मयांकची शतकी खेळी; भारताचे वर्चस्व

Indian News

Indian News

Author 2019-10-11 08:30:43

img

पुणे: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मयांक अग्रवालने शतकी खेळी केली. त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारताने आपल्या पहिल्या डावात 85.1 षटकांत 3 बाद 273 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार विराट कोहली 63 तर अजिंक्‍य रहाणे 18 धावांवर खेळत आहेत.
आज अपुऱ्या प्रकाशाने खेळ चार षटके आधीच थांबविण्यात आला. वेळीअवेळी पडत असलेल्या पावसाने खेळ सुरू होईल का ही भीती फोल ठरली आणि खडखडीत उन्हात सामना सुरूर झाला.

कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशाखापट्टणम कसोटीत दोन्हा डावात शतकी खेळी करणारा सलामीवीर रोहित शर्मा यावेळी मात्र कागीसो रबाडाच्या ऑफस्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फसला.

मात्र, दुसरीकडे फलंदाजी करणारा मयांक अग्रवाल पहिल्या कसोटीप्रमाणेच जोशात होता, त्याने चेतेश्‍वर पुजाराच्या साथीत 138 धावांची भागीदारी करत संघाचा डाव केवळ सावरलाच नाही तर डावाला आकारही दिला. पुजाराने शुन्यावर असताना मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेत अर्धशतक फटकावले.

अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर पुजारा देखील रबाडाचाच बळी ठरला. ऑफस्टंप आणि त्या जवळपास चेंडूचा टप्पा ठेवण्याचा रबाडाचा डावपेच यशस्वी ठरला. पुजारा देखील हा चेंडू सोडायचा की खेळायचा या संभ्रमात बाद झाला. दरम्यान, मयांकने आपले शतक पूर्ण केले. त्याला साथ द्यायला मैदानात उतरलेल्या कर्णधार कोहलीने नेहमीप्रमाणे आत्मविश्‍वासाने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. विशाखापट्टणम कसोटीत द्विशतकी खेळी करणाऱ्या मयांकने कसोटी क्रिकेटमधील आपले दुसरे शतक पूर्ण केले.

या दोघांची भागीदारी बहरणार असे वाटत असतानाच रबाडाने पुन्हा एका अप्रतीम आऊटस्विंगरवर मयांकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. मयांक 108 धावांवर बाद झाला. मयांकची जागा अजिंक रहाणेने घेतली व लगेचच कोहलीने त्याच्या साथीत पुन्हा एकदा संघाच्या डावाला आकार दिला. या जोडीने 75 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. कोहलीने कसोटीतील 23 वे अर्धशतक पूर्ण करताना रहाणेच्या साथीत संघाला सावध पण भक्कम सुरुवात करून दिली.

दक्षिण आफ्रिकेने डेन पेड्‌टच्या जागी अनरीच नॉर्जी या नवोदित वेगवान गोलंदाजाला संघात स्थान दिले, तर भारताने हनुमा विहारीच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवची निवड केली. पुण्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे वातावरण ढगाळ आहे, त्याचा लाभ वेगवान गोलंदाजांना निश्‍चित होईल असे वाटत असल्याने दोन्ही संघांनी अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला.

प्रेक्षकांची सामन्याकडे पाठ
शहरात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. काल रात्री देखील दबरदस्त पाऊस झाला. मैदानाच्या परिसरात सुद्धा सातत्याने पाऊस पडला होता, त्या पार्श्‍वभूमिवर सामना वेळेत सुरु होणार का, पावसाचा व्यत्यय तर येणार नाही ना, दिवसाचा खेळ पुर्ण होईल का हे व असे अनेक प्रश्‍न क्रिकेट चाहत्यांना पडले होते, त्यामुळे बहुतांशी चाहत्यांनी या सामन्याच्या पहिल्या दिवशी चक्क पाठ फिरविली.

मैदानावर साधारण हजारच्या जवळपास चाहत्यांची उपस्थिती होती. पुण्यात अन्य ठिकाणांप्रमाणे सातत्याने सामने आयोजित होत नाहीत त्यामुळे चाहत्यांचा या सामन्याला प्रचंड प्रतिसाद मिळेल ही शक्‍यता फोल ठरली. आता आज नाबाद असलेल्या कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी उद्या तरी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा अंदाज आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN