदाजी केली नाही तर त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की येऊ शकते.

सामन्यातील महत्त्वाच्या नोंदी
रोहितची सिद्धूूशी बरोबरी, दोघांचे कसोटीत प्रत्येकी 38 षटकार दक्षिण आफ्रिकेचा डिन एल्गार सध्याच्या संघातील भारताविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. पहिले कसोटी शतक साकार करताना त्याचे द्विशतकात रूपांतर करणारा मयांक भारताचा चौथा फलंदाज. या आधी दिलीप सरदेसाई, विनोद कांबळी व करुण नायर यांच्याकडून अशी कामगिरी. रोहित व मयांककडून कसोटीत भारताकडून तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी. विरेंद्र सेहवागनंतर जवळपास दहा वर्षांनंतर मयांकच्या रूपाने भारतीय फलंदाजाचे कसोटीत द्विशतक.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD